नवसंजीवनी देणारी ‘माऊली’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jul-2018   
Total Views |


 


रस्त्यावरच्या निराधार, मनोरुग्ण, अस्वच्छ महिलांना आपुलकीची फुंकर आणि मानसिक आधार दिला तो धामणे दाम्पत्याने... अशी ही सामाजिक, प्रेरणादायी कार्य करणारी देव माणसं...

 

डॉ. सुचेता व डॉ. राजेंद्र धामणे, व्यवसायाने दोघेही डॉक्टर... अहमदनगर शहरापासून वीस कि. मी अंतरावर नगर-मनमाड रस्त्यावरील शिंगवे हे त्यांचं गाव. स्वभाव संवेदनशील, इतरांच्या मदतीला नेहमीच तत्पर... आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो याची जाणीव आणि सोबत आईची शिकवण व दोघांचा एकमेकांवर असलेला विश्वास... अशा या महान जोडप्याची ही कहाणी. सहसा आपल्याला कुठे घाण दिसली की आपल्याला किळस येते, नकळत नाकावर रुमाल जातो, मात्र हे जोडपं गेल्या २० वर्षांपासून केसांच्या जटा झालेल्या, अंगावर धड कपडा नसलेल्या, घाणीने बरबटलेल्या, काय खातोय-काय पितोय याची शुद्ध नसलेल्या आणि मानवी वासनांधांला बळी पडलेल्या महिलांना घरी आणून स्वच्छ करून त्यांचा सांभाळ करत आहे. त्यांच्यावर उपचार करून जगण्याची नवी उमेद त्यांच्या जीवनात फुलवत आहे.

 

वैद्यकीय महाविद्यालयात असताना दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर प्रेम आणि प्रेमाचं रूपांतर लग्नात झालं. डॉ. राजेंद्र यांचे आई-वडील प्राथमिक शिक्षक होते. त्यांच्या आईला समाजकार्याची आवड होती. गोरगरीब मुलांना त्या मायेने शाळेत आणत. त्यांना आधार देत. त्यामुळे डॉक्टरांना समाजकार्याचा वारसा घरातूनच मिळाला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. एक दिवस हे दाम्पत्य स्कूटरवरून नगरला जाताना त्यांना रस्त्यात एक वेडसर व विकलांग महिला विष्ठा खाताना दिसली. दोघांच्या डोळ्यासमोरून हे चित्र हलेना, ही अवस्था पाहून दोघेही अस्वस्थ झाले आणि त्यांच्या आयुष्याचा हाच खरा ‘टर्निंग पॉईंट’ ठरला. यानंतर दोघांनी मनोमन निश्चय केला की, आपण या बेघरांची मदत करायची. त्यांना यातून बाहेर काढायचं आणि माणसात आणायचं. हे काम सोपं नव्हतं. मात्र, मनी ठाम निश्चय असेल तर असाध्य ते साध्य होण्यास वेळ लागत नाही. सुरुवातीला त्यांनी बेघर, मनोरुग्णांना अन्न पुरवायला सुरुवात केली. दिवसभरात तब्बल साठ ते सत्तर अनाथ, निराधार, अपंग, मनोरुग्णांना घरचं जेवण द्यायला सुरुवात झाली. याची सर्व जबाबदारी डॉ. सुचेता यांनी पार पाडली आणि ‘माऊली सेवा प्रतिष्ठान’ची सुरुवात झाली.

 

एक दिवस डॉक्टर बाहेर निघाले होते आणि त्यांना रस्त्यावर पडलेली एक वयस्कर महिला दिसली. नेहमीच्या सवयीप्रमाणे ते थांबले आणि तिची चौकशी केली. चौकशीतून लक्षात आलं की, ती वयस्क महिला मनोरुग्ण व अपंग असल्याने तिला रस्त्यावर आणून टाकलं होतं. संवेदनशील डॉक्टरांना हे पाहावलं नाही. त्यांनी ठरवलं की, यांना घरी घेऊन जायचं. अगोदरच ७० डब्यांचे काम होते. त्यात या आजीबाईंना सांभाळायचं म्हणजे जिकिरीचं ठरणार होतं. डॉ. राजेंद्र यांनी डॉ. सुचेता यांना फोन लावला. सगळी परिस्थिती कानावर घातली. डॉ. सुचेता यांनी क्षणाचाही विलंब न करता, त्या आजीबाईंना घेऊन यायला सांगितलं. यानंतर हळूहळू अशा निराधार आणि मनोरुग्ण महिलांची संख्या वाढत गेली. मनोरुग्ण महिला दिसली की, देशभरातून डॉक्टरांना फोन येतात किंवा लोक त्यांना ‘माऊली सेवा प्रतिष्ठान’मध्ये आणून सोडतात.

