आमी बाजेय कोठा बोली ना...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2018   
Total Views |


 

ममता बॅनर्जी यांनी शहीद दिनानिमित्त कोलकात्यात शक्तिप्रदर्शन केले. आपल्या ५२ मिनिटांच्या भाषणातील बहुतांश वेळ त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करण्यात घालविला. भाजपने २०१४ च्या गणितावर अविश्वास ठराव फेटाळून लावला असला तरी २०१९ च्या निवडणुकीत त्या पक्षाची अवस्था अत्यंत वाईट होईल, असे भविष्य त्यांनी वर्तविले.

 

या लेखाचे शीर्षक आहे बंगाली भाषेतील. अर्थात, ‘मी बिनबुडाची वक्तव्ये करीत नाही.हे कोणाचे वाक्य असू शकेल हे वेगळे सांगायला नकोच. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मागील आठवड्यात कोलकाता येथे आयोजित सभेत, विविध राज्यांसंदर्भात जी भविष्यवाणीकेली ती सांगताना वरील वाक्य उच्चारले. लोकसभेच्या २०१९ साली होणाऱ्या निवडणुकीत त्यांनी काही राज्यांसंदर्भात भविष्यवाणी केली आणि ती करताना, “माझे शब्द लक्षात ठेवा,” हे सांगण्यासही त्या विसरल्या नाहीत. लोकसभेतील अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेल्यानंतर तोंडघशी पडलेल्या विरोधकांनी जी सारवासारव करणे चालू केले आहे, त्यातलाच हा प्रकार असल्याचे समजायला हरकत नाही. ममता बॅनर्जी यांनी शहीद दिनानिमित्त कोलकात्यात शक्तिप्रदर्शन केले. आपल्या ५२ मिनिटांच्या भाषणातील बहुतांश वेळ त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करण्यात घालविला. भाजपने २०१४ च्या गणितावर अविश्वास ठराव फेटाळून लावला असला तरी २०१९ च्या निवडणुकीत त्या पक्षाची अवस्था अत्यंत वाईट होईल, असे भविष्य त्यांनी वर्तविले. आपल्या भाषणातून त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात आपल्याला महत्त्वाची भूमिका बजावायची आहे, हेही स्पष्टपणे सूचित केले.

 

ममता बॅनर्जी यांनी या सभेत भाजप, संघ परिवार यांच्याविरुद्ध नेहमी केल्या जाणाऱ्या आरोपांचा पाढा वाचला. ममता बॅनर्जी यांच्या या सभेस चार ते पाच लाख लोक असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. कोणत्या आधारे त्यांनी हा आकडा काढला, ते तेच जाणोत. पण, एवढा मोठा जनसमुदाय पाहिल्यावर त्यांना ती संख्या जरा कमी वाटली. सभेसाठी निघालेले २० ते ३० लाख लोक कोलकात्याच्या रस्त्यांवर असल्याचे त्यांनी या सभेत बोलताना सांगितले. याच सभेत त्यांनी याच ब्रिगेड परेड मैदानावर १९ जानेवारी रोजी सभा घेण्यात येईल आणि त्या सभेस ५० लाख लोक उपस्थित राहतील,” अशी घोषणा करून टाकली. या सभेस आम्ही प्रादेशिक पक्षांच्या आघाडीस आणि अन्य विरोधी पक्षांना निमंत्रित करणार असल्याचे घोषित केले. आम्हाला खुर्चीची पर्वा नाही. आम्हाला देशाची, देशातील जनतेची आणि देशाच्या मातीची काळजी असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

 

लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसतशी नवनवीन समीकरणे पुढे येऊ लागली आहेत. भारतीय जनता पक्ष विरुद्ध सर्वअशी तयारी विरोधकांनी चालू केली आहे. ममता बॅनर्जी यांचा प्रादेशिक पक्षांच्या आघाडीचा प्रयत्न हा त्याचाच भाग आहे. तृणमूल काँग्रेसने १९ जानेवारी २०१९ रोजी जी सभा योजिली आहे, त्या सभेस काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती तृणमूल काँग्रेसच्या सूत्रांनी दिली. आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासही निमंत्रित करणार असल्याचे त्या सूत्राने सांगितले. पण, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून लगेचच हे निमंत्रण फेटाळून लावण्यात आले.

