एका आधारस्तंभाचे कोसळणे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jul-2018   
Total Views |

 

‘साप्ताहिक विवेक’चे व्यवस्थापक व ‘भारतीय विचार दर्शन’चे कार्यवाह शहाजी जाधव यांचे २० जुलै रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. एका अनोख्या कार्यपद्धतीतून निर्माण होऊन तिथे असामान्य योगदान देणार्‍या एका सामान्य माणसावर प्रकाश टाकणारा हा श्रद्धांजलीपर लेख.

 

“तू जरा इथे बस आणि मी काय सांगतोय ते नीट ऐक.” ‘साप्ताहिक विवेक’मधला हा करड्या शिस्तीचा सल्ला आता ऐकू येणार नाही. शहाजी महादेव जाधव. ‘विवेक’च्या ‘लेखा आणि प्रशासन विभागा’चे प्रमुख आणि ‘विवेक’ परिवाराच्या सर्वच घडामोडींमधील समोर न दिसणाऱ्या आघाड्यांवर लढणारे बिनीचे शिलेदार. काल रात्री रविराज बावडेकरांचा फोन आला आणि ‘जाधवसाहेबांना आयसीयूत नेले आहे,’ असा निरोप मिळाला. मी, जितू सोनावणे, दिलीप करंबेळकर आम्ही तिथे पोहोचलो. बावडेकरांची शांतता बरेच काही बोलणारी होती. खुणेनेच त्यांनी जाधवसाहेब नाहीत, असे सांगितले. खरेतर ते घरीच गेले होते, पण शेवटचे प्रयत्न म्हणून डॉक्टरांनी काही उपचार करून पाहिले. हृदयविकाराचा धक्का, अन्य काही नाही. प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी होत्या, पण असे काही होईल, याची कुणालाच कल्पना नव्हती. त्यामुळे हा धक्का त्यांच्या परिवारालाच नव्हे, तर संपूर्ण ‘विवेक परिवाराला’च तडाखा देणारा ठरला. खरेतर, ५८ वर्षे हे काही वैद्यकीय कारणांमुळे काळाचा घास होण्याचे वय नाही, पण नियतीसमोर आपण काय करणार?

 

मुलुंडच्या त्या मनिषा हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरील आयसीयूमध्ये निपचित पडलेले त्यांचे पार्थिव पाहिले आणि गलबलून आले. आदल्या दिवशी संध्याकाळी झालेला संवाद आठवायला लागला आणि आठवणीचे पट एकामागोमाग एक उलगडायला लागले. १९९६ साली ‘विवेक’मध्ये प्रवेश झाला, तेव्हा करंबेळकर सर, पतंगे सर वगैरे संपादक मंडळी ‘सर’ होती. शहाजी जाधव मात्र ‘साहेब’च होते. पूर्ण बाह्यांचा पांढऱ्याकडे झुकणाऱ्या रंगाचे इन न केलेले शर्ट आणि गडद रंगाची पँट. खांद्याला चामड्याची लहानशी बॅग आणि पायात सँडल. जोरात प्रतिक्रिया देणे, प्रतिवाद करणे असा त्यांचा स्वभाव नव्हता. मात्र, न पटलेल्या मुद्द्यांवर ‘‘माझे असे मत आहे, बाकी निर्णय कोअर टीमने घ्यावा,” अशी त्यांची भूमिका असायची. ‘होम ग्रोन मॅनेजर्स’ची कल्पना मनुष्यबळशास्त्र सांगते. जाधवसाहेब त्याचे उत्तम उदाहरण होते. उत्तम अशासाठी की, ते स्वत: इथे येऊन स्थिर झालेच, पण त्यांनी त्यांच्याबरोबर ही संस्था आणि तिचा स्वभाव समजून इथले ‘लेखा आणि प्रशासन विभाग’ सांभाळणारे सहकारीदेखील निर्माण केले. सकाळी आपल्या ठरल्या वेळी यायचे, दिवसभराच्या कामाचा आढावा घ्यायचा, आवश्यक त्या गोष्टींचा पाठपुरावा घ्यायचा आणि संध्याकाळी उशिरा घरी जायचे. ‘सा. विवेक’सारख्या महाराष्ट्रभर पसरलेल्या उपक्रमशील साप्ताहिकात ही सगळी कामे काही कोणी मुद्दाम उल्लेख करून सांगेल असे नाही, पण ‘विवेक’सारख्या संस्थेची उपक्रमशीलता बहरते आणि फोफावते ती जाधवसाहेबांसारख्या व्यवस्थापकांमुळे. ग्रॅज्युएशननंतर काही काळ एका खाजगी कंपनीत नोकरी आणि नंतर ‘साप्ताहिक विवेक’ ते अखेरपर्यंत, असा हा ३८ वर्षांचा प्रवास आहे. जाधवसाहेब ‘विवेक’च्या संस्कृतीशी इतके रुळलेले की, मी एकदा त्यांना सहज विचारले की, “तुमचा संघाशी संबंध कधी आला?” ते म्हणाले,”कधीच नाही.”

