
वणी: सप्तशृंगी देवी गड विकासासाठी २५ कोटी रुपये निधी देण्याची पालकमंत्री गिरीश महाजन यांची मागणी आपण आजच मंजूर करीत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. २ जुलै रोजी फ्युनिक्युलर रोप वे ट्रॉलीच्या लोकार्पण समारंभात केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गिरीश महाजन होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री दादा भुसे, दिंडोरीचे खा. हरिश्चंद्र चव्हाण, जि. प. अध्यक्षा शीतल सांगळे, आ. बाळासाहेब सानप, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. राहुल आहेर, आ. छगन भुजबळ, सप्तशृंगी देवी संस्थानचे अध्यक्ष जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे आदींसह शासकीय अधिकारी उपस्थित होते.
भाविकांच्या सेवेसाठी सुयोग गुरुबक्षाणी कंपनीने जागतिक दर्जाचा उत्कृष्ट प्रकल्प उभारल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढून कंपनीचे चेअरमन राजकुमार गुरुबक्षाणी, एम. डी. शिवशंकर लातुरे, प्रकल्प व्यवस्थापक राजीव लुम्बा, सोपान कोडमंगले यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांचा सत्कार केला.
खासदार चव्हाण समर्थकांकडून मुख्यमंत्र्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत
मुख्यमंत्री फडणवीस यांचे दुपारी १२ .४५ वाजता ओझर विमानतळावर आगमन झाले. आगमन झाल्यानंतर खासदार चव्हाण समर्थकांकडून मुख्यमंत्र्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. हजारो नागरिक रत्याच्या दुतर्फा उभे राहून मुख्यमंत्र्यांना अभिवादन करीत होते. दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण, कळवण प्रकल्प समितीचे अध्यक्ष समीर चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी स्वागत केले. यावेळी खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी सप्तशृंग गडावरील डोली धारकांचा प्रश्न, कीर्तीध्वज लावणार्या शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या गवळी कुटुंबियांना शासनामार्फत मदत करावी तसेच कळवण, सुरगाणा, दिंडोरी, निफाड आदि तालुक्यातील विविध प्रश्नांवारचे निवेदन मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर केले. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी जी विकासकामे बाकी आहेत त्यात लक्ष घालणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास नाशिक मनपाच्या स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर, भाजप जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, विकास देशमुख, सुधाकर पगार, जिल्हा संघटन मंत्री नंदकुमार खैरनार, देवस्थानचे मुख्य कार्य अधिकारी श्री दहातोंडे, जि.प.सभापती मनीषा पवार,महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, माजी आमदार वसंत गीते, विजय साने, रामभाऊ जानोरकर, भाजप ओबीसी सेलचे सचिव रवींद्र महाजन, शशी बागूल, संदीप बेनके, सुभाष राउत, आमदार नरहरी झिरवाळ, आ. सौ. दीपिका चव्हाण, आ. जे. पी. गावित, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., कार्यकारी अभियंता आदिवासी सा. बांधकाम विभाग किशोर केदार, कळवणचे अप्पर जिल्हाधिकारी मित्तल यांच्यासह जिल्हाभरातून हजारो भाविक उपस्थित होते.