नासाचे 'टच द सन'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2018   
Total Views |



नासाच्या या ‘टच द सन मोहिमेसाठी डॉ. यूजीन न्यूमैन पार्कर यांचे नाव देण्यात आले असून पार्कर यांनी 1958 साली म्हणजे त्यांच्या वयाच्या 31 व्या वर्षी सोलर विंडचा शोध लावला होता. त्यावेळी हे संशोधन अनेक शास्रज्ञांनी नाकारले होते.

 

सूर्यमालेतील ग्रहांविषयी मानवाला कुतुहूल निर्माण झाल्याने गेल्या काही वर्षांमध्ये मानवाने त्यांच्या दिशेने उड्डाणे घेत काही प्रमाणात माहिती जाणून घेण्यात यश मिळवले. ‘कॅसिनी’ या यानाने शनी व गुरूच्या सभोवताली फेऱ्या मारत तेथील गोष्टींचे भरपूर निरीक्षण केले. वेनेरा हे यान शुक्रवारी जाऊन पोहोचले, मरिनर यानाने बुध ग्रहाचा अभ्यास केला, तर व्हॉयेजर यानाने युरेनस आणि नेपच्यून ग्रहाला भेट दिली होती. जगभरातून अशी अनेक उड्डाणे सूर्यमालिकेच्या व अंतराळाच्या अभ्यासासाठी जाऊन आली. तेथील अभ्यास केला. यामध्ये काही मानवरहित होती तर काही मोहिमा या मानवी होत्या. अनेकांना यश आले तर अनेकांना अपयश, मात्र संशोधन मोहिमांमध्ये खंड पडला नाही. हे सर्व होत असताना मानवाची सूर्यावर नजर होतीच, कारण सूर्याविषयी मानवाच्या नजरेत पहिल्यापासूनच कुतूहल होते. मात्र तिथपर्यंत पोहोचायचे कसे यावर उत्तर नव्हते. जगभर या सर्व मोहिमा होत राहिल्या तसतसा संशोधकांचा आत्मविश्वासदेखील वाढत गेला आणि सूर्यापर्यंत कसे पोहोचायचे याचे उत्तर मिळत गेले. याचेच यश म्हणजे रविवारी अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेचे ‘पार्कर सोलर प्रोब’ मानवरहित यान सूर्याच्या दिशेने केप कॅनेव्हेरल अंतराळ तळावरून झेपावले आहे.

 

 
 

नासा ही अंतराळामध्ये शोधकार्य करणारी जगातील सर्वात मोठी संस्था असून ती नेहमीच अंतराळामध्ये नवनवीन गोष्टींचा शोध घेत असते. यामुळे अंतराळाचे बरेचसे चित्र जगासमोर आले आहे. याच नासाला यावर्षी 60 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने नासाने अनेक मोहिमांचे आयोजन केले असून यातील अनेक दिवसांपासून चाललेली आणि सर्वात महत्त्वाकांक्षी मोहीम ‘पार्कर सोलर प्रोब’ ही सर्वज्ञात होती. याच ‘पार्कर सोलर प्रोब’ यानाचे रविवारी यशस्वी प्रक्षेपण झाले. नासाच्या या ‘टच द सन’ मोहिमेसाठी डॉ. यूजीन न्यूमैन पार्कर यांचे नाव देण्यात आले असून पार्कर यांनी 1958 साली म्हणजे त्यांच्या वयाच्या 31 व्या वर्षी सोलर विंडचा शोध लावला होता. त्यावेळी हे संशोधन अनेक शास्रज्ञांनी नाकारले होते. मात्र पार्कर यांचे संशोधन जगासमोर आणण्यात भारतीयांचा मोठा हात होता. अमेरिकी खगोलशास्त्रज्ञ आणि अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नलचे तत्कालीन वरिष्ठ संपादक असलेले मूळ भारतीय सुब्रमण्यम चंद्रशेखर यांनी पार्कर यांच्या संशोधनाला होत असलेल्या विरोधाला न जुमानता त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि आपल्या जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित केले. चंद्रशेखर यांना 1983 चे भौतिकशास्राचे नोबेल मिळाले होते. आज याच संशोधनाच्या आधारे या मोहिमेचे उड्डाण करण्यात आले आहे.

 

 
 

पहिल्या आणि ऐतिहासिक मानवविरहित ‘पार्कर सोलर प्रोब’ या यानाच्या प्रक्षेपणास तांत्रिक बिघाडामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. हे यान प्रक्षेपित होण्यासाठी अवघे 55 सेकंद शिल्लक असताना ‘हेलियम सिस्टिम’ मधील बिघाडामुळे प्रक्षेपण नियंत्रकाने यानाचे प्रक्षेपण थांबवले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी (रविवारी) याचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. पार्कर हे अंतराळयान 85 दिवसांनंतर म्हणजे 5 नोव्हेंबरला सूर्याच्या कक्षेत पोहोचेल. 7 वर्ष चालणाऱ्या या मोहिमेत हे यान सूर्याच्या कक्षेत पोहोचल्यानंतर सूर्याला 24 प्रदक्षिणा घालणार आहे. पार्कर यान 9 फूट 10 इंच लांब आहे, तर त्याचे वजन 612 किलो आहे. 1371 डिग्री तापमान सहन करण्याची शक्ती यामध्ये असून सूर्याच्या पृष्ठभागाच्या 40 लाख मैल अंतरावरून ते जाणार आहे. या मोहिमेवर नासाने 103 कोटी रुपये खर्च केला आहे. दरम्यान, या यानासोबत नासा 11 लाख 37 हजार लोकांची नावे एका मेमरी कार्डद्वारे पाठवणार आहे. नासाच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेमुळे आपल्याला सूर्याविषयीच्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणे शक्य होणार असून सूर्याच्या वातावरणातील प्रक्रियांचा पृथ्वीवर काय परिणाम होतो, याचेदेखील उत्तर मिळणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@