प्रणवदांनंतर आता रतन टाटाही सरसंघचालकांसमवेत व्यासपीठावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jul-2018   
Total Views |


 
 
 
नाना पालकर स्मृती समितीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार


नागपूर : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नागपुरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात विशेष अतिथी म्हणून हजेरी लावून महिना उलटायच्या आतच आता ज्येष्ठ उद्योगपती व देशातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व असणारे रतन टाटाही संघ व्यासपीठावर उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे. मुंबई येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात ते सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्यासह विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या वृत्तामुळे देशातील तमाम तथाकथित 'सेक्युलर' मंडळींना पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार आहे.

 

रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक नाना पालकर यांच्या जन्मशताब्दी समारोहाचा समारोप कार्यक्रम परळच्या नाना पालकर रूग्णसेवा समितीद्वारे आयोजित करण्यात आला आहे. दि. २४ ऑगस्ट रोजी माटुंगा येथील यशवंत सभागृह येथे हा कार्यक्रम होणार असून सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, यावेळी विशेष अतिथी म्हणून टाटा उद्योगसमूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा उपस्थित राहणार आहेत. रतन टाटा यांच्या कार्यालयाकडूनही त्यांच्या उपस्थितीबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळालेला असल्याचे सदर कार्यक्रमाच्या आयोजकांकडून समजते. यामुळे जून महिन्याच्या प्रारंभी नागपूर येथे झालेल्या रा. स्व. संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रमाप्रमाणेच हाही कार्यक्रम देशाचे लक्ष वेधून घेणार, हे निश्चित.

 

यापूर्वीही, गेल्या अनेक दशकांपासून समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संघाच्या कार्यक्रमांना हजेरी लावली, संघाशी संवाद साधला, तो वाढवला. गेल्या काही वर्षांत संघाला समाजाकडून दिवसेंदिवस अधिकाधिक प्रतिसाद मिळत आहे. यामुळे 'संघविरोध' हाच प्रमुख अजेंडा असलेल्या देशातील तथाकथित धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी, डाव्या आदी मंडळींमध्ये स्पष्टपणे जाणवून येण्याइतपत अस्वस्थता दिसत आहे. प्रणव मुखर्जी यांच्यासारख्या काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने रेशीमबागेत संघाच्या व्यासपीठावर हजेरी लावताच या अस्वस्थतेचा उद्रेक पाहायला मिळाला. आता यानंतर देशातील अर्थजगत तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्येही आदराचे स्थान मिळवणारे रतन टाटा, देशाची 'आर्थिक राजधानी' असलेल्या मुंबईत संघ परिवाराच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. याबाबत कार्यक्रमाच्या आयोजकांकडून लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार असून या कार्यक्रमात रतन टाटा काय मत मांडतात, याविषयी आता अवघ्या देशाचे लक्ष लागलेले असणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@