थरुर यांची भीतीची चावी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jul-2018   
Total Views |


 


शशी थरुर यांना तिरुअनंतपुरममधून उभे राहायचे आहे. निवडून यायचे आहे. त्यांच्या मतदारसंघात बहुसंख्य ख्रिश्चन आहेत, मुसलमान आहेत. ते अल्पसंख्य आहेत. त्यांच्या मनात भीती निर्माण केल्याशिवाय ते आपल्याला मते देणार नाहीत, हे थरुर यांना माहीत आहे. Fear is a Key’ असे इंग्रजीत म्हणतात. मतदारांच्या मतांच्या पेटीचे कुलूप उघडण्यासाठी थरुर यांना या ’भीतीच्या चावी‘चा उपयोग करायचा आहे. ही त्यांची मजबूरी आहे.

 

तिरुअनंतपूरम येथे काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी जी मुक्ताफळे उधळली, ती वेचूनवेचून मराठीतील एका नामवंत दैनिकाने वाचकांच्या झोळीत टाकलेली आहेत. ही मुक्तापळे अशी - ‘भाजपने २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकली, तर लोकशाही प्रदान करणारी आपली घटना संपुष्टात आणण्यात येईल आणि त्यामुळे भारताची स्थिती पाकिस्तानसारखी होईल. भाजपची घटना हिंदू राष्ट्रावर आधारित असेल. त्यामध्ये अल्पसंख्यकांचे अधिकार डावलले जातील. हा देश हिंदू पाकिस्तान बनेल. मात्र, असा देश निर्माण करण्यासाठी म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद आणि अन्य स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्याची लढाई लढली नव्हती.’

 

शशी थरुर जसे राजकारणी आहेत, तसे खासगी आयुष्यात अत्यंत रोमँटिक आहेत. सुनंदा पुष्कर या आपल्या तिसऱ्या पत्नीच्या गूढ मृत्यू संदर्भात सीबीआयच्या चौकशीच्या जाळ्यात ते अडकले आहेत. त्यांचा आणखी एक मोठा गुण म्हणजे, ते अभ्यासू व विद्वानदेखील आहेत. राजकारणी नेत्यांमध्ये त्यामुळे ते उठून दिसतात. गंभीरपणे वाचावीत अशी त्यांनी लिहिलेली Pax Indica, Why I Am a Hindu, Nehru: The Invention of India, India Shastra: Reflections on the Nation in Our Time पुस्तके आहेत. त्यातील An Era of Darkness: The British Empire in India हे ब्रिटिशांच्या काळ्याकुट्ट राजवटीसंदर्भातील पुस्तक आहे. तसे शशी थरुर ‘काळ्या इंग्रजांच्या यादीत मोडणारे असले, तरी त्यांनी ‘गोऱ्या इंग्रजांच्या ‘काळ्या कारवायां’बद्दल हे पुस्तक लिहून भारतीयांची खूप मोठी सेवा केली आहे.

 

विद्वान माणूस जेव्हा राजकारणी होतो तेव्हा, कधीकधी राजकारणी त्याच्या विद्वत्तेवर मात करतो आणि लालू प्रसाद यावर काय बोलतील? त्यांना लाजविणारे वक्तव्य राजकारणी शशी थरुर करून जातात. ‘भारत हिंदू-पाकिस्तान बनेल’,’लोकशाही संपुष्टात येईल’ , ‘घटना संपुष्टात येईल’ ही सर्व वक्तव्ये राजकारणी माणसाच्या तोंडी शोभतात. अभ्यासू विद्वानांच्या तोंडी ती शिव्यांसारखी वाटतात. हा माणूस अशी असंबद्ध व वेड्यासारखी बडबड का करू लागला आहे? अशी बडबड करण्याचा ठेका महाराष्ट्रातील राष्ट्रवादी, काँग्रेस आणि काही रिपब्लिकन नेत्यांनी घेतलेला आहे. ती त्यांची मक्तेदारी आहे. शशी थरुर ती मोडायला का निघाले आहेत? त्याचबरोबर त्यांनी स्वत:ला महाराष्ट्रातील नेत्यांच्या पंक्तीला नेऊन का बसविले? एवढे अध:पतन कशासाठी?

