‘त्यां’च्या शिक्षणाची सीमा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jul-2018   
Total Views |



उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये राहणाऱ्या एका महिलेने रस्त्यावरील निराधार मुलांचे आयुष्य घडविण्याचा निर्णय घेतला आणि त्या दिशेने काम सुरू केले. या महिलेचे नाव आहे सीमा गुप्ता. त्यांच्याविषयी...

 

भारतात राहणाऱ्या दारिद्य्ररेषेखालील लोकांची संख्या आणि त्यांची बिकट अवस्था सर्वांच्याच परिचयाची. देशातले कोट्यवधी लोक आपले पोट भरण्यासाठी दिवसरात्र कष्ट उपसतात. पोट भरण्यासाठी कष्ट करणे, हे कोणालाही चुकलेले नाही आणि त्यात काही वावगेही नाही. कष्ट, मजुरी करणारे लोक कधीही उपाशीपोटी झोपत नाही हेही खरेच, पण दुःखाची गोष्ट ही आहे की, बऱ्याचदा कुटुंबातील कर्त्याधर्त्या व्यक्तींच्या कामात, मोलमजुरीत, त्यांच्या मुलांनाही हातभार लावावा लागतो. आपल्याला नेहमीच किरकोळ पैशांसाठी ट्रॅफिक सिग्नलवर भीक मागणारे, खेळणी, खाद्यपदार्थ, हार-फुले विकणारी मुले दिसतात. रस्तोरस्ती, चौकाचौकात वावरणाऱ्या जवळपास सर्वच मुलांना स्वतःचे घर तर नसते, दिवसभर जिथे पोट भरले तो रस्ता हेच त्यांचे घर. तिथेच त्यांच्या दिवसाची सुरुवात होते आणि शेवटही...

 

अशा रस्त्यांवर राहणाऱ्या मुलांसाठी, त्यांचे भविष्य घडविण्यासाठी मोठमोठ्या शहरात काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कामही केले जाते. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये राहणाऱ्या एका महिलेने अशाच प्रकारे रस्त्यावर आयुष्य कंठणाऱ्या निराधार मुलांचे जीवन घडविण्याचा निर्णय घेतला आणि त्या दिशेने काम सुरू केले. या महिलेचे नाव आहे सीमा गुप्ता. त्या लखनौत कार्यरत असलेल्या आयएएस अधिकारी जितेंद्र कुमार यांच्या पत्नी आहेत. सीमा गुप्ता लखनौमधील एका मोठ्या बंगल्यात राहतात, जिथे त्यांना सर्वच प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध आहेत. मात्र, केवळ मोठ्या बंगल्यात सुखासीन आयुष्य जगत राहण्यात त्यांना रस नव्हता, म्हणूनच त्यांनी शहरातल्या रस्त्यावर वावरणाऱ्या, हिंडणाऱ्या-फिरणाऱ्या मुलांचे आयुष्य घडविण्याचे, सुधारण्याचे, सावरण्याचे ठरवले. याची प्रेरणा त्यांना ‘हिचकी’ हा चित्रपट पाहिल्यानंतर मिळाली. ‘हिचकी’ चित्रपटात उचकीचा आजार आणि गरीब-श्रीमंतांतील दरी ही कथा दाखविण्यात आली होती. सीमा गुप्ता यांनी ठरवले की, आपण अशा मुलांसाठी काम करायचे, जे सर्वसामान्य व्यक्तींना मिळणाऱ्या सुख-सुविधांपासून वंचित आहेत, शेकडो मैल दूर आहेत. आता जर तुम्ही सीमा गुप्ता यांच्या लखनौतील विभूती खंड परिसरातील बंगल्यात गेलात तर तिथे तुम्हाला रस्त्यावर भटकणारी २५ मुले लिखाण-वाचन करताना, खेळ खेळताना, खाद्यपदार्थांचा आनंद लुटताना दिसतील. सीमा गुप्ता स्वतःच या मुलांना शिकवतात.

 

 
 

रस्त्यावरील मुलांकडून धुळाक्षरे गिरवून घेण्याच्या आपल्या या कामाबद्दल सीमा गुप्ता सांगतात की, “मी मुलांना फक्त शिकवतच नाही, तर त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची आणि कपड्यांचीही सोय करते.” विशेष म्हणजे या मुलांचे वर्गदेखील सीमा गुप्ता यांच्या बंगल्यातील बगिच्यातच चालतात, जिथे त्या स्वतः मुलांना निरनिराळ्या विषयांची माहिती देतात. एवढेच नव्हे तर सीमा गुप्ता यांच्या या विचारांमुळे-कामामुळे प्रभावित होऊन त्यांचे पती जितेंद्र कुमार यांनी आपली खाजगी गाडी आणि ड्रायव्हरही या कामासाठी उपलब्ध करून दिले. आता जितेंद्र कुमार यांची कार मुलांना रस्त्यावरच्या त्यांच्या घरापासून गुप्ता यांच्या बंगल्यापर्यंत आणते आणि त्यांना पुन्हा त्यांच्या घरी सोडायला जाते. सीमा गुप्ता या रोज सकाळी नाश्ता केल्यानंतर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी बंगल्यातल्या वर्गात पोहोचतात. तिथे त्या दुपारपर्यंत मुलांना शिकवतात आणि १ वा. सर्वच मिळून एकत्रित जेवणाचा आस्वादही घेतात. सीमा गुप्ता यांनी सांगितले की, “या मुलांना जेवण वाढताना असे वाटते की, आपण जणू काही देवालाच नैवेद्य दाखवत आहोत.” सीमा म्हणतात की, “या २५ मुलांचे आयुष्य बदलायचे, घडवायचे, सुधारायचे माझे प्रयत्न आहेत.” सीमा गुप्ता आणि त्यांचे पती जितेंद्र कुमार यांनी मुलांना शिक्षित करण्याचा घेतलेला हा वसा नक्कीच प्रेरणादायी आहे, असे वाटते.

 

सीमा गुप्ता यांच्या या अनोख्या शाळेत शिकणाऱ्या एका मुलाने-आदित्यने आपला अनुभव सांगताना म्हटले की, “मॅडम आमच्यासाठी फक्त बाराखडी, गणित वा इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षिकाच नाहीत तर त्या आमच्या आईसारख्याच आहेत.” सीमा गुप्ता या मुलांसाठी आत्मीयतेने करत असलेल्या कामामुळेच आदित्यने त्याच्या भावना अशा शब्दांत व्यक्त केल्या, हे दिसते. आज या रस्त्यावरील मुलांना सीमा गुप्ता स्वतः विविध विषय शिकवत आहेत, हे खरेच पण तेवढ्यावरच त्यांचे भविष्य घडेल असे नाही. याची जाण असलेल्या सीमा गुप्ता यांनी पती जितेंद्र यांना अशीही विनंती केली की, या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा, जेणेकरून त्यांचे भविष्य सुधारेल. सीमा गुप्ता आज या रस्त्यावर फिरणाऱ्या, राहणाऱ्या, जगणाऱ्या मुलांसाठी करत असलेले प्रयत्न हे जेवढे कौतुकास्पद आहेत, तेवढेच कित्येकांना अशा प्रकारे वंचितांचे आयुष्य सुधारण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याची प्रेरणा देणारेही आहे. त्यांच्या या कार्याला दै.‘मुंबई तरुण भारत’ परिवाराच्या हार्दिक शुभेच्छा!

@@AUTHORINFO_V1@@