पंतप्रधानपदाची उमेदवारी आणि कॉंग्रेसची कोलांटउडी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

कॉंग्रेस कार्यसमितीच्या रविवारी झालेल्या बैठकीत, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे या निर्णयाची शाई वाळत नाही तोच कॉंग्रेसने कोलांटउडी घेत, रा. स्व. संघाची पार्श्वभूमी सोडून अन्य कोणत्याही पक्षाचा नेता आम्हाला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून मान्य राहील, असे स्पष्ट केले. 48 तासांच्या आत कॉंग्रेसवर ही वेळ का आली, याचा विचार करण्याची गरज आहे.
 
 
कॉंग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत अन्य समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचा सर्वाधिकार अध्यक्ष राहुल गांधी यांना देण्यात आला, त्याच वेळी कॉंग्रेस पक्षाचा पंतप्रधानपदाचा चेहरा राहुल गांधी राहतील, असे स्पष्ट करण्यात आले. मुळात या गोष्टीत विरोधाभास आहे. 2019 ची लोकसभा निवडणूक कॉंग्रेस स्वबळावर लढवू शकत नाही, स्वबळावर निवडणूक लढवली तरी सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले बहुमत प्राप्त होणार नाही, याची अप्रत्यक्ष कबुली आघाडीच्या राजकारणाचा पुरस्कार करण्यातून कॉंग्रेसने दिली होती. त्यामुळे समविचारी पक्षांशी आघाडी करण्याबाबतचा सर्वाधिकारही राहुल गांधी यांना कॉंग्रेस कार्यसमितीने दिला होता. समविचारी पक्षांशी आघाडी करण्याची कॉंग्रेसची तयारी असताना कॉंग्रेसने एकतर्फी आपल्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची घोषणा का केली, असा प्रश्न पडतो.
 
 
पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी पात्र आहेत का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. घराणेशाहीच्या एकमेव निकषाचा विचार केला तर राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी पात्र ठरतात. कारण त्यांचा जन्म नेहरू-गांधी घराण्यात झाला आहे. पंतप्रधानपदांची गौरवशाली परंपरा त्यांच्या पाठीशी आहे. या घराण्याचा वारस असलेले राहुल गांधी आता कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व करत असताना पंतप्रधानपदाचे स्वप्नही पाहू लागले आहेत. मध्यंतरी राहुल गांधी यांनी आपण पंतप्रधानपद सांभाळण्यास तयार असल्याचे विधान करून सर्वांना गोंधळात टाकले होते.
 