 

Why I am a Hindu? हे शशी थरुर यांचेच पुस्तक आहे. शशी थरुर यांचं हे वक्तव्य वाचल्यानंतर मला वाटले की, बहुथा थरुर यांनी ‘मी’ वरील पुस्तक लिहिले आहे, हे विसरले असावे. या पुस्तकात आपण काय लिहिले आहे, हे त्यांनी पुन्हा एकदा वाचले पाहिजे. ‘मी हिंदू असल्याचा मला अभिमान आहे. माझे हिंदूपण सर्वसमावेशक आहे. वेदकाळापासून त्याला फार मोठी प्राचीन परंपरा आहे. याज्ञवल्क्य ते विवेकानंद असा हिंदूपणाचा प्रवास आहे.’ हे शशी थरुर यांच्या पुस्तकाच्या अर्ध्या भागाचे सार आहे. ते वाचल्यानंतर कुणालाही आपल्या हिंदूपणाचा जबरदस्त अभिमान वाटल्याशिवाय राहाणार नाही. त्यांच्याच लिखाणाचे सार सांगायचे, तर ‘हिंदू माणूस कधीही असहिष्णू होऊ शकत नाही. हिंदू माणूस इस्लामी मानसिकतेचा होऊ शकत नाही. हिंदू माणूस केवळ आपलाच विचार करणारा होऊ शकत नाही. हिंदू माणूस विश्वाचा विचार करणाराच असतो. एवढेच नाही तर, तो सृष्टीतील सर्व प्राणिजीवनाचा विचार करणारा असतो. ही त्याची मानसिकता कोणालाही बदलता येणार नाही. कोणी तसा प्रयत्न केल्यास, त्याचे हात पोळल्याशिवाय राहणार नाहीत. हिंदू माणूस जेव्हा मुसलमान किंवा ख्रिश्चन होतो, तेव्हाच तो असहिष्णू आणि विद्धंसक विचारांचा होतो. जसे पाकिस्तानातील ‘हिंदू मुसलमानांचे’ झालेले आहे. पाकिस्तानातील सर्व मुसलमान पूर्वीचे हिंदूच आहेत - हिंदूपण विसरलेले’

 

लोकशाही हिंदू माणसाच्या रक्तात भिनलेली आहे. ती त्याच्या डी.एन.ए.मध्ये आहे. लोकशाहीचा मूलाधार, मुक्तचर्चा, अमर्याद विचारस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यात आहे. ते हिंदू माणसाला पाच हजार वर्षांपासून प्राप्त झालेले आहे. आपल्या राज्यघटनेने परंपरेने जे आपल्याला प्राप्त झाले, त्याचा फक्त स्वीकार केला आहे. त्याच्यावर घटनेच्या मान्यतेची मोहोर उमटवली आहे. यापेक्षा विपरीत घटना कोणी केली असती, तर लोकांनी ती केव्हाच फेकून दिली असती. इंदिरा गांधींनी १९७५-७६ साली तसा प्रयत्न केला. जनतेने त्यांना सत्तेवरून फेकून दिले. भारतातील लोकशाहीला आणि राज्यघटनेला हात लावण्याची ताकद किंवा ती दूर करण्याची ताकद कोणत्याही राजकीय पक्षात नाही. भाजपने तसा प्रयत्न केल्यास ‘या देशात भाजप नावाचा एक राजकीय पक्ष होता आणि त्याचा अपमृत्यू अमूक-अमूक साली झाला’ असा मृत्यूशिलालेख लिहावा लागेल. आपल्याला भाजपची जी माहिती आहे, त्यावरून भाजप या मार्गाने जाण्याचे जागेपणी सोडाच स्वप्नातही विचार आणू शकत नाही.