 

 

दिवसेंदिवस संख्या वाढल्याने या महिलांना सांभाळण्यासाठी आणि उपचारांसाठी जागा कमी पडू लागली. डॉक्टरांच्या वडिलांच्या नावावर सहा गुंठे जमीन शिंगवे येथे होती. त्यांनी वडिलांना ही जमीन या माऊलींच्या उद्धारासाठी मागितली. वडिलांनीही ती जमीन त्यांना देऊ केली. डॉक्टरांनी येथे छोटी इमारत उभी केली. यामध्ये या महिलांच्या राहण्याची व उपचारांची सोय करण्यात आली. अनेक आव्हानांना सामोरे जात त्यांनी हा प्रकल्प उभा केला असला तरी, समस्या कधी सुटत नाहीत. या महिलांना आणल्यानंतर अनेक आव्हानं असायची... कुणाची भाषेची समस्या, कुणाला बोलता यायचं नाही तर, काहींची स्मृती भ्रष्ट झालेली असायची. अशा परिस्थितीत त्यांना स्वच्छ करणं, त्यांची समस्या समजावून घेणं, योग्य उपचार करणं, मानसिक धक्क्यातून बाहेर काढणं, आपलेपणाची जाणीव निर्माण करून देणं अशा आदी गोष्टी होत्या. मात्र, या सगळ्यांवर या डॉक्टर दाम्पत्याने मात केली. आज या ठिकाणी एकूण १३० महिला व १९ मुले कायमस्वरूपी स्थायिक आहेत. या सर्वांची काळजी डॉ. सुचेता आणि डॉ. राजेंद्र आणि त्यांचा मुलगा किरण घेतात. आज याच माऊलीचा भाग म्हणून ‘मनगाव’ हा ६०० खाटांचा प्रकल्प उभा राहतोय. ‘माऊली’मध्ये कोणीही कर्मचारी नाही. येथे येऊन बऱ्या झालेल्या आणि कायमस्वरूपी स्थायिक झालेल्या महिलाच विविध कामे पाहतात. त्याचबरोबर बऱ्या झालेल्या महिलांची आवडनिवड ओळखून त्यांना प्रशिक्षण देण्यात येतं. त्यामुळे आज शेकडो महिला बऱ्या होऊन स्वावलंबी झाल्या आहेत. तर अनेकजणींचा त्याच्या घरच्यांनी स्वीकार केला आहे.

 

डॉ. सुचेता व डॉ. राजेंद्र धामणे यांच्या असामान्य कामाची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा ‘द वन इंटरनॅशनल ह्यूमॅनेटेरिअन’ पुरस्कार डॉ. राजेंद्र यांना मिळाला आहे. विशेष म्हणजे, हा मूळ पुरस्कार एक लाख डॉलरचा होता. मात्र, डॉक्टरांच्या असामान्य कामामुळे दीड लाख डॉलरचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर रा. स्व. संघ जनकल्याण समितीमार्फत देण्यात येणार स्वामी विवेकानंद पुरस्कार (२०१६) हा राज्यव्यापी पुरस्कार देण्यात आला आहे. त्याचबरोबर अनेक पुरस्कार त्यांना मिळाले मात्र, येणारी निराधार, मनोरुग्ण महिला बरी होते हा सर्वात मोठा पुरस्कार असल्याचे डॉ. राजेंद्र यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना सांगितले. अशा या असामान्य कर्तृत्व असणाऱ्या दाम्पत्याच्या कार्याला सलाम...!

- विजय डोळे

@@AUTHORINFO_V1@@