संविधानाला दुबळे करणाऱ्यांना राष्ट्रवादी धडा शिकवेल : शरद पवार

    22-Jul-2018
Total Views |
 
 
 
 
मुंबई : देशात जातीयवादी घटना वाढत आहेत. अनेक ठिकाणी अफवांवरून हत्या घडत आहेत. मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजाला दडपशाहीतच ठेवण्याचा सत्ताधाऱ्यांचा मानस दिसून येतो. हा सत्ताधारी पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेला बदलण्याच्या किंबहुना उध्वस्त करण्याच्या मार्गावर आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा जमेल ती किंमत मोजायला तयार आहे पण देशाच्या राज्य घटनेवर गदा आणू देणार नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. मुंबई शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्यातर्फे मार्गदर्शन शिबिराचे काल आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
 
 
राहूल गांधी यांच्या लोकसभेतील वर्तनाचे समर्थन?


सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात आले होते की आपण देश घडवून दाखवू. यासाठी त्यांनी जी निती वापरली त्यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या देशाचा रुपया घसरला, याचा अर्थ आपल्या देशाचा अर्थसंकल्प ढासळला आहे अशी टीका पवार यांनी यावेळी केली. तसेच ही टीका आम्ही पक्षावर करत नसून त्यांच्या कार्यप्रणालीवर करत असल्याचेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी त्यांच्या दौऱ्यादरम्यान देशाचे प्रतिनिधित्व न करता राजकारणातून विरोधी पक्षांवर टीका केली. म्हणूनच कालच्या संसदेत काँग्रेस अध्यक्षांनी पंतप्रधानांना दाखवून दिले की आम्ही तुमच्याबद्दल वाईट चिंतन करीत नाही असे म्हणत पवार यांनी राहूल गांधी यांच्या संसदेतील वर्तनाचे समर्थन केले.

 
 
 
संविधानावर गदा आणण्याचे काम सत्ताधारी पक्ष करीत आहे. याला धडा शिकवण्याचे काम हे सामान्य माणूसच करू शकेल. लोकशाहीवर अन्याय करणाऱ्या, संविधानाला दुबळा करणाऱ्या अशा लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धडा शिकवेल असे आव्हान त्यांनी यावेळी केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईच्या कार्यक्रमास मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून आनंद वाटला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ज्याप्रमाणे ग्रामीण भागात राष्ट्रवादीची पाळेमुळे खोलवर रुजली आहे त्याचप्रमाणे मुंबई शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अस्तित्व मजबूत करण्यासाठी हे शिबिर असल्याचे त्यांनी सांगितले.