 
मुळात कॉंग्रेस कार्यसमितीने राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करत आपले कर्तव्य पार पाडले होते. कॉंग्रेस पक्षात पंतप्रधानपदासाठी दुसरा एकही पात्र उमेदवार नाही. गांधी-नेहरू घराण्याच्या बाहेरच्या व्यक्तीला पंतप्रधान करण्याची चूक कॉंग्रेस पक्षाने एकदा नाही तर दोनदा केली. पहिल्यांदा ती पी. व्ही. नरिंसह राव यांच्याबाबतीत झाली, दुसर्यांदा ती डॉ. मनमोहनिंसग यांच्या संदर्भात झाली. मुळात त्या वेळी ती चूक कॉंग्रेस पक्षाने केली असली, तरी त्याची मोठी किंमत नरिंसह राव यांना चुकवावी लागली. नरिंसह राव यांनी पाच वर्षे, तर डॉ. मनमोहनिंसग यांनी दहा वर्षे देशाचे पंतप्रधानपद भूषवले. यावेळी कॉंग्रेस पक्षाने राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार आधीच जाहीर केले.
कॉंग्रेसला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळाले, तर राहुल गांधी यांना पंतप्रधान होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. मात्र, राहुल गांधी यांच्या दुर्दैवाने नजीकच्या काळात तरी कॉंग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची कोणतीच शक्यता नाही. त्यामुळेच देश राहुल गांधीसारख्या ‘नव्या दमाच्या’ पंतप्रधानाला मुकणार आहे. जेव्हा राहुल गांधी पंतप्रधान वा मंत्री होऊ शकत होते, तेव्हा ते झाले नाही. राहुल गांधींना आपल्या मंत्रिमंडळात मंत्री करण्याचा आग्रह डॉ. मनमोहनिंसग यांनी अनेकदा धरला होता, त्याचप्रमाणे राहुल गांधींसाठी पंतप्रधानपद सोडण्याची तयारीही त्यांनी दर्शवली होती. राहुल गांधींची जेव्हा इच्छा नव्हती, तेव्हा पंतप्रधानपद त्यांच्याकडे चालत आले होते, आता राहुल गांधींची इच्छा आहे, तर पंतप्रधानपद त्यांना हुलकावण्या देत आहे. कारण पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांना कॉंग्रेसच्या नेत्यांनी स्वीकारणे पुरसे नाही, तर अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही स्वीकारणे आवश्यक आहे. जनता दल धर्मनिरपेक्षतेचे नेते आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी मात्र पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. मात्र, जदसे सोडला तर अन्य कोणत्याही पक्षाने पंतप्रधानपदाचे नेते म्हणून राहुल गांधी यांच्या नावाला मान्यता दिलेली नाही. देवेगौडा यांचा राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यामागे राजकीय स्वार्थ आहे. कर्नाटकात देवेगौडापुत्र एच. डी. कुमारस्वामी कॉंग्रेसच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री आहेत.
राजदचे तेजस्वी यादव यांनी पंतप्रधानपदासाठी आपल्याला राहुल गांधी यांच्यासह अन्य कोणताही नेता मान्य राहील, अशी नरो वा कुंजरोवा भूमिका घेतली आहे. अशी भूमिका घेऊन राजदने राहुल गांधी यांच्या नावाला विरोध केला की पाठिंबा दिला, याचा आता शोध घेतला जात आहे.
राहुल गांधी यांच्या नावाला कोणत्याच पक्षाचा पाठिंबा मिळणार नाही, याची कॉंग्रेसचीही खात्री पटली आहे. त्यामुळेच रा. स्व. संघाची पार्श्वभूमी सोडून अन्य कोणत्याही पक्षाचा नेता पंतप्रधानपदासाठी आपल्याला मान्य राहील, असे कॉंग्रेस पक्षाने स्पष्ट केले. याचा अर्थ 2019 मध्ये कॉंग्रेस स्वबळावर सत्तेत येणार नाही आणि राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही, हे कॉंग्रेस पक्षाने मान्य केले आहे.
2004 मध्ये श्रीमती सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपदाचा त्याग केला होता, आता 2019 मध्ये राहुल गांधी न मिळणार्या पंतप्रधानपदाचा त्याग करत दुसर्या नेत्याला पाठिंबा द्यायला तयार झाले आहेत. राहुल गांधी यांच्या कथित त्यागाचे नगारे कॉंग्रेस पक्षतर्फे आता वाजवले जातील. पंतप्रधानपदासाठी विरोधी पक्षांत अनेक उमेदवार आहेत, विशेष म्हणजे हे सर्व उमेदवार वयाच्या तसेच राजकीय अनुभवाच्या बाबतीत राहुल गांधी यांना भारी ठरणारे आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवारही पंतप्रधानपदासाठी कित्येक वर्षांपासून उत्सुक आहेत. अशी वेळच आली तर विरोधी पक्षाचे सर्वमान्य उमेदवार म्हणून शरद पवार यांचे नाव समोर आले तर कोणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक चर्चा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या नावाची आहे. पंतप्रधानपदासाठी कोणा महिलेचे नाव समोर आले तर राहुल गांधी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतील का, असा प्रश्न विचारला असता, रा. स्व. संघाची पार्श्वभूमी असलेल्या पक्षाचा नेता वगळता अन्य कोणत्याही पक्षाच्या नेत्याला पंतप्रधानपदी पाहण्याची आमची तयारी असल्याचे कॉंग्रेस पक्षाने स्पष्ट केले आहे.
रा. स्व. संघाची पार्श्वभूमी असलेल्या नेत्याला पंतप्रधानपदासाठी कॉंग्रेस पक्षाच्या पाठिंब्याची गरजच नाही. आतापर्यंत दोनदा रा. स्व. संघाची पार्श्वभूमी असलेले नेते पंतप्रधान झाले. पहिले म्हणजे अटलबिहारी वाजपेयी आणि दुसरे म्हणजे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी. जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने 2014 मध्ये रा. स्व. संघाची पार्श्वभूमी असलेला नेता पंतप्रधान झाला, आणि 2019 मध्येही होणार आहे.
 
 
भाजपाच्या विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या द्वेषातून कॉंग्रेस पक्षाने अशी भूमिका घेतली असल्याचे दिसते आहे. नरेंद्र मोदी सोडून अन्य कोणत्याही पक्षाचा नेता पंतप्रधान झाला तरी चालेल, त्याला कॉंग्रेस पक्ष पाठिंबा देईल, अशी कॉंग्रेसची भूमिका दिसते आहे. नरेंद्र मोदींवर जेवढी विषारी टीका कॉंग्रेस पक्षाने आतापर्यंत केली तेवढी आतापर्यंत कोणत्याच दुसर्या पक्षाच्या पंतप्रधानावर झाली नसावी. मात्र, कॉंग्रेस पक्षाच्या टीकेने काही होणार नाही.
 
 
लोकशाहीत जनतेची इच्छाच अंतिम असते. जनता ज्याला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पसंत करेल, तोच देशाचा पंतप्रधान होत असतो. 2014 मध्ये कॉंग्रेसचा प्रखर विरोध असतानाही जनतेने नरेंद्र मोदींना प्रचंड बहुमताने निवडून दिले, 2019 मध्येही जनता नरेंद्र मोदींना त्यापेक्षा जास्त बहुमताने निवडून देणार आहे. तोपर्यंत राहुल गांधी पंतप्रधानपदाची स्वप्नं पाहू शकतात. तो त्यांचा अधिकार आहे, त्यापासून कोणीही त्यांना रोखू शकत नाही.
 
 
श्यामकांत जहागीरदार
9881717817
@@AUTHORINFO_V1@@