महामार्गाच्या समांतर रस्त्यांसाठी १०० कोटींच्या कामाला मंजुरी

    29-Jul-2018
Total Views |

एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला यश

 
जळगाव :
महामार्ग रुंदीकरणाच्या कामात जळगाव शहरातून जाणार्‍या महामार्गाला बांभोरी नाका ते कालंका माता मंदिर दरम्यानच्या पर्यायी समांतर रस्त्यासाठी १०० कोटी १८ लाख रु. च्या खर्चाच्या कामाला तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे माजी महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आ.एकनाथराव खडसे यांनी शनिवारी सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी खासदार ए.टी.पाटील, खासदार रक्षाताई खडसे, खासदार अमर साबळे, आमदार सुरेश भोळे, पक्षाचे जिल्हा संघटनमंत्री प्रा.डॉ.सुनील नेवे आदी उपस्थित होते. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (नवी दिल्ली) च्या कार्यालयाच्या अधिकृत मंजुरी पत्राची प्रतही यावेळी सादर करण्यात आली.
 
 
जळगाव शहरातील सध्या आस्तित्वात असलेल्या महामार्गासंबंधीच्या आराखड्याला २१ नोव्हेंबर २०१७ च्या प्राधिकरणार्‍या सभेत तत्वत: मान्यतेचा निर्णय झाला होता. गेल्या सव्वा वर्षापासून आपण आणि खासदार ए.टी.पाटील, खासदार रक्षाताई खडसे याबाबत प्राधिकरणाच्या बैठकीत आणि ना.नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करीत होतो. मागील महिन्यातही आम्ही तिघांनी दिल्लीत त्यांना प्रत्यक्ष भेटत मंजुरीची विनंती केली होती. तेव्हा त्यांनी दिलेल्या अभिवचनाही ही पूर्तता झाली आहे. २७ जुलै २०१८ रोजी हे मंजुरीची पत्र देण्यात आले आहे. ई-मेलद्वारे त्याची प्रत येथे आज प्राप्त झाली, अशी माहितीही आ.खडसे यांनी दिली.
 
 
यात उड्डाणपूल, समांतर रस्ते, भुयारी मार्ग इ.चाही समावेश आहे. शिवाय ३९ कोटी रु. जादा मंजूर करण्यात आले आहेत. मनपाची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे या मनपा हद्दीतील या मार्गाच्या सुधारणा व देखभालीची जबाबदारी मनपा घेऊ शकत नसल्याने खंडपीठात मनपातर्फे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आणि अखेर हा निर्णय झाला आहे. जळगावकरांचा भविष्यात टोल कर द्यावा लागणार नाही, यासाठीही यशस्वी प्रयत्न करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
 
 
पथदिवे एलईडीचे, शहर दत्तक योजना
वीज बचतीचीसाठी अभिनव योजनेअंतर्गत जळगाव शहरातील पथदिवे एलईडीचे असतील. ७ वर्षासाठी ही योजना कार्यवाहीत असेल. मनपाला शून्य खर्चात ही सेवा मिळणार आहे, यामुळे मनपाच्या वीजबिलात ३०-४० टक्के बचत होणार आहे. अशीच योजना सेवा भुसावळ, सावदा, बोदवड, मुक्ताईनगर शहरातही देण्याबाबत केंद्र सरकार लवकरच करार करणार आहे.
 
 
केळी उत्पादकांना दिलासा, विमा भरपाई लवकरच
जळगाव जिल्ह्यातील वादळग्र्रस्त केळी उत्पादकांना विमा कंपनीतर्फे सुमारे १०० कोटी रु.भरपाईची रक्कम पुढील आठवड्यापासून अदा व्हायला सुरुवात होईल, काही प्रकरणात तांत्रिक पूर्ततेनंतर भरपाई मिळेल, अशी माहितीही देण्यात आली. याबाबत आमदार हरीभाऊ जावळे यांनीही आमच्या समवेत उच्च पातळीवर पाठपुरावा केला, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. मेहरुण तलावाच्या सुशोभिकरणासाठी ना.जयकुमार रावल यांच्या सहकार्यामुळे जादा निधी मिळेल. ४ कोटी ९६ लाख रु. मंजूर पैकी ५० लाख रु. बांधकाम विभागाकडे प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली.