विधानपरिषद तहकूब, नाणार प्रकल्पावरुन गदारोळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2018
Total Views |

 
 
नागपूर : गेले २ दिवस नागपूर येथे नाणार प्रकल्पावरुन विधानसभा आणि विधान परिषदेत गोंधळ सुरु आहे. काल या वादावरुन राजदंड पळवण्याचा प्रयत्न शिवसेनेने केल्यानंतर आज देखील या प्रकरणावरुन वातावरण तापले आणि अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करणे भाग पडले. विधानसभेपाठोपाठ विधानपरिषदेतदेखील नाणारवरून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेले पहायला मिळाले.
 
विधानपरिषदेत दुपारच्या विश्रांती नंतर सुरु करण्यात आलेल्या चर्चेत नाणारचा विषय उपस्थित करण्यात आला आणि एकच खळबळ माजली. नाणाराच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रश्न उपस्थित करण्यात आला. नाणार रिफायनरीप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी आणलेला स्थगन प्रस्ताव सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी नाकारल्याने विधानपरिषदेत राष्ट्रवादी, काँग्रेसच्या सदस्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत गदारोळ केला. यामुळे सुरूवातीच्या १५ मिनिटांसाठी आणि नंतर दिवसभरासाठी परिषदेचे कामकाज तहकूब करावे लागले.
 
 
 
 
सत्तेतील आमदारच राजदंड पळवतात :

हे सरकार विश्वासपात्र सरकार नाहीये. संपूर्ण बहुमताने निवडून न आल्याने शिवसेना देखील सत्तेचाच एक भाग आहे, मात्र सत्तेतील आमदारांनाच आपल्याच सत्तेतील दुसऱ्या पक्षाच्या म्हणण्याला विरोध करण्यासाठी राजदंड पळवावा लागतो यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. सत्ताधारी पक्षातील आमदार राजदंड पळवतात असे महाराष्ट्रात आणि देशाच्या इतिहासात कधीही घडले नाही. विरोधी पक्षातील सदस्यांनी हे केले असते, तर सदस्याला बडतर्फ करण्याची भूमिका घेतली असती. पण काल सत्ताधारी सदस्यांनी जे केले त्यावर काहीच झाले नाही." असे म्हणत सुनील तटकरे यांनी सरकारला सुनावले तसेच आपली नाराजी व्यक्त केली.
 
 
 
 
  कोंकणवासियांच्या मनात संभ्रम आहे :
 
"मुख्यमंत्र्यांनी एक बाब स्पष्ट केली की नाणारविषयी सुभाष देसाईंचा अभ्यास झाला आहे पण सरकारचा झालेला नाही. ही सरकारमधील विसंगती आहे. कोकणवासियांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. हे सरकार टेकू असलेले सरकार आहे, त्यामुळेच हे घडत आहे." असेही सुनील तटकरे याेवेळी म्हणाले. 
@@AUTHORINFO_V1@@