इंदिरा गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

डॉ. माधव गोडबोले हे कर्तव्यदक्ष व प्रामाणिक आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. नोकरशहा म्हणून त्यांच्या 33 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषविली आहेत. आणिबाणीच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे ते सचिव होते. पी. व्ही. नरिंसह राव पंतप्रधान असताना शंकरराव केंद्रात गृहमंत्री होते. त्या वेळी डॉ. गोडबोले केंद्रीय गृह सचिव होते. 1992 साली बाबरी मशीद पाडल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. इतकी विस्तृत आणि महत्त्वाच्या पदांवर सेवा झाल्यामुळे त्यांच्याकडे अनुभवसमृद्धी आहे. कदाचित त्यामुळेच, इंदिरा गांधी यांच्या 2017 सालच्या जन्मशताब्दी वर्षात, त्यांनी इंदिरा गांधींवर एखादे पुस्तक लिहावे म्हणून राजहंस प्रकाशनने त्यांना आग्रह केला असावा. त्या आग्रहाला मान देत डॉ. गोडबोल यांनी ‘इंदिरा गांधी : एक वादळी पर्व’ नावाचे पुस्तक लिहिले. त्यात त्यांनी त्यांच्या आकलनानुसार इंदिरा गांधींच्या व्यक्तिमत्त्वाला शब्दरूप देण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकाच्या संदर्भात रेडिफमेल डॉट कॉमच्या पत्रकार अर्चना मसीह यांनी त्यांची मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीत डॉ. गोडबोले यांनी इंदिरा गांधींच्या विविध पैलूंना उघड केले आहे. यात इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्या एकूणच कार्यशैलीची तुलनाही ओघाने आली आहे आणि ती महत्त्वाची आहे.
 
 
 
डॉ. गोडबोले यांनी इंदिरा गांधींच्या हाताखाली थेट काम केले नसले, तरी यशवंतराव व शंकरराव चव्हाण यांच्यासोबत काम करताना, पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांच्या कार्यशैलीची त्यांना जवळून माहिती होत होती. त्या आधारे त्यांनी आपले निष्कर्ष मांडले आहेत. गोडबोले म्हणतात की, इंदिरा गांधींचा काश्मिरी नोकरशहांवर सर्वाधिक विश्वास होता. त्यांच्या विश्वासू नोकरशहांमध्ये पी. एन. हक्सर, डी. पी. धर, पी. एन. धर, टी. एन. कौल व आर. एन. काव या काश्मिरींचा समावेश होता आणि हे ‘पंच पांडव’ म्हणून ओळखले जायचे. इंदिरा गांधींना ‘व्यक्तिनिष्ठ नोकरशाही’ पसंत होती. त्यामुळे अधिकार्यांनी त्यांच्याशी आत्यंतिक निष्ठा ठेवावी, अशी त्यांची अपेक्षा असायची. स्वतंत्र, अराजकीय नोकरशाही त्यांनी संपवून टाकली. त्याची फळे आपण आजही भोगत आहोत, असे गोडबोले म्हणतात. इंदिरा गांधी निर्दयी, हुकूमशाही वृत्तीच्या आणि गूढ व्यक्तिमत्त्वाच्या होत्या. त्यांच्या भोवती असलेल्या प्रत्येकाबाबत त्या संशयी होत्या. त्यांनी कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत लोकशाही नष्ट केली. राज्यांचे कॉंग्रेसी मुख्यमंत्रीदेखील त्या मनमानी पद्धतीने निवडत असत. इंदिरा गांधींची कारकीर्द म्हणजे फक्त एका महिलेचे राज्य होते. त्यांनी उघडपणे घराणेशाही स्थापन केली.
 
इंदिरा गांधींच्या काही महत्त्वपूर्ण निर्णयांवर बोलताना डॉ. गोडबोले म्हणतात- त्यांच्या प्रत्येक निर्णयांचे चट्टे भारतीय राजकारणावर उमटले आहेत. बँकांचे राष्ट्रीयीकरण हा तर शुद्ध राजकीय निर्णय होता. यानंतर बँकांचे जे राजकीयीकरण झाले, त्याने तर भारत एक ‘बनाना रिपब्लिक’ बनला. बांगलादेश युद्धात पाकिस्तानचा निर्णायक पराभव केल्यानंतर, काश्मीर प्रश्न कायमचा संपवून टाकण्याची नामी संधी चालून आली होती. परंतु, इंदिरा गांधींनी ही संधी सिमला करार करून गमविली, असेही गोडबोले यांचे मत आहे. ऑपरेशन ब्लू स्टार टाळता आले असते आणि आणिबाणी लागू करणे, त्यांच्या हुकूमशाही राजवटीचा शिखरिंबदू होता, असे गोडबोले मानतात. इंदिरा गांधींच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात वाईट पैलू म्हणजे कुठल्याही चुकीची, गैरनिर्णयाची त्या जबाबदारी घेत नसत. आणिबाणीत त्यांनी नागरिकांवर केलेल्या अत्याचाराबद्दल त्यांना कुठलीही शिक्षा होऊ शकली नाही. कारण 1980 साली सत्तेवर आल्यावर त्यांनी शाह कमिशन गुंडाळले आणि त्याचे सर्व दस्तावेज नष्ट करून टाकले. गोडबोलेंच्या मते इंदिरा गांधींना खर्या अर्थाने शिक्षा करायची झाली असती, तर त्यांना निवडणुकीला उभे राहण्यास तसेच मतदान करण्यास 12 वर्षांपर्यंत बंदी घालायला हवी होती.
 
