नितीशकुमार यांच्या मनातील चलबिचल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


 


नितीशकुमार यांना भाजपबरोबरच्या युतीचे फायद्यापेक्षा तोटेच जास्त दिसत असावेत. त्यामुळे त्यांची चलबिचल सुरू आहे. तेव्हा, बिहारमधील सद्य राजकीय परिस्थितीचा घेतलेला हा आढावा...

 

पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे सत्तारूढ पक्ष म्हणून भाजपची, तर विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस व प्रादेशिक पक्षांची तारांबळ उडालेली दिसते. प्रत्येक पक्ष, मग तो राष्ट्रीय असो वा प्रादेशिक असो, वाटाघाटीच्या माध्यमातून जास्तीत जास्त फायदा पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहे. यातही सत्तारूढ पक्ष म्हणजे भाजप, तर आधीपासून कामाला लागला आहे. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे मे २०१४ मध्ये जशी मोदींच्या बाजूने लाट होती तशी आज नाही. दुसरे म्हणजे, गेल्या अनेक पोटनिवडणुकांत विरोधी पक्षांच्या युतीने भाजपचा पराभव केला आहे. परिणामी, आज तरी विरोधी पक्ष जोरात, तर भाजप सावधगिरीच्या पवित्र्यात आहेत.

 

याचा परिणाम भाजपचे जे अनेक प्रादेशिक मित्र आहेत, त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. महाराष्ट्रात तर शिवसेना स्वबळावर लढण्याच्या घोषणा करत असते, तर तिकडे काश्मीरमध्ये भाजपनेच पुढाकार घेऊन पीडीपी सोबत असलेली युती तोडली आहे. परिणामी, आता लक्ष लागले आहे ते बिहारकडे; जिथे आज जनता दल (युनायटेड) आणि भाजपचे युती सरकार सत्तेत आहे. मात्र, अलीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची वक्तव्ये बघितली की, तिथे सर्व आलबेल आहे, असे दिसत नाही. गेल्या काही महिन्यांपासून नितीशकुमार भाजपबरोबरची युती तोडून विरोधी पक्षांच्या ‘महागठबंधन’ मध्ये परत येतील, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. जून महिन्याच्या शेवटी नितीशकुमार यांनी मुंबईत वैद्यकीय उपचार घेत असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या तब्येतीची दूरध्वनीवरून चौकशी केली. तेव्हापासून नितीशकुमार ‘महागठबंधन’ मध्ये परत येतील, या अफवांना ऊत आला. बिहारमधील आजचे महत्त्वाचे नेते व लालूप्रसाद यांचे ज्येष्ठ पुत्र तेजस्वी यादव यांनी नुकतेच जाहीर केले आहे की, जरी नितीशकुमार यांना परत येण्याची इच्छा असली तरी आम्ही आता त्यांना परत घेणार नाही. आज तिशीत असलेल्या तेजष्वी यादवांचा ‘अननुभवच’ यातून व्यक्त होत होता. त्यांच्या कदाचित अजून लक्षात आलेले नसेल की, राजकारण म्हणजे ‘जे शक्य आहे ते करण्याचा खेळ’.

 

नितीशकुमार ‘महागठबंधना’त परत येतील की नाही हे काळच दाखवेल. त्यांनी मागच्या वर्षी ‘महागठबंधन’ तोडून भाजपबरोबर युती केली. ही कदाचित त्यांच्या राजकीय कारर्किदीची घोडचूक ठरू शकेल. याचे कारण असे की, आता जरी ते ‘महागठबंधन’मध्ये सामील झाले तरी त्यांना आता तो मान मिळणार नाही, जो त्यांना ‘महागठबंधन’मध्येच राहिले असते तर मिळाला असता. तेव्हा तर नितीशकुमार यांच्याकडे सर्व देश नरेंद मोदींना ‘समर्थ पर्याय’ म्हणून बघत होता. त्यांनी मागच्या वर्षी ‘महागठबंधन’ सोडून भाजपशी जर युती केली नसती, तर आज बिगरभाजप आघाडीच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार हा मान त्यांच्याकडे चालून आला असता. या ‘जर’ किंवा ‘तर’च्या गोष्टी आहेत. राजकारणात अशा गोष्टींना फारसे स्थान नसते. इथे रोकडा व्यवहार असतो.

 

सध्याच्या स्थितीत जनदा दल (युनायटेड) व भाजप यांच्यात जागावाटपावरून वाद रंगण्याची दाट शक्यता आहे. बिहारमधून लोकसभेसाठी ४० खासदार निवडले जातात. मे २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांत जनता दल (युनायटेड) ला फक्त दोनच जागा जिंकता आल्या होत्या, तर भाजपने २२ जागा जिंकल्या होत्या. तेव्हा भाजपबरोबर रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती पक्षसुद्धा होता. या पक्षाला तेव्हा सहा जागा सोडल्या होत्या. आताही पासवान किमान सहा जागा तरी मागतीलच. मात्र, नितीशकुमार यांना जास्त जागा लागतील यात शंका नाही. थोडक्यात म्हणजे, या खेपेस भाजपला जर युती हवी असेल, तर खूप जागा सोडण्याची तयारी ठेवावी लागेल. नितीशकुमार यांचा पक्ष काय किंवा पासवान यांचा पक्ष काय, हे दोन्ही पक्षं प्रादेशिक पक्षं आहेत. अशा पक्षांना दिल्लीच्या राजकारणापेक्षा आपापल्या राज्याच्या राजकारणात जास्त रस असतो. असे असले तरी दिल्लीच्या राजकारणात भाजपचे आपल्या पक्षावरील अवलंबून असणे वाढवायचे असेल, तर आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त खासदार दिल्लीत असणे गरजेचे आहे आणि याबद्दल दोघांच्या मनांत एकच विचार आहे.

