धाव रे रामराया...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2018   
Total Views |


 


देशातील वातावरण कसे आहे आणि त्याची भावी दिशा काय असू शकेल, याची काहीशी कल्पना यावरून यावी. तसेच काँग्रेस आणि साम्यवादी कम्युनिस्ट पक्षावर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘धाव रे रामराया...’ म्हणण्याची वेळ का आली, हे सूज्ञास सांगायला नको!

 
सध्या सर्वत्र भाजपला कोंडीत कसे पकडता येईल, याची व्यूहरचना करणे चाललेले आहे. तसेच भाजपच्या शासनकाळात अल्पसंख्याक समाजाच्या मनात कसे भीतीचे वातावरण तयार होत चालले आहे, हे ठसविण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसचे खा. शशी थरूर असोत वा उपराष्ट्रपतीपद भूषविलेले हमीद अन्सारी असोत किंवा अगदी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी असोत, या नेत्यांसह विविध नेत्यांनी भाजप आणि संघ परिवारामुळे अल्पसंख्याक समाज अस्वस्थ असल्याची आवई उठवली आहे. एकीकडे असे चालू असतानाच हिंदू समाजास आपल्या बाजूने कसे वळविता येईल, यासाठीही प्रयत्न चालल्याचे दिसत आहेत. गुजरातच्या निवडणुकीपासून त्याचे प्रत्यंतर येत आहे. आता या प्रयत्नात, धर्म ही अफूची गोळी आहे, असे म्हणणारे साम्यवादीही उतरले आहेत. अजून ते उघडपणे तसे दाखवत नाहीत पण आपल्या प्रभावाखालील संस्थांच्या माध्यमातून धर्माचा आधार घेऊन राजकारण करण्याचे प्रयत्न त्यांनी चालवले आहेत.
 

आज 17 जुलै. आजपासून ‘करक्कडम’ या मल्याळी महिन्याची सुरुवात होते. या पवित्र महिन्यात केरळमधील हिंदू घरांमध्ये ‘अध्यात्म रामायण’ वाचले जाते. हे निमित्त साधून ‘खरा’ राम कसा होता, हे जनतेला सांगण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करणार आहे. हिंदू राष्ट्रवाद्यांच्या कचाट्यातून रामायण मुक्त करण्याचा प्रयत्न याद्वारे होणार आहे. त्यासाठी काँग्रेसने आणि साम्यवाद्यांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. ‘करक्कडम’ महिन्याच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसने तिरुवनंतपुरम येथील गांधी भवनात खा. शशी थरूर यांचे भाषण ठेवले आहे. प्रदेश काँग्रेसच्या विचार विभागाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केरळमध्ये ‘करक्कडम’ महिन्यात असा उपक्रम काँग्रेसकडून प्रथमच राबविला जात आहे. गांधीजींना अभिप्रेत असलेल्या रामराज्य संकल्पनेच्या सर्व बाजूंवर या निमित्ताने प्रकाश टाकण्यात येणार असल्याचे त्या पक्षाकडून सांगण्यात आले. येथे एक प्रश्न सहज मनात येतो की, ज्यावेळी काँग्रेस पक्षाची देशावर सत्ता होती त्या काळात त्यांना रामराज्याची आठवण का झाली नाही? रामराज्याचा विसर पडल्यानेच देशाची अत्यंत वाईट अवस्था झाली, हे त्या पक्षाच्या आतापर्यंत लक्षात कसे आले नाही? मग आताच रामरायाचा धावा करावासा का वाटला? कारण स्पष्ट आहे. संघ परिवाराने देशभर जे राममय वातावरण निर्माण केले आहे, त्याचा प्रभाव कमी करायचा! संघ परिवाराच्या संकल्पनेतील राम आणि आमच्या संकल्पनेतील राम हा कसा ‘वेगळा’ आहे, हे जनतेच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जाणार आहे.

 

काँग्रेसप्रमाणे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही या महिन्यात रामभक्ती करण्याचे ठरविले आहे. केरळमधील ‘संस्कृत संगम’ या संस्थेने केरळमधील सर्व जिल्ह्यांमध्ये रामायणावरील प्रवचनांचे आयोजन केले आहे. ‘संस्कृत संगम’ ही संस्था डाव्या विचारांच्या प्रभावाखाली आहे. या संस्थेचे जिल्हा पातळीवरील पदाधिकारी हे साम्यवादी पक्षाचे सदस्य आहेत वा त्यांचे सहयोगी आहेत. केरळचे एक मंत्री कडकम्पल्ली यांनी धर्मनिरपेक्ष रामायण जनतेला समजावून सांगण्याच्या या उपक्रमाचे स्वागत केले. त्याचवेळी भाजप आणि संघ परिवारावरही तोंडसुख घेतले. सत्ता मिळविण्यासाठी आणि ती टिकविण्यासाठी भाजप आणि संघ रामायणाचा साधन म्हणून वापर करीत असल्याची टीका करण्यास ते विसरले नाहीत. या उपक्रमातून भक्तांच्या भावना दुखविल्या जाणार नाहीत, हे सांगण्यासही हे साम्यवादी विसरले नाहीत. गेल्या कित्येक वर्षांपासून केरळमध्ये संघ परिवारातील कार्यकर्त्यांच्या अमानुष हत्या करताना त्यांची बुद्धी कोठे गेली होती? आपली कारकीर्द अशा राक्षसी कृत्यात घालविलेल्या डाव्या मंडळींना आता राम आठवावा, याचे कारण अगदी स्पष्ट आहे. आता त्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली आहे. हिंदू समाजाची मते आपल्यापासून दुरावतील, अशी भीती काँग्रेस आणि साम्यवादी अशा दोघांनाही वाटू लागल्याने त्यांनी रामरायाचा धावा चालू केला आहे.

