रुग्णालय नव्हे तुरुंगच !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2018
Total Views |

माजी पाक पंतप्रधान नवाज शरीफ रुग्णालयात दाखल

रुग्णालयातील शरीफ यांच्या वार्डला तुरुंग म्हणून घोषित 





इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना हृदयाच्या त्रासामुळे दाखल करण्यात आलेल्या इस्लामाबादमधील रुग्णालयाला पाकिस्तान सुरक्षा विभागाकडून 'सब-जेल' घोषित करण्यात आले आहे. शरीफ हे सध्या पोलिसांच्या कैदेत असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे रुग्णालयातील त्यांच्या वार्डमधील सुरक्षा वाढवण्यात आली असून शरीफ यांच्या वार्डला तुरुंग घोषित करण्यात आले आहे.

 
दरम्यान पाकिस्तान सुरक्षा विभागाच्या या निर्णयाला शरीफ यांच्या पक्षाकडून आणि समर्थकांकडून जोरदार विरोध केला जात आहे. शरीफ यांची प्रकृती खराब असल्या कारणाने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहे, असे असताना देखील सुरक्षा विभागाने केलेली घोषणा ही अत्यंत चुकीची आहे, असे संतप्त प्रतिक्रिया शरीफ समर्थकांनी दिली आहे. तसेच या विरोधात शरीफ यांच्या समर्थकांनी रूग्णालयाबाहेर ठिय्या मांडला असून या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे.

पनामा पेपर प्रकरणी तुरुंगवास भोगत असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना हृदयाचा त्रास होत असल्यामुळे इस्लामाबादमधील पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी मध्यरात्री शरीफ यांना अत्यंत त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले. यावेळी शरीफ यांच्या वार्डमधील इतर सर्व रुग्णांना दुसऱ्या वार्डमध्ये हलवण्यात आले. तसेच वार्डच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करून वार्डला 'सब-जेल' म्हणून घोषित करण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@