नेपाळमधील सर्व भारतीयांना सरकारकडून मदत : सुषमा स्वराज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2018
Total Views |




नवी दिल्ली :
कैलास-मानसरोवर यात्रेदरम्यान मुसळधार पावसामुळे नेपाळमध्ये अडकलेल्या सर्व भारतीय नागरिकांना भारत सरकार सर्व प्रकारची मदत करत असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व व्यवस्था तैनात करण्यात आली आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज दिली आहे. स्वराज यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली असून भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी नेपाळ सरकारबरोबर देखील संपर्क केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


भारतातून कैलास-मानसरोवर यात्रेसाठी तब्बल १४०० हून भाविक यंदा तिबेटला गेले आहेत. या यात्रेवर जात असताना मुसळधार पावसामुळे हे सर्व भाविक सिमिकोट, हिल्सा आणि तिबेटच्या भागामध्ये अडकून पडले आहेत. याची माहिती भारत सरकारला मिळाल्यानंतर भारत सरकारने तातडीने नेपाळमधील भारतीय दुतावाशी संपर्क साधत भाविकांच्या मदतीचे निर्देश दिले आहेत. यानंतर भारतीय राजदूतांनी यावर तातडीने कारवाई करत भाविकांच्या मदतीसाठी सर्व आवश्यक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. भाविकांच्या निवासाची व्यवस्था देखील करण्यात आली असून अनेक भाविकांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली आहे,अशी माहिती स्वराज यांनी दिली आहे.







याचबरोबर डोंगराळ भागामध्ये अडकलेल्या भाविकांच्या मदतीसाठी नेपाळ सरकारला लष्करी मदत देखील मागण्यात आली आहे. तसेच भारताच्या विविध भागांमधून आलेल्या भाविकांसाठी त्यांच्या मातृभाषेतून मदत मिळावी, यासाठी वेगवेगळ्या भाषांमधून हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.






@@AUTHORINFO_V1@@