९६ वर्षांच्या विद्यार्थिनी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |




 


केरळमध्ये वयाच्या ९६ व्या वर्षी एक आजीबाई इयत्ता चौथीच्या परीक्षेला फक्त बसल्याच नाही, तर त्यात पैकीच्या पैकी गुणही मिळवले. या आजींच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने सर्वांनाच थक्क केले.

 

विद्यारत्नं महतधनम्’ अर्थात, विद्यारूपी रत्न हे एक मोठे धन आहे आणि हे धन मिळवण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नक्कीच नाही! प्रत्येक माणूस हा मरेपर्यंत शिकत असतो आणि शिकण्याची जिद्द असली की कोणत्याही परिस्थितीत आपण शिक्षण प्राप्त करू शकतो, याचा प्रत्यय आला तो केरळमध्ये. केरळमध्ये वयाच्या ९६व्या वर्षी एका आजींबाईंनी इयत्ता चौथीची परीक्षा दिली. आता आपल्याला वाटेल त्यात काय, पण या आजी आपल्या उभ्या आयुष्यात कधी शाळेची पायरीही नाही चढल्या. बरे, त्या या परीक्षेला फक्त बसल्याच नाही, तर त्यात पैकीच्या पैकी गुणही मिळवले. केरळमधील अलापुझ्झा जिल्ह्यातील या आजींच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने सर्वांनाच थक्क केले.

 

केरळने साक्षरता प्रमाण वाढवण्यासाठी ‘अक्षर लक्ष्यम’ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत ज्यांना लिहिता-वाचता येत नाही, त्यांना मोफत शिक्षण दिले जाते आणि विशेष म्हणजे यात वयाची कोणतीही अट घालण्यात आलेली नाही. याद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेत सर्व वयोगटातील एकूण ४५ विद्यार्थी सामील झाले होते. त्यात ९६व्या वर्षाच्या कार्तयिनी अम्मा या सर्वात वयस्कर होत्या. कार्तयिनी अम्मा या वयात ३० पर्यंतचे अंक वाचायला आणि ४० पर्यंत मल्याळममध्ये लिहायला शिकल्या आहेत. एवढचं नाही तर त्या आपल्या वयाच्या इतर वृद्धांनाही फावल्या वेळात गणिताचे धडे देत असतात. या वयातील त्यांचा शिकण्याचा उत्साह एखाद्या तरुणीलाही लाजवेल असा आहे. जानेवारीमध्ये त्यांनी साक्षरता वर्गात शिकण्यास सुरुवात केली आणि अवघ्या काही महिन्यांमध्ये त्यांनी अंकांसोबत मैत्री केली. या वयात का बरं त्यांना शिकावसं वाटलं असेल? त्याचं उत्तर त्या स्वत: अगदी सहजपणे देतात, “जेव्हा शिकायची इच्छा होती तेव्हा परिस्थिती नव्हती, मरताना कोणतीही इच्छा अपूर्ण नाही ठेवायची.” बरं त्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले असले तरी एवढ्यातच त्या समाधान मानणार्‍या नाहीत, त्यांना मल्याळममधील जोडाक्षरेही शिकायची आहेत. एकीकडे आजकालची पिढी अभ्यास कसा टाळता येईल, याची कारणं शोधत असते, तर या आजी सतत काहीतरी बाईंनी शिकवावे म्हणून त्यांच्या मागे लागलेल्या असतात. पैकीच्या पैकी गुण मिळवूनही “मी अभ्यास केलेलं सगळं आलं नाही परीक्षेत” याची तक्रारही त्यांनी शिक्षकांकडे केली. अशा या आजीबाईंच्या जिद्दीला म्हणावं तरी काय? ज्या वयात आराम करून, अखेरच्या घटकेची वाट पाहातात, त्या वयात या आजी आपली शिकण्याची इच्छा पूर्ण करत आहेत. “हातपाय चालत आहेत, तोपर्यंत मी शिकेन आणि आजारी पडले तरी गृहपाठ करेन आणि नाही केला तर, मला शिक्षा करा” अशी सक्त ताकीद कार्तयिनी अम्मांनी आपल्या शिक्षकांना दिली आहे. त्यांना गणित शिकवणार्‍या बाईंची कार्तयिनी अम्मांबद्दल एकच तक्रार असते, ती म्हणजे, “शाळेची वेळ संपली तरी त्या बसून राहतात आणि आणखी शिकवा, असा हट्ट करत राहतात.” शाळेतले हे असे किस्से त्या बाईंसाठीही नवीनच. आजकाल मुलांनी शाळेत बसावं, म्हणून बाईंना प्रयत्न करावे लागतात. इकडे मात्र परिस्थिती अगदी उलट.

 

कार्तयिनी अम्मा यांच्या जिद्दीची सुरुवात झाली ती त्यांच्या मुलीपासून. जानेवारी २०१८ मध्ये, ‘अक्षर लक्ष्यम’ योजनेंतर्गत महिलांना शिक्षण मिळावे, यासाठी साक्षरता कर्मचारी गावोगावी फिरत असत. मात्र, गावातील इतर स्त्रिया त्यांना टाळत आपल्या मार्ग बदलायच्या. कार्तयिनी अम्मा या संपूर्ण चेप्पड गावातल्या एकच होत्या ज्यांनी स्वत: नावनोंदणी करण्यासाठी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे, कार्तयिनी अम्मा यांची ६० वर्षांची मुलगी अमिनी यांनी जेव्हा या साक्षरता वर्गास जाण्यास सुरुवात केली तेव्हाच कार्तयिनी अम्मांना शिकायची आवड निर्माण झाली. अमिनी यांनी दहाव्या स्तरापर्यंत आपला शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्या कार्तयिनी अम्मांना गणित आणि मल्याळम शिकवत. अमिनी आपल्या आईला साक्षरता वर्गात पाठवण्यास तयार नव्हत्या. मात्र, त्यांना आपल्या आईच्या इच्छेसमोर झुकावेच लागले. साक्षरता वर्गात जाण्यासाठी कार्तयिनी अम्मांचा उत्साह पाहता, गावातील इतर महिलांनी त्यांना ‘छोटी अम्मा’ असं नाव ठेवलं.

 

गणित आणि मल्याळम शिकल्यानंतर या आजीबाईंना आता इंग्रजी शिकायचे वेध लागले आहेत आणि त्यातही मी पैकीच्या पैकी गुण मिळवेनअसं त्या विश्वासाने आपल्या शिक्षकांनी सांगतात. केरळ राज्याने सुरू केलेल्या उपक्रमाचा लाभ केवळ कार्तयिनी अम्माच नाही, तर त्यांच्यासारखे ४५ हजारांपेक्षा जास्त वृद्ध घेत आहेत. ‘इच्छा तिथे मार्ग’ या वाकप्रचाराचे उत्तम उदाहरण ही वृद्ध मंडळी आहेत. यावरून शिकण्याची जिद्द असल्यास वय हा मुद्दा गौण ठरतो, हे या आजींमुळे तर सिध्द झालेच आहे. सर्व आजी-आजोबांमुळे भारतातील कितीतरी निरक्षर लोकांना प्रेरणा मिळेल हे मात्र नक्की.
@@AUTHORINFO_V1@@