 

संस्था जीवनात जे वातावरण असते, ते माणसे घडविते. ‘विवेक’नेही ती घडविली. अशी माणसे जी त्यांच्याठायी असलेल्या सर्व क्षमतांनी आलेल्या संकटांना आणि परिस्थितीला सामोरी जातात आणि तावूनसुलाखून विजयी होऊनच बाहेर पडतात. ‘विवेक’, ‘तरुण भारत’ सारख्या संस्थांविषयी सर्वसामान्य समाजात खूप गैरसमज असतात. सत्ता यांची आहे, त्यामुळे यांना खूप पैसा मिळतो, असा सर्वसामान्यांचा एक समज असतो. वस्तुत: सेवाकार्ये उभे करणारे संघाचे कार्यकर्ते आणि माध्यमांत काम करणारे कार्यकर्ते यांच्यात संघाच्या दृष्टीने फारसा फरत नसतोच. संघ वैचारिक अधिष्ठान म्हणून सोबत असतोच, पण संसाधनांची जुळवाजुळव मात्र ज्याने जबाबदारी घेतली आहे, त्यांनाच करावी लागते. विचारधारांनी चालणाऱ्या माध्यमांचा आशय वैचारिक असला, तरी त्यांचा विचार व्यावसायिक संस्थांप्रमाणेच करावा लागतो आणि व्यवसाय म्हटला की, त्याचे सगळेच आयाम सोबत येतात. अगदी आर्थिक ओढाताणदेखील. जाधवसरांनी हे सगळे कुठेही न बोलता पेलले. मानापमानाचे प्रसंगही अनुभवले, पण न बोलता हसतमुखाने ते गिळूनही टाकले. बँकांची कर्जे, ओडी, त्यांची परतफेड, कागदाची बिले, छपाईचे खर्च, मार्केटिंग सोबत या साऱ्यांचा ताळमेळ ही सगळी कसरतच होती. पुन्हा ही काही खाजगी कंपनी नाही, जे काही करायचे ते विश्वस्तांना विश्वासात घेऊनच. वाचायला या गोष्टी ठीक वाटत असल्या, तरी त्या अत्यंत रटाळ आणि कधी कधी तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा कस लावणाऱ्या, अंत पाहणाऱ्या या गोष्टी असतात.

 

माध्यमसमूह म्हणून ‘विवेक’ विकसित झाला. वाढत्या व्यापागणिक एक मोठी व्यवस्था ‘विवेक’मध्ये निर्माण होत गेली. जाधवसर या निर्मितीप्रक्रियेचे आणि तिच्या संचालनाचा आधारस्तंभ होते. आजची माध्यमे आणि ‘विवेक’, ‘तरुण भारत’सारखी माध्यमे यांच्यात एक मूलभूत फरक आहे, तो मूल्यात्मक आहे आणि उद्याच्या उत्तम परिवर्तनाची आकांक्षा धरणारा आहे. अग्निहोत्रात थुंकल्यावर त्या लाळेची सोन्याची लगड होते, ही गोष्ट सरसंघचालकांच्या तोंडून अनेकांनी ऐकली असेल. माध्यमातला एक असल्याने असे सोन्याच्या लगडी मिळविण्याचे उद्योग जवळून पाहाता येतात. ‘विवेक’, ‘तरुण भारत’मध्ये असे करता येत नाही. मूल्यांची पाठराखण करण्याची भूमिका सर्वप्रथम तुमचीच परीक्षा पाहत असते. जाधवसर या सगळ्या प्रवासातील मूक प्रवासी होते. हिंदुस्थान प्रकाशन संस्था, साप्ताहिक विवेक, वैद्यराज व्हिजन, शिल्पकार चरित्रकोश, ज्येष्ठपर्व, दापोलीचा प्रकल्प, गोपाळ खताचा प्रकल्प, भारतीय विचार दर्शन, मुंबई तरुण भारत, हिंदू विवेक केंद्र... ही यादी संपणारी नाही. निरनिराळ्या विश्वस्त संस्थांचा एवढा मोठा गोतावळा, पण कुठल्याही संस्थेत चुका नाहीत. गैरव्यवहाराची तर शक्यताही नाही. कुठल्याही गोष्टीचे उत्तम डॉक्युमेंटेशन हा जाधवसरांचा उपजत गुण होता. प्रत्येक गोष्ट लिहून ठेवायची आणि योग्य त्या फाईलला लावून ठेवायची. आम्हाला अचानक एटीजीचे प्रमाणपत्र लागायचे. मग काय? जाधव सरांना फोन. त्यांच्या सवयीनुसार ते शांतपणे म्हणायचे, "तू थांब. जरा दीप्तीला सांगतो आणि पाठवतो.” तासाभरात हवा तो दस्तावेज ईमेलवर आलेला असायचा.

