युद्ध अवकाशात सुरू...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2018   
Total Views |



सध्या शस्त्रांच्या निरनिराळ्या आणि अत्याधुनिक आवृत्त्या जगापुढे येत असतानाच अमेरिकेने मात्र सर्वांवर कडी करत थेट अवकाश सेना स्थापन करण्याची तयारी चालवली आहे. अमेरिकेने नुकतीच आपल्या सैन्य दलांची सहावी शाखा म्हणजे अवकाश बल (स्पेस फोर्स) उभे करण्याची घोषणा केली.

 

शस्त्रास्त्रांचा शोध लागल्यापासून सत्ताधीशांची शस्त्रे जवळ बाळगण्याची व त्याच्या वापरातून जगावर अधिराज्य गाजवण्याची महत्त्वाकांक्षा काही लपून राहिलेली नाही. आधुनिक काळात बंदुकांपासून रणगाडे, बॉम्ब, अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्बपर्यंत ही शस्त्रास्त्रांची स्पर्धा पोहोचली असून माझ्याचकडे अत्याधुनिक शस्त्रे असावी, ही भूकही वाढीस लागली आहे. शस्त्रास्त्रांच्या बळावर जगातल्या सर्वच सत्ताधीशांनी आपापले शस्त्रसामर्थ्य वाढवत जल, स्थल आणि वायु अशी सैन्यदलेही निर्माण केली. या शस्त्रस्पर्धेला कोणताही देश अपवाद नाही. शस्त्रांच्या स्पर्धेतून, जगावर राज्य करण्याच्या इर्ष्येतून पहिले आणि दुसऱ्या महायुद्धात झालेला नरसंहारही जगाने पाहिला. पण, सत्ताधीशांची शस्त्रस्पर्धेची भूक काही कमी होताना दिसत नाही. राष्ट्राच्या सार्वभौमत्वाच्या आणि जनतेच्या संरक्षणाच्या दृष्टीने शस्त्रे हवीतच, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. जगात शांतता नांदावी, अशी सर्वांचीच इच्छा असल्याचे म्हटले जाते. पण, ही शांतता तुमच्याकडे शस्त्रे नसतील तर तुम्ही निर्माण करू शकत नाही, हेही सत्य आहे. कारण जो बलवान असेल, त्याच्या नादी कोणी लागत नाही ना. त्याची कोण आगळीक काढतो? त्यामुळे शस्त्रे ही महत्त्वाचीच.

 

सध्या शस्त्रांच्या निरनिराळ्या आणि अत्याधुनिक आवृत्त्या जगापुढे येत असतानाच अमेरिकेने मात्र सर्वांवर कडी करत थेट अवकाश सेना स्थापन करण्याची तयारी चालवली आहे. अमेरिकेने नुकतीच आपल्या सैन्य दलांची सहावी शाखा म्हणजे अवकाश बल (स्पेस फोर्स) उभे करण्याची घोषणा केली. शिवाय अमेरिकेने आपल्या अवकाश बलासाठी तशाच प्रकारच्या शस्त्रांची निर्मिती करणार असल्याचेही सांगितले. अमेरिकेने आपल्या अवकाश बल उभारणीसाठी अर्थसंकल्पात अधिकाधिक तरतूद करणार असल्याचेही स्पष्ट केले, तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर जगभरात मात्र खळबळ उडाली. अवकाश बल स्थापन करण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली असली तरी त्याच्या उभारणीत अवकाशच मोठा अडथळा ठरण्याचीही शक्यता आहे. कारण अवकाशाला कोणत्याही लष्करी कारवायांसाठी वापरता येऊ शकत नाही. कारण अंटार्क्टिका, नॉर्वे या ठिकाणी जशी लष्करी कारवायांना मनाई आहे, तशीच ती अवकाशातही आहे. त्याचबरोबर अवकाशातले भौतिक वातावरणही लष्करी कारवायांसाठी योग्य नसल्याचे म्हटले जाते. ट्रम्प यांच्या अवकाश बल निर्मितीतील आणखी एक अडथळा म्हणजे स्पेसक्राफ्ट आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा आहे. त्यामुळे अमेरिकेला यावरही अधिक काम करावे लागेल, तसेच तांत्रिकदृष्ट्या ही योजना कशी सक्षम होईल, याचाही विचार करावा लागेल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या अवकाश बल निर्मितीच्या योजनेला संसद सदस्यांचा पाठिंबा आहे, त्याचबरोबर डेमोक्रॅटिक सदस्यांनीही त्याला विरोध केलेला नाही. मात्र, डेमोक्रॅट सदस्य यासाठी निधी मिळू नये म्हणून प्रयत्न करण्याचीही शक्यता व्यक्त केली जाते. विशेष म्हणजे अमेरिकेने अशाप्रकारे अवकाशसंबंधी एखादी घोषणा करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. कित्येक वर्षांआधी अमेरिकेने चंद्रावर भीषण संहार करण्याची क्षमता असलेल्या बॉम्बनिर्मितीची कल्पना मांडली होती. पण, जगभरातून या योजनेला मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्याने अमेरिकेने ती योजना गुंडाळली तर अवकाश बल निर्मितीच्या क्षेत्रात चीन हा दोन वर्षांपासूनच काम करत आहे. सध्या या दोन्ही देशांत व्यापारयुद्धाचा भडका उडालेला दिसत असतानाच अवकाशातही या दोन देशांची स्पर्धा सुरू झाल्याचे दिसते. भारताने मात्र, अवकाशातील शस्त्रस्पर्धेला विरोध केला आहे.

@@AUTHORINFO_V1@@