"द वर्ल्ड लायन डे" विशेष : 'सिम्बा म्हणे'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Aug-2018   
Total Views |

 
 
लहानपण आणि डिस्ने यांचं समीकरण जरा वेगळंच आहे. मी 90's वर लेखमाला लिहीतेच आहे, मात्र आजचा हा खास लेख आहे "वर्ल्ड लायन डे" म्हणजेच जागतिक सिंह दिनाच्या निमित्ताने. १९९४ मध्ये आलेल्या आणि जगभरात गाजलेल्या या अॅनिमेटेड चित्रपटाने लहान मोठ्या सगळ्यांनाच वेड लावलं आहे. लहानपणापासून 'सिम्बा', 'टिमॉन पुम्बा', 'नाला', 'झझु' हे सगळे मित्रच होते. खरंतर अगदी मराठमोळं किंवा आपल्या मातीतलं असं काहीच यामध्ये नाहिये. मात्र तरी देखील मनाच्या जवळ असणारा हा चित्रपट आहे. तो कुणी दिग्दर्शित केला, प्रदर्शित केला याती माहिती आपल्याला विकीपिडीयावर मिळेलच. मात्र आजच्या या लेखात 'द लायन किंग'च्या सगळ्यात महत्वाच्या आणि मुख्य पात्राने म्हणजेच सिम्बाने आपल्याला काय शिकवले हे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.
ज्यांना सिम्बा किंवा द लायन किंगवीषयी फार माहीत नाही त्यांच्यासाठी "दूर एका जंगलात राजा मुफासा आणि राणी साराबी या सिंह आणि सिंहीणीच्या पोटी 'सिम्बा' नावाचा बछडा जन्माला येतो, तेव्हा सुरुवात होते या कहाणीला. मुफासा आणि साराबी खूप नेक आणि सच्चे असतात. आपल्या पिल्लाची जडण घडण योग्य पद्धतीने करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि एवढ्यात सिम्बाचा काका म्हणजेच मुफासाचा भाऊ 'स्कार' षडयंत्राने मुफासाला मारतो आणि लहानग्या सिम्बाचं जीवन उद्ध्वस्त होतं. मात्र आपल्या वडीलांनी दिलेल्या शिकवणींवर त्याचा एकट्याचा स्वत:चा प्रवास सुरु होतो. अखेर दुष्टाव्याचा शेवट होतो, आणि सिम्बा, मुफासा प्रमाणेच एक खरा आणि सच्चा राजा बनतो. मात्र त्याच्या या एकट्याच्या प्रवासाने आपल्याला (लहानांना आणि मोठ्यांनाही) खूप काही शिकवलं आहे.
 
राजा असणं म्हणजे केवळ मिरवणं नाही तर नेतृत्व करणं :

आजच्या परिस्थितीत हे वाक्य किती महत्वाचं ठरतं नाही का? लहानग्या सिम्बाला चिमुकलं असतानापासूनच राजा होण्याची खूप घाई झाली होती, राजाचा असलेला रुबाब त्याला मिळणारा सन्मान हे सगळं त्याला हवं हवंसं होतं. मात्र त्याचे वडील त्याला समजावतात "राजा असणं म्हणजे केवळ रुबाब आणि सन्मान नाही, तर खऱ्या अर्थानं नेतृत्व करणं. हे सगळं या चमक धमकीच्या आयुष्याच्या खूप पुढे आहे. खऱ्या अर्थाने नेतृत्व करण्याची क्षमता राजासाठी सगळ्यात जास्त आवश्यक असते." आजची राजकीय परिस्थिती बघितली तर मुसाफाची ही शिकवण अगदी चपखल बसते. जनतेसाठी खरे राजा तेच असतात जे खऱ्या अर्थाने नेतृत्व करण्याची क्षमता ठेवतात.

"आपल्या भूतकाळातून शिका, भूतकाळात तुमचं भविष्य खराब करण्याची ताकद नाही.."

