केसीआर यांच्याविरुद्ध जुळवाजुळव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2018   
Total Views |




केसीआर आणि त्यांच्या पक्षास सत्तेवरून घालविण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न चालले असताना राष्ट्रीय पातळीवर तिसरी आघाडी निर्माण करण्याच्या दृष्टीने केसीआर यांचे प्रयत्न चालूच आहेत. मध्यंतरी माजी पंतप्रधान देवेगौडा एका लग्नासाठी हैदराबादला आले असता त्यांची भेट घेऊन त्यांनी आघाडीबाबत चर्चा केल्याचे सांगण्यात येते. भाजप आणि काँग्रेस यांना वगळून आघाडी स्थापन करण्याचे त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत, पण ही व अन्य आघाडी सध्या तरी अजून दृष्टीपथात दिसत नाही.
 

स्वतंत्र तेलंगण राज्यासाठी लढा उभारून तो यशस्वी करणारे आणि त्या यशावर तेलंगण राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले तेलंगण राष्ट्रीय समितीचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव यांना सत्तेवरून कसे दूर करता येईल, याच्या हालचाली तेलंगणात सुरू झाल्याचे आणि आता निवडणुका जवळ येऊ लागल्याने त्या हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. के. चंद्रशेखर राव यांच्याविरुद्ध सर्व विरोधकांना एकत्र आणण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी आपण मोठ्या भावाची भूमिका बजावू, असे त्या पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे.

 

आताचे तेलंगण असो वा पूर्वीचा आंध्र प्रदेश, या राज्यात काँग्रेस आणि तेलुगू देसम यांच्यात सख्य नव्हतेच. उलटपक्षी तेलुगू अस्मितेच्या मुद्द्यावर एनटीआर यांनी १९८५ मध्ये काँग्रेसला हरवून सत्ता प्राप्त केली होती. त्यांचे जावई आणि तेलुगू देसमचे विद्यमान नेते चंद्राबाबू नायडू हेही १९९९ ते २००४ या काळात मुख्यमंत्री होते. या दोन्ही नेत्यांनी आपल्या सहकाऱ्यांची उपेक्षा केली, फक्त स्वत:चे महत्त्व वाढविले, अहंकार जपला आणि त्यामुळे त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. तशीच गत २०१९ मध्ये के. चंद्रशेखर राव यांची होईल, असे काँग्रेसचे नेते रेवंत रेड्डी यांनी म्हटले आहे. एनटीआर यांनी अनेक लोकप्रिय उपक्रम हाती घेतले होते, पण कमालीचा उद्धटपणा त्यांना भोवल्याने त्यांच्या हातून सत्ता गेली. तशीच गत के. चंद्रशेखर राव यांची होईल, असे रेवंत रेड्डी यांना वाटते. के. चंद्रशेखर राव यांच्या हुकूमशाही धोरणांमुळे त्यांनी जनतेची नाराजी ओढवून घेतली आहे. त्यांच्या राज्यात सामाजिक न्याय उरला नाही, असेही त्यांचे म्हणणे. तेलंगण राष्ट्रीय समितीला टक्कर देण्यासाठी तेलुगू देसमसह सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न काँग्रेसने चालविले आहेत. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या न्यायाने तेलुगू देसमला जवळ करण्याची तयारी काँग्रेस पक्षाने दर्शविली असल्याचे दिसून येते. चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी फारकत घेतल्याने त्यांचा पक्ष के. चंद्रशेखर राव विरोधी आघाडीत सहभागी होईल, असे रेवंत रेड्डी यांना वाटत आहे. केसीआर हे तेलंगण राज्य आपली जहागीर असल्यासारखे चालवित आहेत. स्वाभिमान, स्वशासन आणि सामाजिक न्याय या तेलंगण चळवळीच्या मूळ उद्देशांनाच त्यांनी हरताळ फासला आहे. त्यांचे मंत्री निव्वळ नावाला आहेत. केसीआर आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य चौघे राज्य चालवित असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. केसीआर आणि टीआरएसवर तोफ डागणारे रेवंत रेड्डी हे तेलुगू देसममधून काँग्रेसमध्ये आले आहेत. ते आमदार असून सध्या जामिनावर आहेत. तेलंगण प्रदेश काँग्रेस समितीच्या निवडणूक समितीत स्थान मिळेल, अशी आशा त्यांना वाटत आहे. रेवंत रेड्डी यांनी के. चंद्रशेखर राव यांच्यावर तोफ डागली असताना तेलंगण प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष एन. उत्तम कुमार रेड्डी आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री आणि के. चंद्रशेखर राव यांचे पुत्र के. टी. रामाराव यांच्यात चांगलीच जुंपली आहे. काँग्रेसने तेलंगणच्या जनतेचा विश्वासघात केला असल्याच्या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे. “तेलंगण आंदोलनाचा १९५२ ते २०१४ पर्यंतचा इतिहास पाहिला तर काँग्रेसने विश्वासघात आणि फक्त विश्वासघातच केला आहे,” असे रामाराव म्हणतात. “कोणत्या पक्षाचे नैतिक दिवाळे वाजले आहे, ते आगामी निवडणुकीत दिसून येईलच. जर जनतेने आम्हास नाकारले तर आपण राजकीय संन्यास घेऊ,” अशी घोषणाही त्यांनी केली आहे, तर एन. उत्तम कुमार रेड्डी यांनी तेलंगण राष्ट्रीय समितीवर तोंडसुख घेतले आहे. “तेलंगणच्या जनतेस सोनिया गांधी यांच्याबद्दल अपार आदर आहे. त्यांच्यावर पातळी सोडून टीका करणाऱ्या पक्षास लोक त्यांची जागा दाखवतील,” असे त्यांनी म्हटले आहे.