 

शशी थरुर यांनी भाषण करताना व्हीस्की, रम अथवा व्होडका थोडी जास्त घेतली होती का? कारण, नशा आल्याशिवाय ‘भाजपची घटना हिंदू राष्ट्रावर आधारित असेल, त्यामध्ये अल्पसंख्यकांचे अधिकार डावलले जातील’ असली बेताल वाक्ये कशी बरे तोंडातून बाहेर येतील? तीसुद्धा विद्वान माणसांच्या मुखातून? भारत हे अनादी काळापासून हिंदू राष्ट्र आहे, आज आहे, आणि उद्याही राहणार आहे. जोपर्यंत या देशात हिंदू आहेत आणि त्यांच्या प्रवृत्ती, विचार आणि स्वभावाप्रमाणे हे राष्ट्र चालू आहे; तोवर ते हिंदू राष्ट्रच राहील. ते निवडणुकांनी निर्माण होत नाही. निवडणुका नसल्याने ते नाहीसे होत नाही. निवडणुका जिंकल्यामुळे त्याला बळकटी येत नाही आणि निवडणुका हरल्यामुळे ते दुर्बल होत नाही. ते स्वयंभू, स्वयंसिद्ध आणि स्वरक्षित आहे. या हिंदू राष्ट्राची घटना कोणी लिहिलेली नाही, कोणाला लिहिताही येणार नाही. ती अनादी कालापासून अलिखित आणि स्वयंसिद्ध आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की, या घटनेची मूलतत्त्वे आपल्याला थरुर यांच्या Why I am a Hindu? या पुस्तकात वाचायला मिळतात. थरुर यांनी आपलेच पुस्तक पुन्हा एकदा वाचावे आणि स्वत:च्या डोक्याला थोडी कल्हई करून घ्यावी.

 

थरुर हे अभ्यासू आणि विद्वान राजकारणी आहेत, हे वर म्हटले आहे. तेव्हा त्यांना राष्ट्र आणि राज्य यातील फरक समजतो, हे आपण स्वीकारले पाहिजे. संविधान हे नेहमी राज्यांचे असते. राज्यांसाठी असते. राज्यांकडे सार्वभौम सत्ता असते. राष्ट्राकडे सार्वभौम सत्ता नसते. राज्यांची सार्वभौम सत्ता कशी राबवायची? त्याचे नियम कोणते? त्याच्या मर्यादा कोणत्या? सत्तेचा गैरवापर झाल्यास त्यावर अंकुश कोणाचा? या सर्व गोष्टी संविधानातून स्पष्ट केलेल्या असतात. शासन संविधानामुळे येते. संविधानामुळे निवडणुका होतात. संविधानामुळे सत्तांतर होते. संविधानामुळे सरकारचे कायदे योग्य की अयोग्य याचा निर्णय न्यायालय करते. यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल कोणालाही करता येत नाही. संविधानाने तशी परवानगी दिलेली नाही. थरुर यांना हे सर्व माहीत आहे, ते इतर पक्षात जसे अडाणी राजकीय नेते असतात. त्यांच्या पंक्तीत बसणारे राजकीय नेते नाहीत. तरीही, त्यांनी असे वक्तव्य का केले? असा प्रश्न येतोच. ‘मजबुरीका नाम शशी थरुर’ असे आपण म्हणूया. पुढील्या वर्षी निवडणुका आहेत. शशी थरुर यांना तिरुअनंतपूरममधून उभे राहयचे आहे. निवडणून यायचे आहे. त्यांच्या मतदारसंघात बहुसंख्य ख्रिश्चन आहेत, मुसलमान आहेत. ते अल्पसंख्य आहेत. त्यांच्या मनात भीती निर्माण केल्याशिवाय ते आपल्याला मते देणार नाहीत, हे थरुर यांना माहीत आहे. ‘fear is a key’ असे इंग्रजीत म्हणतात. मतदारांच्या मतांच्या पेटीचे कुलूप उघडण्यासाठी थरुर यांना या ‘भीतीच्या चावी’चा उपयोग करायचा आहे. ही त्यांची मजबूरी आहे. अभ्यासू विद्वान माणूस राजकारणात पडला की, त्याची काय अवस्था होते, याचे हे एक अतिशय चांगले उदाहरण आहे.

@@AUTHORINFO_V1@@