शिवचलनाच्या गौरवशाली इतिहासाची ओळख

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jul-2018
Total Views |


 
 
नाणीसंग्राहकांची आपल्याकडे काही कमी नाही. काही संग्राहक हे संख्येवर भर देतात तर, काही दर्जा किंवा विशिष्ट प्रकारावर! पण एकूणच पाहता संग्राहकांचा कल हा फक्त नाणी गोळा करण्याकडे असतो आणि इथेच आशुतोष इतरांपेक्षा वेगळा ठरतो.
 

एका सोप्या प्रश्नाचे उत्तर द्याल का? ‘तुमच्या आजूबाजूची अठरा वर्षांची मुले सध्या बहुतांशी काय करताना दिसतात?’ खरंच सोपे उत्तर आहे- 'एकतर व्हॉट्सअॅ्प, फेसबुक आदी सोशल मीडियावर हरवलेले दिसतात किंवा मित्रांसोबत ‘विरे दे वेडिंग’ किंवा ‘रेस थ्री’ यांसारख्या टुकार चित्रपटांमध्ये रमलेली असतात. नाही म्हणता थोडे-अधिकजण मोबाईल गेम्समधून सवड मिळाल्यास क्रिकेट नाहीतर फुटबॉल यासारखे मैदानी खेळ खेळताना आढळतात. आपण येथे तरुणांच्या समस्या व त्यावर चिंतन करण्यास बसलेलो नाही. परंतु सद्यस्थिती निश्चितच चिंताजनक आहे. असो, तर अशा या खुशालचेंडू, आयतोबा पिढीकडे पाहत असता, अठराच वर्षांच्या बारावी झालेल्या, नुकतीच मिसरूड फुटू लागलेल्या, एका अभ्यासू मराठी तरुणाचा व्यासंग हा नक्कीच ‘सुखद धक्का’ म्हणावा लागेल!

 

औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयातून विज्ञान शाखेत शिकणारा ‘आशुतोष सुनिल पाटील’ हाच तो अवलिया! ज्याने नाणीसंग्रहाला संशोधनाची जोड देऊन आपली एक खास ओळख निर्माण केली आहे! दोनेक वर्षांपूर्वी अपघाताने हाती पडलेल्या काही प्राचीन नाण्यांनी त्याला नाणी जमवण्याची मोहिनी घातली आणि आजच्या घडीला तब्बल पाच हजारांहून अधिक नाणी त्याच्या संग्रहाची शोभा वाढवत आहेत. तसे पाहता, नाणीसंग्राहकांची आपल्याकडे काही कमी नाही. काही संग्राहक हे संख्येवर भर देतात तर, काही दर्जा किंवा विशिष्ट प्रकारावर! पण एकूणच पाहता संग्राहकांचा कल हा फक्त नाणी गोळा करण्याकडे असतो आणि इथेच आशुतोष इतरांपेक्षा वेगळा ठरतो. केवळ नाणी जमा करत बसण्यात आत्मसंतुष्टी न मानता त्याने संग्रहवृद्धी करताकरता ज्ञानवृद्धी करण्याचे योजले आणि शैक्षणिक अभ्यास सांभाळून नाणकशास्त्राचा (न्युम्नॅस्टिक) अभ्यास सुरु केला. वाचनालये पालथी घातली. इतिहास संशोधकांच्या भेटी घेतल्या. धूळ खात पडलेल्या बखरी, शोधनिबंध, ग्रंथ यांचे अध्ययन व संकलन केले आणि साकार झाले- छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने हिंदवी स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणारे ‘स्वराज्याचे चलन’ हे नेटके पुस्तक!

 