 

राजकीय क्षेत्रात नेते आपल्या सोयीने युती करतात व गरज संपली, फायदे संपले की युती तोडतात. यात नवीन काहीही नाही. मात्र, जेव्हा एखादा राजकीय नेता असे वारंवार करतो तेव्हा तो समाजाचा विश्वास गमावून बसतो. आज नितीशकुमारबद्दल अशीच स्थिती निर्माण झाली आहे. नितीशकुमार व लालूप्रसाद यांनी तरुणपणी राजकीय जीवनाची सुरूवात एकत्रपणे केली होती. १९९० च्या दशकात लालूप्रसाद व नितीशकुमार एकत्र होते. नंतर नितीशकुमारांनी चार राजकीय कोलांटउड्या मारल्या. नितीशकुमार यांनी १९९६ साली भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेश केला. एवढेच नव्हे, तर नितीशकुमार वाजपेयींच्या मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री होते. नंतर त्यांनी २०१३ साली बिहारमध्ये भाजपशी असलेली युती तोडली व रालोआला रामराम ठोकला.

 

नंतर नितीशकुमार यांनी २०१५ साली लालूप्रसाद यांच्याशी युती करत बिहारमध्ये ‘महागठबंधन’चा यशस्वी प्रयोग केला. त्यावर्षी बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत अभूतपूर्व यश मिळवले व मे २०१४ मध्ये भाजपच्या उधळलेल्या वारूला लगाम घातला होता. तेव्हापासून नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तर मोदीजींना आव्हान उभे करता येईल, अशी चर्चा सुरू होती. त्यांनी जुलै २०१७ मध्ये ‘महागठबंधन’मधून बाहेर पडत भाजपशी पुन्हा युती केली. या त्यांच्या निर्णयामुळे सर्वांना धक्का बसला होता व त्यांच्यावर विश्वासघाताचा आरोप केला होता. मतदारांनी ‘महागठबंधन’ला मते दिली होती. नितीशकुमार यांना एवढा विश्वास वाटत असेल, तर त्यांनी विधानसभा विसर्जित करावी व नव्याने जनादेश घ्यावा असे विरोधक आव्हान देत होते. पण, नितीशकुमारांनी त्याकडे दुर्लक्ष करत भाजपबरोबर मंत्रिमंडळ स्थापन केले. आता ते पुन्हा ‘महागठबंधन’मध्ये परत येण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या झळकत आहेत. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे अलीकडे झालेल्या पोटनिवडणुकांत त्यांच्या पक्षाला मतदारांनी मोठ्या संख्येने पराभूत केलेले आहे. म्हणूनच नितीशकुमार भाजपशी केलेल्या युतीतून बाहेर पडण्याचा विचार करत आहेत.

 

यामागे बिहारमधील सामाजिक स्थिती व राजकीय स्थिती कारणीभूत आहे. मे २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकांत जनता दल (युनायटेड) ला एकूण १६ टक्के मते मिळाली होती. जे समाजगट नितीशकुमार यांच्या पक्षाला मते देतात, तेच भाजपचेसुद्धा समर्थक आहेत. त्यामुळे नितीशकुमार यांना २०१९ मध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकांत व २०२० बिहार विधानसभेच्या निवडणुकांत फारसा राजकीय फायदा होईल असे वाटत नाही. म्हणूनसुद्धा ते भाजपशी असलेल्या युतीचा पुनर्विचार करत आहेत. यामागे, नितीशकुमार यांच्या आणखी काही महत्त्वाकांक्षा आहेत. त्यांना यथावकाश देशाचे राजकारण करायचे आहे व तसा त्यांचा अनुभवही आहे. त्यांचा पुढच्या वर्षी अस्तित्वात येणाऱ्या लोकसभेत आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त खासदार असावेत असा प्रयत्न असेल. म्हणजे मग बिगर भाजपविरोधी पक्षांची ताकद कमी पडली तर ते पुन्हा महागठबंधनात शिरू शकतील. आज अशी स्थिती आहे की, नितीशकुमार यांना भाजपबरोबरच्या युतीचे फायद्यापेक्षा तोटेच जास्त दिसत असावेत. त्यामुळे त्यांची चलबिचल सुरू आहे.

 

आज भारतातील राजकीय वातावरण असे आहे की, भाजपचे एकेक मित्र काही ना काही कारणास्तव दुरावत चालले आहेत. या संदर्भात दोन उदाहरणे नेहमी दिली जातात. एक म्हणजे महाराष्ट्रातील शिवसेना व पंजाबातील अकाली दल. आज हे दोन्ही मित्र पक्ष भाजपवर नाराज आहेत. यात जर नितीशकुमार यांची भर पडली, तर हे भाजपला महाग पडेल. म्हणूनच मागच्या आठवड्यात भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी पाटण्याला जाऊन नितीशकुमार यांची भेट घेतली व युतीत सर्व आलबेल आहे, असे पत्रकार परिषद घेऊन सांगितले. अमित शहांनी सांगितले म्हणून बिहारमधील राजकीय परिस्थिती बदलेलच असे नाही. नितीशकुमार यांच्या मनात जे किंतु आहेत, त्याबद्दल त्यांचे समाधान झाले नाही; तर या युतीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होईल. भाजपला ही परिस्थिती सांभाळून हाताळावी लागेल.

9892103880

@@AUTHORINFO_V1@@