 

“सापडला नाही, नंतर सांगतो...” अशा सबबी जाधवसरांनी कधीच सांगितल्या नाहीत. हजारो कागदपत्रांत तुम्हाला हवा असलेला कागद नेमका काढून देण्याचे त्यांचे कसब वादातीत होते. कार्यकर्त्यांना आर्थिक व्यवहाराचे भान नसते. त्यांच्या अंत:प्रेरणाच त्यांचा व्यवहार चालवित असतात, अशा परिस्थितीत जाधवसरांसारखी माणसे व्यवस्था म्हणून सोबत नसतील तर संस्था कोलमडून पडतात. ‘विवेक’ वाढला तो अशाच घटकांमुळे. वैचारिक भूमिका घेणे इतके सोपे नसते. लिखाणामुळे होणारे खटले, अटकेच्या शक्यता, त्यासाठी माराव्या लागणाऱ्या न्यायालयाच्या चकरा, मग संपादकांसाठी जामिनाची रक्कम जुळविण्यापासून ते दीर्घकाळ रेंगाळणाऱ्या खटल्यांची सगळी कागदपत्रे, पोलिसांच्या नोटिसा फाईल करून नीट सांभाळून ठेवण्यापर्यंत सगळ्या गोष्टी जाधवसरांनी केल्या.

 

‘विवेक’च्या प्रवासाचे अनेक देदीप्यमान टप्पे आहेत. कितीतरी सोहळे, कार्यक्रम, मुख्यमंत्री, आजचे पंतप्रधान, कवी, लेखक, विचारवंत, बँकर्स अशा सगळ्यांनीच ‘विवेक’च्या कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. अशा कार्यक्रमांत इतक्या योगदानानंतर व्यासपीठावर आपल्याला स्थान मिळाले पाहिजे, असे वाटणे साहजिकच आहे. पण, जाधवसर या सगळ्यातून कमालीचे अलिप्त राहिले. जाहीर कार्यक्रमात शक्यतो दुसऱ्या रांगेत बसून सगळे काही नीट चालले आहे ना, याची ते खात्री करीत असायचे. दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन झाले, तेव्हा दुसऱ्या रांगेत बसून त्यांचे न्याहाळणे कौतुकमिश्रित होते. कधीकाळी दिलीप करंबेळकर आणि रमेश पतंगे या द्वयींच्या खांद्यावर असलेला ‘विवेक’ हळूहळू अकराजणांच्या कोअर टीमकडे सरकला. हे स्थित्यंतर कुठल्याही खडखडांशिवाय झाले. सगळीच तरुण आणि अनुभव नसलेली मंडळी. जाधवसरच यात करंबेळकर आणि अन्य मंडळींतला एक अदृष्य दुवा होते. प्रशासकीय कामांची जबाबदारी कुठलाही कांगावा न करता त्यांनी इतक्या चोखपणे बजावली होती की, हा प्रवास त्यामुळे सुलभ झाला. मुळात संपादकांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या या संस्था. त्यामुळे कल्पनांना काय तोटा? पण, प्रत्येक कल्पनेची व्यवहार्यता तपासून कुणाचाही उपमर्द न करता जाधवसाहेब त्यातला धोका सांगायचे. ‘माझे तेच खरे’ असा त्यांचा कधीच स्वभाव नव्हता. शेतकरी कुटुंबातून आल्याने उपजतच असलेला ‘स्ट्राँग कॉमन सेन्स’ ही त्यांची ताकद होती. एखाद्या कल्पनेमुळे संस्था दोन पावले पुढे जाणार असेल, तर ती ते कल्पना उचलून धरायचे. "आपण हे करायलाच पाहिजे,”असे हसतमुखाने म्हणायचे.

 

कधीही न संपणारे असे हे कथन आहे. जाधवसाहेबांसारखी बिनचेहऱ्याची माणसे असतात म्हणून संस्था मोठ्या होतात. ‘विवेक’, दै. ‘मुंबई तरुण भारत’ सारख्या संस्थांची बँकांची खाती मोठी असली, तरी ती दरवेळी भरलेलीच असतात असे नाही. माणसांची खाती मात्र दुथडी भरून वाहात असतात. इथे वारसा असतोच, पण तो घराण्याचा नाही तर जबाबदारीचा. आदिनाथ पाटील, दीप्ती गावडे, रणजित मतकर ही ‘विवेक’च्या लेखा व प्रशासन विभागातली पुढची पिढी जाधवसाहेबांच्या हाताखाली तयार झाली. गंमत म्हणजे, जाधवसरांप्रमाणे यातील कुणाचाही रुढ अर्थाने संघाशी संबंध आलेला नाही. या ‘होम ग्रोन मॅनेजर्स’च्या सोबतीने ‘विवेक’ वाढविणे, हीच जाधवसाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल.

@@AUTHORINFO_V1@@