
समर्थ रामदास स्वामीचं वाङ्मय श्रेष्ठ दर्जाचं आहे. श्री दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक आणि फटके, डफगाणी, करुणाष्टके, आरत्या, सवाया असं अलौकिक प्रतिभासंपन्न साहित्य आहे. समर्थ रामदास स्वामींच्या स्फुरणातून साकारलेलं सामान्य लोकांपासून असामान्य लोकांना उपयुक्त ठरणार आहे. व्यक्तिगत विकास ते राष्ट्र विकास साधण्यापर्यंत त्याचप्रमाणे कोणत्याही काळात मार्गदर्शन करणारं असं हे वाङ्मय. साध्या, सुलभ, सोप्या शब्दांचा वापर करून उच्चतम आशय यामध्ये सामावलेला आहे. म्हणजेच काळाचं बंधन नसलेलं सामाजिक, राजकीय, अर्थशास्त्रीय मार्गदर्शन यामधून प्राप्त होतं. मानसशास्त्राचा मोठ्या प्रमाणात अंतर्भाव यामध्ये आहे. समर्थ रामदास स्वामींच्या झरलेल्या झरणीला प्रभू रामचंद्रांची कृपा लाभलेली आहे. प्रपंचापासून परमार्थापर्यंत प्रगती कशी करावी, याचं मौलिक मार्गदर्शन लाभतं.
स्थूलापासून सूक्ष्मापर्यंतच्या यशस्वी प्रवासासाठी त्यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास करणं आवश्यक आहे. विशेष लोकांना ज्ञात नसलेला लेखन प्रकार म्हणजे ’सवाया’. सज्जनगडावर आपल्याला सवायांचा लाभ होतो. करुणाष्टके सामूहिक म्हटली जातात. सवाया व्यक्तिगत म्हटल्या जातात. सवायांच्या पदातील प्रत्येक ओवीमधील पहिलं चरण दोनदा म्हणण्याची पद्धत आहे. पद म्हणून झालं की, त्यानंतर ‘म्हणावा जय जय राम’ याने शेवट करतात.सांप्रदायिक पद्धतीप्रमाणे म्हटल्या जाणार्या सवाया जास्त आशय मनापर्यंत नेऊन पोहोचवितात.
गुरुवारची सवायीची पहिली ओवी -
सारासार नीतीन्याय। मुख्य भक्तीचा उपाय
संतसंगवीण काय। वाया जाय सर्वही ॥1॥
सार आणि असार, नीती आणि अनीती, न्याय आणि अन्याय याचा विवेकाने विचार आवश्यक आहे. यासाठी भगवंताची उत्कृष्ट भक्ती करणं, हा खात्रीचा उपाय. भगवंताची भक्ती करता करता विचारमंथन होऊन त्यामधून विवेकाचं सुंदर नवनीत हाती येतं. संभ्रम, भ्रम विरायला लागतात. शंका-आशंका संपून जातात. विकल्प दूर पळतो. संतांची संगत सुपरिणाम साधणारी असल्याचं रामदास स्वामी सांगतात. संतसंगतीमध्ये मनावर सुंदर संस्कार होत जातात. त्या संस्कारांना अक्षयतेचं वरदान लाभलेलं असतं. जर संतांची संगत लाभली नाही किंवा त्याचा लाभ घेतला नाही, तर इतर गोष्टींना काही अर्थ उरत नाही.
समर्थ रामदास स्वामी पुढच्या ओवीत सांगतात-
आधी कर्माचा प्रसंग। शुद्ध उपासना मार्ग।
ज्ञाने उद्धरती जन । येथे संदेह नाही ॥
प्रत्येक माणसाने प्राप्त कर्म करून आलेल्या प्रसंगाला सामोरं जायला हवं. त्यानंतर भगवंताच्या अत्यंत शुद्ध, निर्मळ अशा उपासनामार्गाचा अवलंब करणं गरजेचं आहे. वासना, विकार निपटून काढण्याची ताकद शुद्ध उपासेनमधून प्राप्त करता येते. कर्मफलाला बाजूला सारलं की, मनाची तरल अवस्था साधते. निर्मळ मन ज्ञान ग्रहण करण्यास सुयोग्य होऊन जातं. अशा ज्ञानामुळेच समस्त मानवाचा, जनांचा उद्धार होतो, याबद्दल शंकेला वावच नाही. कर्म, उपासना आणि ज्ञान या तीन टप्प्यांमधून जाणार्या लोकांचा उद्धार होणार, हे नक्की।
पुढे रामदास स्वामी लिहितात-
देहे निरसन करावे। महावाक्य विवरावे।
तेणे संसारी तरावे । काळ नासतो उपाडी॥
प्रत्येकाने मी देह नसून आत्मा आहे, याची जाणीव ठेवून मार्गक्रमण करावं. ’देहबुद्धी ते आत्मबुद्धी’ करावी. हा उपदेश या सवायीमध्ये केलेला आहे. ‘अहंम् ब्रह्मास्मी’ या बोधभावावर जगलं की आपली देहाची आसक्ती, वासना संपून जातात. त्यामुळे काळाने देहावर झडप घालण्याआधी महावाक्याचा अंगीकार केल्यामुळे भवसागरात बुडण्याचं भय संपून जातं.
एक एक प्रगतीच्या पायरीवर घेऊन जाणारी गुरुवारची सवायी आहे. चौथ्या म्हणजे शेवटच्या ओवीत रामदास स्वामी सांगतात –
ज्यास नाही येणे जाणे ।
नाही जन्म ना मरणे ।
सदय पाविजे श्रवणे ।
दास म्हणे हे सही ॥
सुयोग्य श्रवणाचा निरंतर लाभ घेऊन त्याचा अभ्यास केला की, त्या उच्च देहाच्या पल्याडच्या भावावस्थेत जीवन व्यतीत करावं. ज्यांना हे साधलं ना त्यांची जन्म-मृत्यूच्या फेर्यातून सुटका होते. पुनश्च येण्याचा आणि जाण्याचा त्रास संपून जातो. यालाच तर ‘मुक्ती’ म्हणतात. गुरुवार म्हणजे दत्तप्रभूंचा वार ! दत्तप्रभूदेखील आपल्या भक्ताला चौर्याऐंशी लक्ष फेर्यातून मुक्त करतात. तेच समर्थ रामदास स्वामींनी गुरुवारच्या चार ओव्यांमधून मार्मिकपणे कथन केलेलं आहे.
श्रीरामाचं स्मरण ठेवलं की, देहाचं विस्मरण होतं. रामाचा जयजयकार केला की, जीवनात खर्या अर्थाने ज्ञानरूपी राम प्रगट होतो. पुढचे व अंतिम ध्येय म्हणजे मोक्ष! त्याचा सहजपणाने लाभ होतो. एखाद्या योग्याला साधणार नाही ते साध्या माणसाला साधतं. वासना विरल्या, क्षय पावल्या की, सगळी चिंता संपून जाते. पुनश्च जन्माला येण्याचा धोका टळतो. निष्काम कर्म, भक्ती, उपासना, सत्संग याचा पूर्ण परिपाक म्हणजे मुक्तीचा लाभ! समर्थ रामदास स्वामींनी सवायांमधून सुंदर उपदेशामृताची घुटी भक्तांना मोठ्या मनाने दिलेली आहे. आपणही ती घुटी पिऊन ब्रह्मांडाच्या, सृष्टीच्या फेर्यातून सुटका करुन घ्यायला हवी!
-कौमुदी गोडबोले