अनेकदा आपण आपल्या भविष्यात किंवा वर्तमानात घडणाऱ्या गोष्टींसाठी भूतकाळाला जबाबदार मानतो. मात्र त्यातून योग्य तो धडा शिकत नाही. "द लायन किंग" मध्ये स्कार षडयंत्राने मुफासाला मारतो, आणि सिम्बाला असं वाटतं कि हे भीषण कृत्य त्याच्या हातून घडलं आहे. आणि तो सत्य समोर येईस्तोवर (म्हणजेच एक मोठ्या कालावधीसाठी) स्वत:ला या कुकृत्याचा दोषी मानतो. मात्र त्याच्या वडीलांचा जिवलग मित्र रफीकी त्याला समजावतो तो म्हणतो "you can either run from it or learn from it" म्हणजेच एकतर तुम्ही तुमच्या भूतकाळापासून पळण्याचा प्रयत्न करु शकता किंवा त्यातून योग्य तो धडा शिकू शकता.
 
जीवन चक्र (circle of life) :

भारतीय पुराणांमध्ये सांगितलेली शिकवण 'द लॉयन किंग' मध्ये देखील सांगण्यात आलेली आहे. माणूस असो किंवा प्राणी तो जीवनाच्या चक्रात अडकलेला असतो. जन्म होतो, तर मृत्यु देखील होणारच. मात्र त्यापासून घाबरुन जाण्यात काहीच अर्थ नाही, आपण जीवंत असेपर्यंत या समाजासाठी, आपल्या लोकांसाठी आपल्या देशासाठी आणि या जगाला एक चांगले स्थान बनवण्यासाठी आपण काय करतो हे महत्वाचं आहे. सिम्बाला लहानपणी मृत्युची भिती वाटायची, मात्र त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं, "मृत्यु होते, आणि ती होणारच. मात्र ती होण्याआधी आपण काय करतो हे महत्वाचं असंत."
 
 
 
 
"हकूना मटाटा" आनंदी आयुष्य जगण्याची गुरुकिल्ली :

ज्यावेळी सिम्बा स्वत:च्या वडीलांच्या मृत्युसाठी स्वत:ला दोषी मानत स्वत:शीच झगडत असतो, तेव्हा त्याचे मित्र म्हणजेच टिमॉन आणि पुम्बा त्याला 'हकूना मटाटा' हे गाणं म्हणत आनंदी आयुष्य जगण्याचा मंत्र देतात. अनेकदा आपल्या आयुष्यात संकटं येतात, त्यावर त्याक्षणी काहीच करणं आपल्या हातात नसतं, मात्र चिंता करुन केवळ तोच तोच विचार करुन आपण संकट आणखी वाढवतो, अशा वेळी आहे त्या क्षणातून आनंद शोधत स्वत: आनंदी आणि सकारात्मक राहिलं तर कदाचित ती परस्थिती हाताळणं सोप्पं जाईल. खरंच आहे ना?
 
 
 
भितीचा सामना करा आणि त्यावर मात करा :

सिम्बा खूप लहान असताना त्याचे वडील मारले जातात, त्यांच्या मृत्युसाठी सिम्बा स्वत:ला दोषी मानत असतो, आणि मृत्यु विषयी असलेलं भय देखील त्याचं दिसून येतं. मात्र स्वत:च्या प्रत्येक भितीवर स्वत:च्या प्रत्येक भयावर सिम्बा मात करतो आणि अखेत असत्याचा नाश करुन पुन्हा एकदा सिद्ध करतो की आयुष्यात आपण काय करणं अधिक आवश्यक आहे.
खरं प्रेम सोबत असलं तर जग जिंकता येतं :

सिम्बाची लहानपणीची मैत्रीण म्हणजेच नाला पुढे जाऊन सिम्बाची आयुष्यभराची साथीदार बनते. ती त्याला प्रत्येक कठीण परिस्थितीत धीर देते. स्वत: खंबीर राहून त्याला खंबीर करते आणि कदाचित म्हणूनच अखेर विजय सिम्बाचा होतो. असं म्हणतात की यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते. खरं देखील आहे, मात्र हे केवळ पुरुष किंवा स्त्रीलाच लागू होत नाही, खरं प्रेम तुमच्या आयुष्यात तुमच्यासाठी ताकद बनून येतं, आणि तुम्हाला यशशिखरापर्यंत पोहोचवतं.
 