 

 
 

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला १०० ते १५० जागा मिळतील, असे भाकीत ममतादीदींनी व्यक्त केले आहे. देशातील नऊ राज्यांत लोकसभा निवडणुकीत काय होईल, याची कुंडली त्यांनी मांडली आहे. त्यांच्या मते तामिळनाडू : एकूण जागा ३९ . २०१४ मध्ये भाजप १ जागा. आता एकही जागा मिळणार नाही. उत्तर प्रदेश : ८० जागा २०१४ : भाजप ७१ . २०१९ मध्ये बसप आणि सप एकत्र आल्यास त्यांना किमान ५० जागा मिळतील. मध्य प्रदेश : २९ जागा. २०१४ : भाजप २६ . ममता यांच्यानुसार २०१९ मध्ये भाजपला आठही जागा मिळणार नाहीत. राजस्थान : २५ जागा. २०१४ भाजप : २५ . ममता यांच्यानुसार २०१९ मध्ये भाजपला पाच जागाही मिळणार नाहीत. गुजरात : २६ जागा, २०१४ : भाजप २६ जागा. ममता यांच्यानुसार २०१९ मध्ये भाजपला एकही जागा मिळणार नाही. बिहार : ४० जागा. २०१४ मध्ये भाजप २२ जागा. ममता म्हणतात, यावेळी लालूप्रसाद यांचा राष्ट्रीय जनता दल या सर्व जागा खाऊन टाकील. पश्चिम बंगाल : ४२ जागा. २०१४ : भाजप : २ . ममता यांच्यानुसार २०१९ मध्ये भाजपच्या या जागा लोक खाऊन टाकतील. ओडिशा : २१ जागा. २०१४ : भाजप एक जागा. ममता यांच्यानुसार २०१९ मध्ये ती जागा नवीन पटनायक खाऊन टाकतील. पंजाब : १३ जागा २०१४ : भाजप २ जागा. ममता यांच्यानुसार २०१९ मध्ये अमरिंदर सिंह त्या दोन्ही जागा खाऊन टाकतील. ममता बॅनर्जी यांची ही भविष्यवाणी किती खरी ठरेल ते पुढील वर्षी दिसून येईलच.

 

ममता बॅनर्जी यांच्यापाठोपाठ काँग्रेस पक्षानेही आपणास किती जागा मिळू शकतात, याचा अंदाज व्यक्त केला आहे. काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना, काँग्रेस लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा लढविल, असे सांगण्यात आले. काँग्रेसला किमान २०० जागा मिळतील, असे भाकीत त्या पक्षाकडून व्यक्त करण्यात आले. सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पुढे आला की, बाकीचेही काँग्रेससोबत येतील. त्यांचे नेतृत्व करण्यास राहुल गांधी हेच एकमात्र नेते ठरतील, असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे. ज्या पक्षाला २०१४ साली अवघ्या ४४ जागा मिळाल्या होत्या, त्या पक्षाला काहीही कर्तृत्व न दाखविता एकदम हनुमान उडी घ्यायची आहे. पण, त्यासाठी अंगात तेवढी ताकद असायला हवी ना! पण, चिदंबरम यांनी वेगळी आकडेवारी दिली आहे. १२ राज्यांत काँग्रेसची स्थिती मजबूत असल्याने २०१९ मध्ये काँग्रेसला तेथे तिप्पट जागा मिळतील, असे ते म्हणतात. प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष यांच्याशी योग्यप्रकारे युती केल्यास काँग्रेस पक्ष ३०० चा आकडाही गाठू शकतो, असे चिदंबरम यांनी सांगितल्याचे बोलले जाते.

 

राजकीय पटलावर अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या नेत्यांनी आपली भाकिते वर्तविण्यास सुरुवात केली आहे. आघाडी करण्यासाठी हालचाली चालू आहेत, पण अजून त्यास मूर्त स्वरूप येत असलेले दिसत नाही. लोकसभेत अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेल्याने विरोधकांचे अवसान गळाले असले तरी जिंकल्याच्या थाटात ते वावरत आहेत. गळ्यात पडून घेतलेल्या भेटीचे विविध अर्थ काढले जात आहेत. विरोधकांच्या शिडात हवा भरण्याचे प्रयत्न चालू आहेत. २०१९ च्या निवडणुकीत जनता तुम्हाला मिठीत घेणार नाही, असे भाजपने काँग्रेसला सुनाविले आहे. अजून अनेक विरोधी नेत्यांची तोंडे बंद आहेत. ती उघडली गेल्यानंतर कोण किती पाण्यात आहे आणि कोणाला काय हवे आहे ते दिसून येणार आहे. दुसरीकडे, विविध प्रकारची आंदोलने छेडून सरकारची कोंडी करण्याचे प्रयत्न चालले आहेत. अपप्रचार करून जनतेला भडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणुका जवळ येतील, तसतसा हा अपप्रचार शिगेला पोहोचणार आहे. असे सर्व असले तरी २०१९ मध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास भाजप नेतृत्वास वाटत आहे! पाहू काय होते ते!


@@AUTHORINFO_V1@@