 
न्यायव्यवस्थेलाही त्यांनी स्वत:च्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न केला. हे लक्षात येताच सर्वोच्च न्यायालयाने, न्यायाधीश नेमण्याचे अधिकार स्वत:कडे घेतले आणि संविधानात बदल करण्याच्या संसदेच्या अधिकारांवर मर्यादा घातली. अन्यथा सर्वोच्च न्यायालयाला असे करण्याची काही गरज नव्हती. गोडबोले म्हणतात की, लोकशाहीची ताकद त्याच्या संविधानात्मक संस्थांमध्ये असते. इंदिरा गांधींनी या सर्व संस्था कमकुवत केल्या आणि त्यांचे अवमूल्यन केले.
पत्रकार अर्चना मसीह यांनी डॉ. गोडबोले यांना इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यास सांगितले. त्यावर गोडबोले म्हणतात की, इंदिरा गांधी व नरेंद्र मोदी दोघेही करिष्मा, जनतेवर पकड आणि संपूर्ण भारताचा पाठिंबा असलेले नेते होते/आहेत. परंतु, त्यांची कार्यशैली मात्र अगदी विरुद्ध आहे.
 
 
 
पश्चिमेकडील लोकशाही व्यवस्थेप्रमाणे आपल्या भारतातही सर्व निर्णयांमध्ये पंतप्रधान कार्यालयाचा महत्त्वाचा सहभाग असतो. कॅबिनेट हे पंतप्रधानांच्या मदतीसाठी असते. पंतप्रधानच बहुतेक निर्णय घेतात. इंदिरा गांधी व नरेंद्र मोदी यांच्यात एवढेच एक साम्य आहे. मोदींनी प्रयत्नपूर्वक स्वत:ला प्रामाणिक ठेवले आहे. आपल्या कार्याप्रती त्यांची निष्ठा वादातीत आहे. परंतु, इंदिरा गांधींनी भ्रष्टाचाराला राजमान्यता मिळवून दिली होती. इंदिरा गांधींनी घराणेशाहीची आधारशिला ठेवली, तर मोदींना कुटुंबच नाही. इंदिरा गांधींना केवळ संसदेतच दोनतृतीयांश बहुमत नव्हते, तर बहुतेक राज्यांमध्येही कॉंग्रेसचीच सरकारे होती. त्यामुळे संविधानात आवश्यक त्या दुरुस्त्या किंवा सुधारणा करणे इंदिरा गांधींना सहजशक्य होते. परंतु, त्या काळी देशासमोर असलेल्या पाच प्रमुख मुद्यांवर त्यांनी जाणूनबुजून निर्णय घेतला नाही. उदाहरणार्थ, निवडणूक सुधारणा, पक्षांतराच्या राजकारणाला समाप्त करणे, लोकपालांची नियुक्ती, काळ्या पैशांच्या विरुद्ध निर्णायक कारवाई आणि राजकारणापासून धर्माला वेगळे करणे. हे सोडून, इंदिरा गांधींनी संविधानात घातक असे बदल करून बहुमताचा अयोग्य वापर केला. याच्या उलट नरेंद्र मोदींचे आहे. मोदींनी राजकीय इच्छाशक्तीचा तसेच धाडसाचा परिचय देत नोटबंदी, जीएसटी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगातून निर्गुंतवणूक, बेनामी व्यवहारांना नष्ट करणे, दिवाळखोरीच्या कायद्यात आवश्यक बदल, कोळसा खाणींचे खाजगीकरण इत्यादी महत्त्वाच्या सुधारणा केल्या आहेत.
 
डॉ. माधव गोडबोलेंची ही निरीक्षणे आजच्या काळात अतिशय महत्त्वाची यासाठी आहेत की, आज कॉंग्रेस पक्ष सातत्याने इंदिरा गांधींचा उदोउदो करीत असतो. त्यामुळे इंदिरा गांधी या मुळात कशा होत्या आणि त्यांची कारकीर्द देशासाठी किती घातक सिद्ध झाली, हे या पुस्तकातून लक्षात येईल. प्रदीर्घ काळ सत्तेत असताना कॉंग्रेस पक्षाने कम्युनिस्ट इतिहासकार, विचारवंत, साहित्यिकांना भारताचे बौद्धिक क्षेत्र आंदण म्हणून देऊन टाकले होते. या उपकाराची परतफेड या सर्व विचारवंतांनी अत्यंत प्रामाणिकपणे केली आहे. त्यामुळे भारतातील बहुतेक सर्व पिढ्यांमध्ये इंदिरा गांधींचे एक विलोभनीय, करारी, लोकशाहीवर नितांत श्रद्धा असणारे व्यक्तिचित्र रेखाटले गेले आहे. ते किती भ्रामक आहे, हे बर्याच जणांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांना ‘संघी’ किंवा ‘जातीयवादी’ बिरुदे लावून हिणवण्याचा, तसेच वैचारिक क्षेत्रातून बहिष्कृत करण्याचा पुरेपूर यशस्वी प्रयत्न करण्यात आला. परंतु, डॉ. माधव गोडबोलेंच्या बाबतीत या वामपंथीयांची ही अस्त्रे निकामी ठरणार आहेत. पं. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव ते सोनिया गांधींच्या कॉंग्रेस पक्षाने भारताचे अपरिमित नुकसान केले आहे. भारतातील लोकशाही कमकुवत करण्याचे पाप केले आहे. लोकशाहीचा बुरखा पांघरून देशात घराणेशाही स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे. हे वास्तव लोकांसमोर येणे आवश्यक आहे. त्यामुळेच गोडबोलेंच्या या पुस्तकाचे महत्त्व अधिक आहे.
@@AUTHORINFO_V1@@