 
 
राजा असणं म्हणजे २४ तास 'काटेरी मुकुट' मिरवणं :

आज राजा असू देत नाही तर पंतप्रधान नाहीतर मुख्यमंत्री देशात काहीही घडलं कि पहिलं खापर या महत्वाच्या पदधारकांवरच फोडलं जातं. त्यातून जर तुम्ही राजकन्या किंवा राजकुमार असाल तर तुमच्या समोर आव्हानांची रांग लागते, तुम्ही स्वत:ला कितीही सिद्ध करण्याचा प्रयत्न केलात तरी लोक तुम्हाला "जज" करतात. आणि राजा किंवा राजकुमार असणं म्हणजे सतत काटेरी मुकुट डोक्यावर मिरवण्यासारखं आहे. सिम्बाला एक राजपुत्र म्हणून आणि मुफासाला एक राजा म्हणून अनेक आव्हानांना सारखंच सामोरं जावं लागलं. आणि त्यामुळेच वरील वाक्य सत्य ठरतं.
 
 
 
 
"मोठे नेहमीच चांगले असतील असं नाही, आणि आपण कितीही चांगले असलो तरी अनेकदा आपलेच लोक आपला विश्वासघात करतात.."

असं म्हणतात लहान मुलं मोठ्यांना आदर्श मानतात, आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेतात, मात्र दरवेळी मोठी लोक, मोठी माणसं चांगलेच असतील असं नाही, आज आपण पाहतो लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्यांमध्ये त्यांच्याच जवळच्या मोठ्या वयाच्या ननातेवाईकांचा संबंध असतो. सिम्बाच्या काकांनी म्हणजेच 'स्कार'ने त्याच्या निरागसतेचा, त्याच्या लहान वयाचा फायदा उचलत षडयंत्र रचून त्याच्या वडिलांना मारलं, त्याचा वडिलांचा आणि त्याचा विश्वासघात केला तसंच सिम्बाला आयुष्यभरासाठी एक पश्चाताप दिला. यावरुन विश्वास करताना विचार करायला हवा ही शिकवण देखील मिळते. तसंच आपण कितीही चांगले असलो तरी अनेकदा आपलेच लोक आपला विश्वासघात करतात असं सिद्ध देखील होतं.
आपली लोकं आपल्या पासून लांब गेलीत तरी त्यांची शिकवण आणि त्यांचा सहवास नेहमीच आपल्यासोबत असतो :

सिम्बाच्या वडिलांच्या जाण्यानं लगानग्या सिम्बाचं आयुष्यंत अस्ताव्यस्त होतं. मात्र मुफासाने त्याला समजावलेल्या गोष्टी, त्याची शिकवण नेहमीच सिम्बासोबत राहते, आणि त्यामुळेच सिम्बा सर्व संकटांचा सामना करत अखेर विजयी होतो. असंच असतं ना आपले लाडके, आपले लोक कितीही लांब गेले, नाहीसे झाले तरी देखील ते आपल्यात कुठेतरी असतातच.
“Being brave doesn’t mean you go looking for trouble” म्हणजेच "शूरवीर असण्याचा अर्थ हा नाही की आपण स्वत:हून संकटांना आमंत्रण द्यावं" :

मुसाफा लहानग्या सिम्बाला ही शिकवण देतो. आणि यामधील एकनएक शब्द खरा आहे. आजच्या जगात शौर्याच्या संकल्पनाच वेगळ्या झाल्या आहेत, लोकल वर स्टंट करणं, किंवा धबधब्यात सेल्फी किंवा तत्सम काहीही. खरं शौर्य हे नाहीच, स्वत:हून संकटांना आमंत्रण देणारा माणूस शूरवीर ठरत नाही, तो मूर्ख असतो. खरं शौर्य कुणाचा तरी जीव वाचवण्याच्या कामात येतं, जगासाठी काहीतरी चांगलं करण्याचा कामी येतं. आज 'द लॉयन किंग'ला २४ वर्षे झालीत. मात्र २४ वर्षांनंतर देखील सुद्धा सिम्बा आणि त्याच्या आयुष्याच्या माध्यमातून मिळालेल्या शिकवणी खूप बोलक्या आहेत, आजच्या परिस्थितीत अगदी चपखल बसतात, आणि आजही त्या तितक्याच खऱ्या ठरतात. मला सिम्बा खूप आवडतो, त्याची स्वत:शीच लढलेली लढाई प्रेरणादायी आहे, आणि त्याच्या माध्यमातून शिकलेल्या गोष्टींमुळे आपलं बालपण खरंच खूप सुंदर होतं याची जाणीव आजही मला आहे, आणि सदैव राहील.
 
निहारिका पोळ  
@@AUTHORINFO_V1@@