अलिकडेच रायगडावर दिमाखात पार पडलेल्या शिवराज्याभिषेक सोहळयात खा. संभाजी छत्रपती यांच्या हस्ते हे आटोपशीर पण माहितीपूर्ण पुस्तक शिवचरणी अर्पण करण्यात आले. भारतखंडात देवाणघेवाण व्यवस्थेकडून विविध चलनांचा कसा विकास होत गेला आणि या प्रक्रियेमध्ये परकीय आक्रमकांनी कशी भूमिका बजावली, याची तोंडओळख करून देत या पुस्तकाच्या लिखाणाचे प्रयोजन लेखकाने कथन केले आहे. ग्रीक, कुषाण, शक, सातवाहन, क्षत्रप यांसारख्या राज्यकर्त्यांनंतर दिल्लीच्या सुलतानांनी व मुघलांनी प्रदीर्घ काळ हिंदुस्थानावर हुकूमशाही चालवत आपापली नाणी चलनात आणली. त्या-त्या राजानुसार नाणी कशी बदलत गेली, त्यावर देव-देवता, पशुपक्षी, निसर्ग आदिंपासून बारा राशी, कुराणातील वचने, खरोष्टी, ब्राह्मी, अरबी, शारदा अशा विविधप्रकरच्या लिप्या अशी स्थित्यंतरे कालानुरुपे कशी घडत गेली, याचा गोषवारा लेखकाने मोजक्या शब्दात मांडतात. संपूर्ण भारतात मुघल व बहामनी साम्राज्यामुळे त्रस्त रयतेच्या ‘दार उघड बये .. ‘ या हाकेला प्रतिसाद देत जगदंबेच्या कृपेने भोसल्यांची दारी, आई जिजाऊंच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला आणि हिंदवी स्वराज्य निर्मितीस सुरुवात झाली. स्वराज्याचा विस्तार होऊ लागल्यावर, त्याचे प्रतिनिधित्व करणारे चलन आणण्याचा छत्रपतींनी धाडसी निर्णय घेतला व तो प्रभावीरित्या अंमलात आणत, रूढ असलेल्या मुघली चलनाला आपल्या तांब्याच्या शिवराई व सोन्याच्या होनाद्वारे सडेतोड उत्तर दिले. हा सारा प्रवास वाचल्यावर महाराज खऱ्या अर्थाने कसे द्रष्टे होते, याची अनुभूती येते.

 

या पुस्तकात छत्रपती शिवरायांनी चलनात आणलेल्या विविध नाण्यांची सचित्र ओळख करून दिली आहे. सर्व छायाचित्रे रंगीत असून मुद्रणाचा दर्जा उल्लेखनीय आहे. शिवकालीन चलनपद्धती दक्षिण भारतातील १४ व्या शतकातील विजयनगर हिंदू साम्राज्याच्या चलन व्यवस्थेनुसार प्रेरित होती, मात्र, परिमाणे जरी विजयनगर पद्धतीवर आधारित असली तरी महाराजांनी प्रसारित केलेल्या नाण्यांवर देवदेवतांची चित्रे नव्हती तर ‘श्री राजा शिव छत्रपति’ हा स्वराज्याची ओळख देणारा मजकूर कसा अंकित केलेला होता, ही सारी माहिती रोमांचकारक ठरते. ब्रिटिश प्रतिनिधी हेन्रीने महाराजांपुढे मांडलेल्या व्यापारविषयक २० पैकी १९ मागण्या त्यांनी मान्य केल्या, परंतु ब्रिटिशांची नाणी स्वराज्यात चालवण्यास त्यांनी सपशेल नकार दिला. यामधून महाराजांची व्यापारविषयक दूरदृष्टी पण त्याचवेळी स्वचलनाविषयीचा अभिमान जाणवतो व शिवरायांसाठी ‘जाणता राजा’ या संबोधनाची यथार्थता पटते. यातूनच धडा घेत पुढे तीनशे वर्षानंतर इंग्रजांनी त्यांचे चलन रूढ व्हावे, यासाठी हे स्वराज्याचे लोकप्रिय चलन कसे बाद केले, याचीही माहिती पुस्तकात मिळते. दक्षिणेतील दिग्विजयानंतर जिंजी, तंजावर भागात चलनात आलेली कासू, फनम इत्यादी नाण्यांचाही लेखक सचित्र आढावा घेतात. शिवकाळात दिली जाणारी वेतने, राजधानी रायगडावर आलेल्या बांधकामांचा खर्च, सुरत येथे केलेल्या लुटीनंतर स्वराज्याच्या खजिन्यात समाविष्ट केलेली नाणी यांचीही अभ्यासपूर्ण नोंद वाचनीय आहे.

 

काही ठिकाणी लेखनाचा ओघ थोडासा भरकटल्यासारखा वाटतो व काही अंशी विषयांतर झाल्यासारखे वाटते. नाण्यांविषयी पुष्कळ माहिती असली तरी, रायगडाव्यतिरिक्त शिवरायांनी सुरू केलेल्या टाकसाळींची नोंद आढळत नाही. मात्र लेखकाचे वय व विषयाचे नाविन्य लक्षात घेता, त्याचा हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे! एकूण पाहता, सुमारे ९० पानांच्या या छोटेखानी पुस्तकात वाचकांसाठी बरीच माहिती असल्याने ते संग्राह्य झाले आहे.

 

स्वराज्याचे चलन - लेखक आशुतोष सुनिल पाटील (8698825074), कैलाश पब्लिकेशन्स, औरंगाबाद पृष्ठसंख्या ८८, मूल्य १९९/- रुपये

- माधव उपाध्ये (पीएच् .डी.)

@@AUTHORINFO_V1@@