आधुनिक शेती लाभाची

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2018   
Total Views |


 
 
बलराज सिंह यांच्या या यशाने प्रेरित होऊन बांकी गावातलेच युवक नव्हे, तर आजुबाजूच्या गावातील युवकही शेतीकडे आकर्षित होत आहेत आणि बलराजद्वारे केली जाणारी आधुनिक शेती पाहायला व शिकायला येत आहेत.
 
इच्छा असेल तर मार्ग दिसेल या म्हणीला सार्थ ठरवले आहे, ते छत्तीसगडच्या मुंगेली जिल्ह्यातील बांकी गावात राहणार्‍या बलराज सिंह या युवकाने. बलराजने आपली आवड आणि शासकीय योजनांच्या मदतीने शेतीमध्ये असे नवनवीन प्रयोग केले की, जे आजुबाजूच्या शेतकर्‍यांसाठी आदर्शवत ठरले आहेत. पेशाने शिक्षक असलेल्या बलराज सिंह यांनी आपल्या शैक्षणिक कार्यातून उरलेल्या वेळेचा सदुपयोग करत शेतीत काम करण्याचा निर्णय घेतला, ज्याचे परिणाम आश्चर्यजनक आहेत. शिवाय बलराज सिंह यांची आजची शेतीतली वार्षिक कमाई १० ते १५ लाखपर्यंत पोहोचली आहे, हे विशेष.
 

एवढेच नव्हे, तर बलराज सिंह यांच्या शेतीत काम करणार्‍या डझनभर मजूर आणि मजुरांच्या कुटुंबातील सदस्यांचीही जवळपास वर्षभराच्या रोजगाराची सोय झाली आहे, ज्यामुळे या शेतमजुरांच्या कुटुंबीयांच्या जीवनस्तरातही मोठी सुधारणा झाली आहे. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे बलराज सिंह यांना लहानपणापासूनच शेतीची आवड होती. ते आपले मोठे बंधू शिवप्रताप सिंह यांना शेतीच्या कामात नेहमीच मदत करत असत. बलराज सिंह यांनी शेती करण्याच्या आधी त्यांच्या शेतात खरीप हंगामात भात आणि रबी हंगामात हरभर्‍याची पारंपारिक पद्धतीने शेती केली जात असे, पण सिंचनाच्या व अन्य सुविधांच्या अभावामुळे पुरेसे उत्पादन होत नसे.

 

१९९३ साली बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर बलराज सिंह यांचे वडील प्रेम सिंह यांची इच्छा होती की, बलराज यांनी उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परिक्षांची तयारी करावी. पण शिक्षण घेत असतानाच बलराज सिंह यांना ग्रामीण जीवन आवडू लागले. त्याचवेळी त्यांनी ठरवले की, गावातच राहून जीवन जगण्याचे आधुनिक मार्ग शोधायचे. यासाठी आधुनिक शेतीव्यतिरिक्त अन्य दुसरा मार्ग असू शकत नाही, हेही त्यांनी ओळखले. तथापि, वडील आणि कुटुंबातील ज्येष्ठांच्या इच्छेचा मान ठेवत बलराज सिंह यांनी मुंगेली येथे एम.ए पर्यंतचे शिक्षण घेतले.

 

महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान, बलराज सिंह यांनी ग्रामीण कृषिविस्तार अधिकार्‍यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आणि शासकीय योजनांमधून मिळणार्‍या फायद्यांची सतत माहिती घेतली. याच काळात बलराज यांनी शाळेतल्या कामानंतर उरलेल्या वेळात आपल्या कुटुंबातील शेतीत मदत करणेदेखील सुरुच ठेवले.

 

बलराज सिंह सांगतात की, “वडिलोपार्जित जमीनीत शेती करण्याचा निर्णय मी स्वतः घेऊ शकत नव्हतो, कारण या शेतीसंबंधी निर्णय घेण्याचा अधिकार वडील आणि मोठ्या भावांकडे होता. अशा परिस्थितीत आपल्या आवडीप्रमाणे शेती करण्यासाठी मी भाडेपट्ट्याने शेती घेण्याचे ठरवले. नंतर २००५ साली त्यांनी बांकीच्या जवळील सोनपुरी गावात १ हजार रुपये प्रति एकर दराने शेतजमीन घेतली. एवढ्या स्वस्तात ही जमीन मिळण्याचे कारण म्हणजे इथे सिंचनाच्या सुविधांचा पूर्णपणे अभाव होता आणि वर्षांनुवर्षांपासून इथे कोणीही शेती केलेली नव्हती, त्युमळे ही जमीन पडीक श्रेणीत येत होती. पण आधुनिक शेतीचे भूत बलराज सिंह यांच्या मानेवर असे स्वार झालेले होते की, त्यांनी या पडीक जमीनीवरच शेती करण्याचे मनावर घेतले.

 

बलराज सिंह यांनी सुरुवातीला ७ एकर जमीन भाड्याने घेऊन आपल्या आधुनिक शेतीचा पाया घातला. त्यांनी सर्वात आधी मृदा परिक्षण केले आणि जमीनीत एनपीपीचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी योग्य खतांच्या मात्रेचा उपयोग केला. शेत चांगले नांगरुन घेतले. राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेत जिल्हा आणि केंद्रीय सहकारी बँकेतून कर्ज घेऊन एक ट्युबवेल लावला. अशा प्रकारे सुरुवातीच्या दोन वर्षांत पायाभूत सुविधांची उभारणी करत सोयाबीनसोबतच भाताची शेती सुरु केली. यात सुरुवातीला होणार्‍या कमाईला खर्च करण्याऐवजी बलराज यांनी पायाभत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले. सुरुवातीलाच मिळणार्‍या उत्पन्नामुळे उत्साहित झालेल्या बलराज सिंह यांनी त्यानंतर भाड्याच्या शेतीचे क्षेत्र वाढवणे सुरु केले आणि गेल्या १३ वर्षांत त्यांची शेती ७ वर्षांवरुन २५ एकर पर्यंत पोहोचली.

 

आज बलराज यांच्याकडे स्वतःचे ट्रॅक्टर आणि सात ट्युबवेल आहेत. शेतीत दरवर्षी कमाई वाढत असून त्यांची आर्थिक स्थिती बळकट झाली आहे. गेल्या वर्षी त्यांनी एक ११ लाखांची कारही विकत घेतली आहे. आता बलराज आपल्या शेतीच्या कामाने इतके उत्साहीत आहेत की त्यांनी मागील दोन वर्षांपासून ऊसाची शेती करायला सुरुवात केली आहे. पहिल्या वर्षी प्रयोग म्हणून त्यांनी पाच एकरवर ऊस लावला आणि या पाच एकरात सरासरी एक लाख रु. प्रति एकरच्या दराने त्यांची कमाई झाली.

 

बलराज सिंह यांनी या वर्षी जवळपास २० एकर जमीनीत ऊसाची लागवड केली आहे. जवळपासच्या जिल्ह्यातील दोन-दोन साखर कारखान्यांमुळे बलराज सिंह यांना उस लागवड करण्यासाठी प्रेरित केले आणि त्यांनी ऊसशेतीवर लक्ष केंद्रित केले. बलराज सिंह यांच्या या यशाने प्रेरित होऊन बांकी गावातलेच युवक नव्हे, तर आजुबाजूच्या गावातील युवकही शेतीकडे आकर्षित होत आहेत आणि बलराजद्वारे केली जाणारी आधुनिक शेती पाहायला व शिकायला येत आहेत.


@@AUTHORINFO_V1@@