तालुक्यात एकच आधारकार्ड नोंदणी केंद्र सुरू

    13-Aug-2018
Total Views |



मुरबाड : आधारकार्ड शासनाने सर्वांना बंधनकारक केले आहे. शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तरी आधार, बँकेत खाते उघडायचे असेल तरी आधार, वयोवृद्धाला बस प्रवासात सवलत पाहिजे असेल तरी आधार, परंतु आधारकार्ड काढण्यासाठी केंद्र सुरू नसल्याने या लोकांवर निराधार होण्याची वेळ आली आहे. सर्व नागरिकांना शासनाने आधारकार्ड अनिवार्य केले आहे. विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशापासून ते बँकेत खाते उघडण्यासाठी आधारकार्ड आहे का? असे विचारले जाते. मुरबाड तालुक्याची लोकसंख्या दोन ते अडीच लाख असल्याने विभागानुसार आधारकेंद्र सुरू करण्याची गरज आहे.

 

२२७ गावपाड्यांचा बनलेला तालुका, दुर्गम भागातील नागरिकांची गैरसोय, दळणवळणाची अपुरी साधने यामुळे मुरबाड शहरात अशा ठिकाणी आधारकार्ड केंद्र सुरू होणे गरजेचे असताना केवळ शिवळे येथे केंद्र सुरू ठेवले आहे. ज्या ठिकाणी केंद्र सुरू होती ती कोणतीही कारणे देता बंद करण्यात आली आहेत. नागरिकांकडून मुरबाड तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले होते, परंतु आजपर्यंत कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने नागरिक मात्र बेहाल झाले आहेत.