सामान्यांतील असामान्यत्व

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jul-2018   
Total Views |
 
 
 
रक्तपेढीच्या रक्तदाता विश्रामकक्षामध्ये बसलं की एकापेक्षा एक अवलियांच्या भेटी होतात. कधी या प्रसिद्ध असामी असतात तर बऱ्याच वेळा ’प्रसिद्धीचा झोत ज्यांच्या जवळुनदेखील कधी गेलेला नाही’ असे वरकरणी सामान्य पण आतून मात्र असामान्य असलेले सज्जनही भेटतात. अशाच एका सामान्य वाटणाऱ्या असामान्य व्यक्तीची झालेली भेट चांगलीच लक्षात राहिलेली आहे.
 
स्वयंस्फ़ूर्तीने रक्तदान करणाऱ्या सर्वच रक्तदात्यांची अंत:प्रेरणा तीव्र असते हे तर खरेच आहे. पण तरीही कुठलेही रक्तदान शिबिर लागलेले नसताना किंवा कुणी सांगितलेलेही नसताना ’आज रक्तदान करायचे आहे’ असे स्वत: ठरवून प्रत्यक्ष रक्तपेढीत येऊन रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे मला विशेष कौतुक वाटते. स्वत:चा वाढदिवस अथवा लग्नाचा वाढदिवस अत्यंत काटेकोरपणे रक्तदान करुनच साजरा करणाऱ्या सर्व रक्तदात्यांची त्यामागील प्रेरणा ही खरोखरीच गौरवास्पद आहे, अभिनंदनीय आहे. वर ज्या लक्षात राहिलेल्या भेटीचा उल्लेख केला आहे त्या प्रसंगातील रक्तदाताही खास रक्तदान करण्यासाठी रक्तपेढीत आला होता. वयाने पस्तिशीच्या आसपास, अंगावर साधे कपडे, शरीरयष्टी काटक आणि व्यक्तिमत्वाचा भाग असलेले चेहेऱ्यावरील हास्य – असा हा रक्तदाता रक्तदानापूर्वीचा फ़ॉर्म भरत असतानाच मी तिथे प्रवेशलो. स्वाभाविकपणे आमच्या काही गप्पा झाल्या. पहिल्या एक दोन प्रश्नांतूनच हा तरुण उत्तर प्रदेशातील प्रयागचा असल्याचे समजले. त्यामुळे आमच्या संवादाची गाडी हिंदी रुळांवर चढली. यानंतर झालेल्या बोलण्यातून हे लक्षात आले की, तो रस्त्यावर कपड्यांची विक्री करणारा एक फ़िरता विक्रेता आहे. शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत झालेले. रक्तदानासारख्या कर्तव्याबाबतचे जागरण होण्यास शिक्षण हा तर राजमार्ग आहे. त्यामुळेच बहुतेक रक्तदात्यांमध्ये सुशिक्षितांची संख्या लक्षणीय आहे, हे खरेच. पण रूढार्थाने उच्चशिक्षित नसतानादेखील शिवाय व्यवसायाचे स्वरुप असे की त्यातूनही यासंबंधीची माहिती अथवा जागरण होण्याची सुतराम शक्यता नाही. असे असतानाही स्वत: रक्तपेढीत येऊन रक्तदान करण्यामागची याची प्रेरणा काय असावी असा स्वाभाविक प्रश्न माझ्या मनात आल्यावाचून राहिला नाही. थोडा अंदाज घेऊन मी जेव्हा त्याला याबद्दल विचारलं, तेव्हा हसत हसत तो म्हणाला, ’देखिये भाईसाहब, हर किसीका यह फ़र्ज है की जो भी अपने पास देने लायक है, वह इस समाज केलिए देते रहना चाहिये. अब हम तो पैसेवाले है नहीं, फ़िर भी किसी की जान बचा सके ऐसी देने लायक चीज तो हमारे पास भी है, तो यह देनेमें दिक्कत क्या है ? बस हम यही सोचकर रक्तदान करते हैं.’ खूप थोडक्यात त्याने फ़ार महत्वाचं तत्वज्ञान सांगितलं होतं. रक्तदान ही एक activity म्हणून तो करत नव्हता तर आपल्याला जे जे शक्य आहे, ते समाजासाठी दिलं पाहिजे या भावनेने तो रक्तदान करत होता. हा संस्कार त्याच्याकडे रक्तातूनच आला असावा. शिक्षणाव्दारे होऊ घातलेले रक्तदान प्रबोधन तर महत्वाचे आहेच, पण ’हा समाज माझा आहे आणि त्याकरिता मी रक्तदान केले पाहिजे’ अशी भावना जर संस्कारांतूनच आली तर कदाचित बाकी कुठल्या शंका याबाबतीत राहणारच नाहीत. हा साधा-सरळ मनाचा रक्तदाता खरोखरीच मला अंतर्मुख करुन गेला, हे नक्की.
 
दुसरा एक प्रसंग मी अनुभवला तो एका रुग्णाच्या बाबतीत.
 
