रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते उद्या चंद्रपूर आणि बल्लारपूर रेल्वे स्थानकांचा सन्मान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2018
Total Views |
 
 
 
 
 
नवी दिल्ली : स्वच्छ व सुंदर रेल्वे स्थानकांच्या स्पर्धेत देशात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या चंद्रपूर आणि बल्लारपूर रेल्वे स्थानकांच्या कामगिरीसाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते दिनांक १२ जुलै २०१८ रोजी रेल्वे भवनात पारितोषिक वितरित करून सन्मान करण्यात येणार आहे.
 
रेल्वे स्थानक परिसरात कलात्मकतेचा उपयोग करून स्वच्छतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने ‘सुंदर रेल्वे स्थानक’ या संकल्पनेवर आधारित स्पर्धेचे आयोजन केले. यात देशातील ११ रेल्वे विभागांतून ६२ प्रवेशिका रेल्वे मंत्रालयास प्राप्त झाल्या. स्पर्धेत महाराष्ट्रातील बल्लारशाह व चंद्रपूर रेल्वे स्थानकांनी पहिला क्रमांक मिळवत देशातील सर्वात सुंदर रेल्वे स्थानकाचा मान मिळविला. पुरस्कार स्वरूपात या दोन्ही रेल्वे स्थानकांना प्रत्येकी १० लाखांचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी रेल्वेचे अधिकारी, नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि राज्याच्या वनविभागाच्या सचिव उपस्थित राहणार आहेत.
 
 
 
वर्षभरात झाला रेल्वे स्थानकांचा कायापालट
 
 
राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील या स्थानकांचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय झाला. वर्षभरापूर्वी याठिकाणी नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयामार्फत आदिवासींमध्ये असणाऱ्या लोककला आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवाच्या वैभवाला साकारण्यासाठी चित्रकारांच्या चमू कार्यरत झाल्या. बघता बघता चंद्रपूर आणि बल्लारपूर रेल्वे स्टेशनचा कायापालट झाला. चंद्रपूर आणि बल्लारपूर रेल्वे स्टेशन वर आलेल्या प्रत्येक प्रवाशाला या ठिकाणी काढण्यात आलेल्या विविध वन्यजीवांचे चित्र आकर्षून घेते. बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर साक्षात ताडोबा मधील पराक्रमी वाघ पायऱ्यांवर साकारला असून हा एक सेल्फी पॉईंट झाला आहे.
 
 
 
त्यामुळे बल्लारपूर स्टेशन वर केलेला कुठलाही प्रवासी या ठिकाणी वाघाच्या समोर उभा राहिलेला सेल्फी काढल्याशिवाय बाहेर पडत नाही. गेल्या वर्षभरात यासाठी प्रयत्न करणारे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या रेल्वे स्थानकांचा गौरव केल्याबद्दल रेल्वेमंत्र्यांचे यासाठी आभार मानले आहेत. नॅशनल ट्रान्स्पोर्ट इनहाऊस स्टेशन ब्युटीफिकेशन स्पर्धेमध्ये चंद्रपूर आणि बल्लारपूर ही रेल्वेस्थानके प्रथम आली आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@