धुळे हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2018
Total Views |



नागपूर : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे झालेल्या हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच, “जनतेने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच अफवांना चालना देणारे संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवू नयेत. अफवा पसरविणार्‍यांवरही कडक कारवाई करण्यात येईल,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

नागपूर येथे होणार्‍या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला येथील रामगिरी या शासकीय निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतकरी कर्जमाफी संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “आतापर्यंत 46 लाख खाती पूर्ण झाली असून ३८ लाख शेतकर्‍यांच्या खात्यांमध्ये कर्जमाफीचे पैसे जमा झाले आहेत. शेवटच्या पात्र शेतकर्‍याला कर्जमाफी मिळेपर्यंत ही योजना सुरू राहील.” धुळ्याच्या घटनेनंतर अफवांचे पेव फुटले आहे. त्याविरुद्ध पोलिसांनी मोहीम उघडली आहे. २३० ठिकाणी बोर्ड लावून जनजागृती करण्यात येत आहे. सोशल मीडियावरही याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. अफवा पसरवणे हा गुन्हा आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. जे अफवा पसरवित आहेत त्यांच्याबद्दल पोलिसांना कळवावे,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले. “धुळे घटनेतील आरोपींविरुद्धचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल,”असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. “मुंबईतील अंधेरी येथे आज झालेली पुलाची दुर्घटना गंभीर आहे. एल्फिन्स्टन येथील पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्व रेल्वे पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अंधेरीतील पुलाचे असे ऑडिट झाले होते का? याची चौकशी केली पाहिजे,” असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

 

जमिनीचे सर्वाधिकार जिल्हाधिकार्‍यांना

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या नवी मुंबई येथील जमिनीसंदर्भात विरोधी पक्षांनी केलेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत. या जमिनीसंदर्भातील सर्वाधिकार हे जिल्हाधिकार्‍यांना आहेत. याची कोणतीही फाईल मंत्रालयात येत नाही. यासंदर्भात विरोधी पक्षांना पाहिजे असेल ती चौकशी करण्यास शासन तयार आहे. विरोधी पक्षांमार्फत अशा पद्धतीने विनाकारण अफवा पसरविण्यात आल्यास त्याला वस्तुस्थितीने उत्तर दिले जाईल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@