 

एकीकडे असे चित्र दिसत असताना, काँग्रेस पक्ष कधी हिंदू समाजास चुचकारण्याची तर कधी नेहमीप्रमाणे मुस्लीम समाजाचा अनुनय करण्याची भूमिका घेताना दिसत आहे. गुजरातमधील निवडणुकीच्या वेळी मंदिरांना भेटी देण्याचा सपाटा राहुल गांधी यांनी लावला होता. आपण ‘जनेऊधारी’ हिंदू असल्याचेही या निमित्ताने त्यांनी उघड केले होते. हे सर्व निवडणुका जिंकण्यासाठी चालले आहे, हे जनतेने ओळखले होते. गुजरात, कर्नाटकमधील निवडणुका झाल्यानंतर आता त्यांनी आपल्या भूमिकेत बदल केला असल्याचे दिसून येत आहे. मुस्लीम बुद्धिवंतांच्या एका सभेत बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी, काँग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष आहे, असे विधान केल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. तो मुद्दा पकडून भाजपनेत्या आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसवर तडाखेबंद टीका केली. काँग्रेस अत्यंत धोकादायक खेळ खेळत असून 2019 मध्ये होणार्या निवडणुका लक्षात घेऊन धार्मिक पत्त्यांचा वापर करीत असल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेसच्या अशा वागण्याने 1947 सारखी परिस्थिती देशात निर्माण होईल, असा इशारा त्यांनी दिला. काँग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष आहे, या राहुल गांधी यांच्या म्हणण्याचा नेमका अर्थ काय, हे स्वत: राहुल गांधी यांनी स्पष्ट केले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. पण काँग्रेसने त्या वृत्ताचे खंडन केले आणि काँग्रेस हा 132 कोटी देशवासीयांचा पक्ष असल्याचे स्पष्टीकरण त्या पक्षाने दिले.

 

हमीद अन्सारी आणि मोहम्मद अली जिना

 

आपले माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी पदावरून पायउतार झाल्यानंतर केलेल्या वक्तव्यामुळे ते वादाच्या भोवर्यात सापडले होते, पण त्यातून त्यांनी काही धडा घेतल्याचे दिसत नाही. नुकतेच त्यांनी असेच वादग्रस्त विधान केले. देशात जर व्हिक्टोरिया स्मारक चालत असेल तर मोहम्मद अली जिना यांच्या चित्रास विरोध कशासाठी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. अन्सारी हे अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते. त्या विद्यापीठात असलेल्या जिना यांच्या चित्राबद्दल त्यांना काहीच चुकीचे वाटत नाही! ज्या जिना यांच्यामुळे देशाची फाळणी झाली, हजारो निरपराध व्यक्तींच्या अमानुषपणे हत्या झाल्या, हजारो देशोधडीला लागले... तरीही जिना त्यांना महान वाटतात! आणि अशी व्यक्ती उपराष्ट्रपतीपदही भूषविते, याला काय म्हणायचे!

 

थरूर यांचा बोलविता धनी कोण असावा?

 

हमीद अन्सारी यांनी एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत हे तारे तोडले आहेत. तर तिकडे काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप सत्तेवर आल्यास भारत हा ‘हिंदू पाकिस्तान‘ बनेल, असे तारे तोडले होते. थरूर यांच्या या वक्तव्यावर सगळीकडून टीका झाली. अगदी काँग्रेस पक्षानेही थरूर यांच्या मताशी आपला पक्ष सहमत नसल्याचे स्पष्ट केले. तरीही आपण आपल्या मतावर ठाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे जर लक्षात घेतले तर त्यांचा बोलविता धनी कोण असावा, याचा अंदाज आल्यावाचून राहत नाही. देशातील वातावरण कसे आहे आणि त्याची भावी दिशा काय असू शकेल, याची काहीशी कल्पना यावरून यावी. तसेच काँग्रेस आणि साम्यवादी कम्युनिस्ट पक्षावर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘धाव रे रामराया...’ म्हणण्याची वेळ का आली, हे सूज्ञास सांगायला नको!

9869020732

@@AUTHORINFO_V1@@