नागपुरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jul-2018
Total Views |
  
 
 
 
 
नागपूर :  नागपूर शहरात मुसळधार पावसामुळे सखल भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मिशन मोडवर काम करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
 
नागपूर महानगरपालिकेतील सिटी कमांड ॲण्ड कंट्रोल या नियंत्रण कक्षाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी भेट देऊन शहराच्या विविध भागात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती घेतली. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात सातशे ठिकाणी ३ हजार ८०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून या कॅमेऱ्याद्वारे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागांची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच शहरात सत्तावीस ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे अडथळा निर्माण झाला आहे. अशा सर्व ठिकाणी तात्काळ पाण्याचा निचरा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले.
 
 
 
 
 
हवामान खात्याने पुढील चोवीस तासात अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे सखल भागात राहणाऱ्या सर्व नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देतानाच अतिवृष्टीमुळे बाधित कुटुंबांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून जवळ असलेल्या शाळांमध्ये तात्पुरती व्यवस्था करा. तसेच अतिवृष्टीची परिस्थिती हाताळण्यासाठी एनडीआरएफच्या चमूलाही व्यवस्थेसाठी तैनात करण्याची तयारी ठेवा. अतिवृष्टीमुळे बाधित होणाऱ्या रस्त्यांमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा चोवीस तास सज्ज ठेवा. कोणत्याही प्रसंगी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण चमू सज्ज राहील अशी दक्षता घ्या. असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
 
शहरातील विविध भागात पावसाचे पाणी शिरले असून अशा वस्त्यांमध्ये महानगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये अयोध्यानगर, सोमलवाडा, बॅनर्जी ले-आऊट, मानेवाडा, राजीव गांधीनगर, कन्नमवारनगर आदी शहरातील विविध भागांचा यामध्ये समावेश आहे. मोरभवन, सीताबर्डी आदी भागातही पाणी साचल्यामुळे वाहतूक थांबली आहे. नागपूर शहरात सकाळी ८ ते १२  वाजेपर्यंत १६० मिलिमीटर तसेच सीताबर्डी भागात १३२  मिलिमीटर, पारडी ६२  मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.  
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@