 

केसीआर आणि त्यांच्या पक्षास सत्तेवरून घालविण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न चालले असताना राष्ट्रीय पातळीवर तिसरी आघाडी निर्माण करण्याच्या दृष्टीने केसीआर यांचे प्रयत्न चालूच आहेत. मध्यंतरी माजी पंतप्रधान देवेगौडा एका लग्नासाठी हैदराबादला आले असता त्यांची भेट घेऊन त्यांनी आघाडीबाबत चर्चा केल्याचे सांगण्यात येते. भाजप आणि काँग्रेस यांना वगळून आघाडी स्थापन करण्याचे त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत, पण ही व अन्य आघाडी सध्या तरी अजून दृष्टीपथात दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी तर अलीकडील आपल्या वक्तव्याने, अशा आघाडीलाच मोडता घातला आहे. तेलंगणमधील राजकारण केसीआर आघाडी आणि केसीआरविरोधी आघाडी अशा दोन आघाड्यांत विभागले जात आहे. तेलुगू देसम पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात असल्यामुळे त्या पक्षास केसीआरविरोधी आघाडीत येण्यावाचून अन्य पर्यायच नसल्याचे काँग्रेस नेत्यांना वाटते. तेलंगण राज्यात अशा घडामोडी घडत असताना भारतीय जनता पक्षानेही केसीआर यांच्या सरकारविरुद्ध मोहीम उघडली आहे. तेलंगण राष्ट्रीय समिती सरकारची लक्तरे त्या पक्षाकडून वेशीवर टांगली जात आहेत. तेलंगण राज्यात भाजपने जनचैतन्य यात्रा काढली असून त्याद्वारे राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली जात आहे.

 

“तेलंगण राष्ट्रीय समितीला धडा शिकविण्याची वेळ आली आहे. जनतेने या सरकारला सत्तेवरून झुगारून द्यावे. केवळ भारतीय जनता पक्षाचे सरकारच सामाजिक न्याय आणि सुशासन देऊ शकते,” असे भाजपचे तेलंगण प्रदेश अध्यक्ष के. लक्ष्मण यांनी या यात्रेनिमित्त आयोजित सभेत बोलताना म्हटले आहे. “स्वत:च्या बलिदानाने स्वतंत्र राज्य मिळविणाऱ्या तेलंगण राज्याच्या जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे,” असेही लक्ष्मण यांनी सांगितले. “केसीआर यांनी घरातील प्रत्येकास काम देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते, पण त्याऐवजी त्यांनी आपल्याच घरातील चौघांना काम दिले,” अशी बोचरी टीकाही त्यांनी केली आहे. सामाजिक न्यायाची भाषा करणाऱ्या या सरकारने आपल्या मंत्रिमंडळात एकाही महिलेस स्थान दिले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या जनचैतन्य यात्रेच्या निमित्ताने भाजप अध्यक्ष अमित शाह हे येत्या १३ जुलै रोजी तेलंगणच्या दौऱ्यावर येत आहेत. तेलंगण राज्यातील विद्यमान घडामोडी अशा आहेत. अलीकडे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर मुदत संपण्यापूर्वीच निवडणुका होणार, अशा वावड्या उठू लागल्या होत्या. केसीआर यांची एकीकडे तिसऱ्या आघाडीसाठी जमवाजमव करण्याचे प्रयत्न चाललेले आहेत तर दुसरीकडे, तेलंगणमधील त्यांच्या विरोधात असलेले पक्ष त्यांना सत्तेवरून घालविण्याच्या प्रयत्नात आहेत. कोण कोणावर कुरघोडी करण्यात यशस्वी होतो, ते आगामी काळात दिसून येईल!

9869020732

@@AUTHORINFO_V1@@