अमर्त्य सेनांचे न पटणारे विश्लेषण...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2018   
Total Views |


 

अमर्त्य सेन यांनी २०१४ साल का निवडले? कारण २०१४ साली नरेंद्र मोदी यांचे सरकार अधिकारावर आले. २०१३ साली अमर्त्य सेन भारतात आले असताना त्यांनी जाहीरपणे म्हटले, “मोदी भारताचे पंतप्रधान होता कामा नये.” नोबेल पारितोषिकधारकाची ही प्रेषितवाणी भारतातील मतदारांनी ऐकली नाही आणि त्यांनी मोदी यांना निवडून दिले. भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत दिले. यामुळे अमर्त्य सेन यांचा ‘इगो’ दुखावला गेला. त्यानंतर त्यांनी जेथे जेथे संधी मिळेल, तेथ तेथे मोदींवर टीका करायला सुरुवात केली.

 

अमर्त्य सेन हे जागतिक कीर्तिचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत. अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक त्यांना प्राप्त झाले आहे. नोबेल पारितोषिकांच्या मानकऱ्यांत भारतीय फार कमी असतात, त्यामुळे एखाद्या भारतीयाला किंवा भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञ किंवा विद्वानाला नोबेल पारितोषिक मिळाले की, तो आपल्या दृष्टीने मोठा ‘हिरो’ होतो. भारतात बुद्धिवाद्यांचे काही मंच आहेत. सामान्य माणसाला तेथे काही स्थान नसते. अशा मंचावरून नोबेल पारितोषिकप्राप्त (नोबेल लॉरिएट- हा बुद्धिवाद्यांचा शब्द आहे.) व्यक्तीला हमखास बोलावले जाते. तो जे काही बोलतो त्याला, सर्व प्रसिद्धीमाध्यमे भन्नाट प्रसिद्धी देतात. नोबेल हिरोच्या मुखातून आलेला शब्द, त्यांच्या दृष्टीने बायबल आणि कुराणाचा शब्द असतो. त्यामुळे तो पवित्र असतो.

 

अमर्त्य सेन वेळोवेळी भारतात येतात (ते भारतीय असले तरी त्यांचे वास्तव्य अमेरिकेत असते, हॉर्वर्ड विद्यापीठात ते प्राध्यापकी करत होते) अशा मंचावरून ते आपली मते मांडतात. एखाद्या विषयातील तज्ज्ञ माणूस आपल्या विषयासंबंधीची मते निरपेक्षपणे, निःपक्षपातीपणे आणि निर्भयपणे मांडत असतो. तो शक्य तोवर राजकारणात शिरत नाही. अमर्त्य सेन यांचे उलटे आहे. ते अर्थशास्त्रावर तर बोलतीलच, पण सरकारवरदेखील ते बोलतील आणि बोचरी टीका करतील. दिल्लीला एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला ते नुकतेच आले होते. तेव्हा ते म्हणाले,”वेगाने विकसित होणारी भारतीय अर्थव्यवस्था असली तरी चुकीच्या दिशेने तिने हनुमानउडी घेतलेली आहे. २०१४ पासून तिची उलट्या दिशेने प्रगती चालू आहे. दक्षिण आशियातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात वाईट अर्थव्यवस्था असे तिचे वर्णन करावे लागते.” अमर्त्य सेन यांनी २०१४ साल का निवडले? कारण २०१४ साली नरेंद्र मोदी यांचे सरकार अधिकारावर आले. २०१३ साली अमर्त्य सेन भारतात आले असताना त्यांनी जाहीरपणे म्हटले, “मोदी भारताचे पंतप्रधान होता कामा नये.” नोबेल पारितोषिकधारकाची ही प्रेषितवाणी भारतातील मतदारांनी ऐकली नाही आणि त्यांनी मोदी यांना निवडून दिले. भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत दिले. यामुळे अमर्त्य सेन यांचा ‘इगो’ दुखावला गेला. त्यानंतर त्यांनी जेथे जेथे संधी मिळेल, तेथ तेथे मोदींवर टीका करायला सुरुवात केली. दोन वर्षांपूर्वी मोदी यांनी नोटाबंदीचा आदेश काढला. सुरुवातीला त्याचे चिमटे सामान्य माणसालादेखील भरपूर बसले. व्यापारावर त्याचा परिणाम झाला. शेतकरीदेखील त्यामुळे अडचणीत आला, परंतु हळूहळू परिस्थिती सुधारत गेली आणि आता दोन वर्षांनंतर नोटाबंदीचा विषय लोक विसरले. या नोटाबंदीच्या निर्णयावरदेखील अमर्त्य सेन यांनी सडकून टीका केली होती. त्यांचा म्हणण्याचा मथितार्थ असा होता की, या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेला जबरदस्त फटका बसेल. हा हुकूमशाहीचा निर्णय आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्व बँकांत प्रचंड पैसा गोळा झाला. तो आयकराच्या नजरेत आला आणि या पैशाचा उपयोग पायाभूत सोयीच्या विकासासाठी झाला. हे त्याचे फायदे नाकारता येत नाहीत.