रक्तपेढीतून रक्तघटक घेऊन जाण्यासाठी आलेल्या रुग्णांच्या नातलगांस जर आर्थिक अडचण असेल तर त्यांना योग्य सवलत मिळावी याकरिता अधिकाऱ्यांकडे पाठवले जाते व त्यानंतर या रुग्णाबाबत आवश्यक ती माहिती घेऊन त्यास उचित सवलतही दिली जातेच. अशाच एक व्यक्तीला मी माझ्या कक्षाजवळील जिन्यावर बसल्या स्थितीत पाहिले. मी तेव्हा रक्तपेढीतच अन्यत्र कुठेतरी गेलेलो होतो आणि सवलतीबाबत विचारण्यासाठी हा मध्यमवयीन गृहस्थ माझीच वाट पहात तिथे बसलेला होता. त्यांना तिथे पाहिल्यावर चटकन मी त्यांना आत बोलावले आणि त्यांच्या अडचणीबाबत विचारणा केली. साधारणत: आर्थिक परिस्थिती किंवा आजाराचे स्वरूप यानुसार सवलतींची अपेक्षा करणारे गरजू बऱ्याचदा भेटायला येतातच आणि अर्थातच अशा सर्वांना शक्य तितकी मदत करण्याचाही प्रयत्न रक्तपेढी करतेच. त्यामुळे अशाच प्रकारची काही सवलत यांना हवी असेल असाच माझा अंदाज होता. पण या गृहस्थांना मात्र सवलतीची अपेक्षा नव्हती, हे त्यांच्या बोलण्यावरुन माझ्या लक्षात आले. ’सध्या माझ्याकडे काही पैसे कमी आहेत, त्यामुळे आता आपण रक्तपिशवी द्यायला सांगा. उरलेली रक्कम मी संध्याकाळी आणून देईन’, असे या गृहस्थांनी मला सांगितले. अर्थात असे करायला काहीच अडचण नव्हती. पण मी मुद्दामच रुग्णाबाबत आणि या गृहस्थांच्या आर्थिक स्थितीबाबत चौकशी केली. एका खासगी रुग्णालयात वॉर्डबॉयचे काम करणारा हा गृहस्थ होता व त्याची सख्खी भावजय एका ससून रुग्णालयात दाखल झालेली होती. या आपल्या वहिनीसाठीच रक्ताची पिशवी घ्यायला हा व्यक्ती आलेला होता. त्याने सवलतीची मागणी केलेली नसली तरी ’सवलत द्यायला काही हरकत नाही’ किंबहुना ’जरूर सवलत द्यावी’ अशाच प्रकारची ही मागणी होती. त्यामुळे त्यांना बाकी काहीही न विचारता मी स्वागतकक्षास फ़ोनवरुनच या गृहस्थास उरलेल्या सर्व रकमेची सवलत देण्याची सूचना देऊन टाकली. हे कदाचित अनपेक्षित असल्याने तो गृहस्थ एकदम उठुन उभा राहिला आणि कृतज्ञतापूर्वक स्वरांत म्हणाला, ’सर, सवलत दिली नसतीत तरी चालले असते. मी संध्याकाळी आणून देणारच होतो पैसे.’ यावर मी काय बोलणार ? मी इतकेच म्हणालो, ’अहो, यात फ़ार मोठे काही नाही. तुम्ही जरी सवलत मागितलेली नसली तरी आम्ही आमच्या धोरणांनुसारच ही सवलत दिलेली आहे.’ अजिबात अपेक्षा नसताना मिळालेल्या सवलतीबद्दल मनापासून आभार व्यक्त करीत तो मनुष्य निघून गेला. हा प्रसंग मला वेगळा वाटण्याचे कारण म्हणजे ज्या आर्थिक पार्श्वभूमीतून हा व्यक्ती आलेला होता त्यापेक्षा अधिक चांगल्या आर्थिक स्तरांतीलही अनेक जणांनी यापूर्वी सवलतीसाठी विचारणा केल्याचे किंवा सवलतींवर हक्क सांगितल्याचेही मी अनेकदा पाहिले होते, त्यातील बऱ्याच जणांना शक्य तितकी मदतही केली होती. पण इथे मात्र सवलतीसाठी पात्र असणारा व्यक्ती सवलतीची मागणी करणे सोडाच, पण ’उरलेले पैसे आणून देतो, नक्की देतो’ असे आश्वासन देत होता. शिवाय सवलत दिल्यानंतरही ’सवलत नसती तरी चालले असते, हे त्याने मला बोलुन दाखवले होते. माझ्या दृष्टीने हे विशेष होते.
 
 
खरे तर सुरुवातीला उल्लेख केलेला उत्तरेतला रक्तदाता किंवा हा दुसऱ्या प्रसंगातील व्यक्ती, हे दोघेही अशा स्तरांचे प्रतिनिधी आहेत, जे सामान्यत: कायमच दुर्लक्षणीय असतात. त्यांचा विचार कुठेही प्राधान्याने होताना दिसत नाही. मात्र या दोघांमधील मला अनुभवायला मिळालेले गुण हे मात्र भल्या-भल्यांमध्येही आढळत नाहीत. आपल्या सामान्यत्वाची जाण या दोघांनाही पुरेपूर होती. पण त्यांच्या या सामान्यत्वामध्येही एक असामान्यत्व दडलेले आहे, हे या छोट्या प्रसंगांमुळे मला पहायला मिळाले.
 
 
- महेंद्र वाघ
 
@@AUTHORINFO_V1@@