आरक्षण हा घटनेचा ध्येयवाद : रमेश पतंगे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2018
Total Views |





नाशिक : ‘आरक्षण हा गरिबी निर्मूलन कार्यक्रम नाही. राज्यघटनेचा जो ध्येयवाद आहे, तो प्रत्यक्षात आणण्याच्या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणजे आरक्षण आहे’ असे प्रतिपादन हिंदुस्थान प्रकाशन समूहाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विचारवंत व पत्रकार रमेश पतंगे यांनी केले. नाशिकमधील भाजप नेते प्रभाकर शंकर तथा बंडोपंत जोशी स्मृती व्याखानप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पतंगे म्हणाले की, इतके टक्के आरक्षण द्या आणि ती इतकी वर्षे ठेवा, असे काहीही संविधानात म्हटलेले नाही. १८९५ मध्ये लोकमान्य टिळक यांनी होमरूल संविधान प्रथम तयार केले . त्यानंतर मोतीलाल नेहरू यांनी १८९७ मध्ये तसा प्रयत्न केला. पंडित जवाहरलाल नेहरू यांचेही यात मोठे योगदान होते. तेव्हाची काँग्रेस आणि आजची काँग्रेस यात फरक असून त्यावेळी घटना निर्मिती करण्यासाठी सर्व पंथाचे लोक एकत्र आले होते, असेही पतंगे यांनी यावेळी नमूद केले.

 

संविधानाच्या राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्त्वे विभागात कलम ४६ म्हणते, ”अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपूर्वक करील आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यांच्यापासून त्यांचे रक्षण करील, ही जबाबदारी संविधानाने शासनावर टाकलेली आहे. त्यानुसार शासन धोरण ठरवते,” असे पतंगे यांनी स्पष्ट केले. कोणालाही संविधान म्हणजे काय विचारले तर दोन मिनिटापेक्षा जास्त कोणी बोलू शकणार नाही. तरीही संविधान बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप होतो हे अत्यंत हास्यास्पद आहे असे त्यांनी स्पष्ट केले. पतंगे यांनी ब्रिटनची राज्यघटना, अमेरिकन राज्यघटना आणि भारताचे संविधान याबाबत सविस्तर माहिती देत इतिहासाला उजाळा दिला.

 

यावेळी दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणार्‍या सक्षम संस्थेस पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेच्या वतीने दिवाकर मुजुमदार, रघुनाथ विसपुते, अरविंद देशपांडे, रवी जोशी, प्रसाद देशपांडे, सुभाष प्रधान यांनी तो स्वीकारला. सक्षम संस्थेची माहिती दिवाकर मुजुमदार यांनी यावेळी दिली. यावेळी पतंगे यांचा परिचय उदय रत्नपारखी यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रणव जोशी यांनी केले. भाजपनेते लक्ष्मण सावजी यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. यावेळी आ. सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, संभाजी मोरुस्कर, दिनकर पाटील, माजी महापौर दशरथ पाटील, विजय साने, माजी आ. निशिगंधा मोगल, राजाभाऊ मोगल, प्रांत प्रचारप्रमुख दिलीप क्षीरसागर, रवींद्र सहस्त्रबुद्धे, बाबा फडके आदींसह शहरातील मान्यवर उपस्थित होते. आलेल्या मान्यवरांचे स्वागत जोशी कुटुंबीयांनी केले.

@@AUTHORINFO_V1@@