 

अमर्त्य सेन म्हणतात की, “वेगाने विकसित होणारी भारतीय अर्थव्यवस्था आहे.” वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था देशाला उलट्या दिशेने कशी घेऊन जाते? हे काही लक्षात आले नाही. वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असेल तर ती सरळ दिशेनेच जाईल, तिचा अधोगतीकडे प्रवास कसा होईल? अमर्त्य सेन यांच्याकडे याबाबतीतला नवीन अर्थव्यवस्थेचा सिद्धांत असेल, तर तो त्यांनी सांगितला पाहिजे. त्यामुळे त्यांचे नाव जॉन मेनयार्ड केन्स, अॅंडम स्मिथ, रिकार्डो, मार्क्स यांच्या पंगतीत जाऊन बसेल. केन्स याने जे आर्थिक सिद्धांत सांगितले त्यामुळे १९३० च्या जागतिक मंदीतून अमेरिका पुढे आली. अॅरडम स्मिथ याच्या ’वेल्थ ऑफ नेशन’मुळे इंग्लंडची प्रचंड भरभराट झाली आणि मार्क्सच्या आर्थिक सिद्धांतामुळे रशियात समाजवादी क्रांती झाली. अमर्त्य सेन यांच्या आर्थिक सिद्धांतामुळे भारतात मनरेगा सुरू झाली. ही योजना व्यक्तीला आळशी, कामचुकार आणि फुकटखाऊ बनविणारी व्यवस्थात्मक रचना झाली. त्याचे फार वाईट परिणाम खेडोपाडी दिसतात. शेतीसाठी मजूर मिळत नाहीत, मिळाले तर टिकत नाहीत आणि टिकले तर काम नीट करीत नाहीत. जे आर्थिक सिद्धांत व्यक्तीला स्वयंसिद्ध करीत नाहीत, त्याच्यातील कौशल्याचा विकास करीत नाहीत, आणि त्याला उत्पादनक्षम करीत नाहीत, ते फेकून देण्याच्या लायकीचे समजले पाहिजेत.

 

अमर्त्य सेन, अर्थशास्त्र हा विषय सोडून जेव्हा राजकारणावर घसरतात आणि शासनावर टीका करू लागतात, तेव्हा उलटा चाबूक आपल्यावरही बसणार आहे, यासाठी त्यांनी तयार राहणे आवश्यक आहे. राजकीय नेत्याला बोचरी टीका सहन होत नाही. तो त्याला आपल्या शैलीत उत्तर देतो. नरेंद्र मोदी यांनी अमर्त्य सेन यांना असा टोला हाणलेला आहे. ते म्हणतात,”एक तरफ वो है, जो हॉर्वर्ड की बाते करते है और एक तरफ एक गरीब का बेटा हार्डवर्कसे देश की इकॉनॉमी बदलने में लगा है।” (हॉर्वर्ड म्हणजे हॉर्वर्ड विद्यापीठ आणि हार्डवर्क म्हणजे अपार कष्ट) अमर्त्य सेन यांनी दहा वर्षे अधिकारावर असलेल्या मनमोहन सरकारवर कधी फारशी टीका केली नाही. आज ते समाजातील दुर्बल घटक, मागासवर्गीय, दलित यांच्याविषयी बोलताना म्हणतात की, “मोदी सरकार या सामाजिक घटकांच्या बाबतीत अपयशी झालेले आहेत.” हे घटक मनमोहन सरकारच्या शासनातही होतेच. दहा वर्षांत या सरकारने त्यांच्या बाबतीत काय केले?, असा प्रश्न अमर्त्य सेन यांनी कधी केला नाही. एकापाठोपाठ एक भ्रष्टाचाराची प्रकरणे मनमोहन सरकारच्या काळात बाहेर येत गेली. भ्रष्टाचार, अर्थव्यवस्थेला लागलेली वाळवी असते, ही गोष्ट तालुक्याच्या ठिकाणी अर्थशास्त्र शिकविणाऱ्या लेक्चररलादेखील माहीत असते. अमर्त्य सेन तर अर्थशास्त्राचे पंडित आहेत. मग ते कधीच भ्रष्टाचारावर काही का बोलले नाहीत? भ्रष्टाचार त्यांना मान्य होता, असा अर्थ घ्यायचा का?

 

मुंबईतील एका प्रसिद्ध दैनिकाने वर दिलेली दिल्लीची बातमी देतानाच अमर्त्य सेन आणखी काय म्हणाले, हे दिले आहे. ती बातमी अशी आहे,”अलीकडे हिंदू समाजाला आपला ऐतिहासिक वारसा असलेल्या ताजमहालबद्दल लाज वाटू लागली आहे. या वास्तूत त्यांना फक्त मुस्लीम संस्कृतीच दिसते, पण ताजमहाल आपल्याला कशाचे स्मरण करून देतो? स्त्रीच्या स्मरणार्थ बांधलेली ही वास्तू आहे, जिच्या मुलाने-दारा शुखाँने संस्कृतमधील पन्नास उपनिषदांचा फारसी भाषेत अनुवाद केला. याच भाषांतरित उपनिषदांचा आधार घेत भारतात आलेल्या विदेशी लोकांनी हा देश समजून घेतला. भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृतीचे ताजमहल हे प्रतीक आहे, हे आपण का विसरत आहोत.” अमर्त्य सेन यांचे वक्तव्य ऐकून हसावे की रडावे हे समजेना. ज्या स्त्रीचा मुलगा दारा शुखाँ आहे, त्या स्त्रीच्या दुसऱ्या मुलाचे नाव औरंगजेब आहे. या औरंगजेबाने दारा शुखाँला पकडून त्याचे अवयव कापून अत्यंत अमानुषपणे ठार केले. ते वर्णन आपण वाचूदेखील शकत नाही. याच औरंगजेबाने काशीचे विश्वनाथाचे मंदिर फोडून त्याजागी मशीद बांधली आणि याच औरंगजेबाने आपल्या बापाला मरेपर्यंत कैदेत ठेवले. एका मुलाने उपनिषदाचे भाषण केले आणि दुसऱ्याने त्यांची होळी केली. म्हणून ताजमहाल पाहिल्यानंतर कशाची आठवण करायची? हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. विदेशी लोकांना दारा शुखाँमुळे आणि त्याच्या उपनिषदाच्या भाषांतरामुळे भारत समजला, हा मोठा विनोद आहे. स्वामी तथागतानंद (अमेरिका) यांचे पुस्तक ‘जर्नी ऑफ उपनिषदाज् टू द वेस्ट’ हे सहाशे पानांचे पुस्तक आहे. ज्यात ग्रीकांपासून ते अमेरिकन लोकांपर्यंत कुणी कुणी उपनिषदांचा अभ्यास केला आहे, याची माहिती आहे. एका इंग्रजी वाक्याचे भाषांतर असे आहे, “जर तुमचे अनुमान चूक असतील तर तुमचे सिद्धांत तपासून बघा.” अमर्त्य सेन यांना हे कोणीतरी सांगण्याची गरज आहे.

@@AUTHORINFO_V1@@