सेवा के पथ पर ‘अविरत’ चलता जाये

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jul-2018   
Total Views |



करूणा हे मानवी मुल्यामधील सर्वात अवघड आणि तितकेच महत्वाचे मुल्य. करूणा ही केवळ माणसां बद्दल अभिव्यक्त होणारी संवेदना, भावना आहे का? अविरत सेवा प्रतिष्ठान करूणा हे मानवी मुल्य माणसासोबतच सृष्टीतील प्रत्येक जीवासोबत जोडते. दुर्बल, दिव्यांग आणि विशेष मग तो माणूस असो की पशूपक्षी यासाठी अविरत सेवा प्रतिष्ठान काम करते.

 

वेडा... वेडा म्हणून त्याला सगळे चिडवू लागले. ते ज्याला ‘वेडा’ म्हणत होते, तो तर गोड हसत होता. त्याला बिलकूल राग आला नव्हता. मात्र, त्याचा हात पकडून चाललेली त्याची आई, तिच्या डोळ्यात मात्र पाणी होते. तो मुलगा ‘विशेष’ होता. त्याच्या हालचाली, त्याची समज इतरांपेक्षा थोडी वेगळी होती. काहीही असो, ‘त्या’ मुलाबद्दल मला मनापासून खूप काही वाटले. त्याला चिडवणाऱ्या मुलांचा रागही आला. घरी आल्यावर आईला सांगितले. माझी आई पॅथोलॉजिस्ट आहे. ती म्हणाली, “तो वेडा नाही रे. तुमच्यापेक्षा थोडासा ‘वेगळा’ आहे. पण, म्हणून त्याला चिडवणे म्हणजे खूप वाईट.” माझ्या लहानपणीची घटना, पण मला आजही ती कालच झाल्यासारखी वाटते. त्यानंतर माझ्यात खूप बदल होत गेला. समाजातल्या दुर्बळ आणि विशेष घटकांना त्रास देण्यात कसला आसुरी आनंद मिळत असेल? ते ही आपल्यासारखेच आहेत, त्यांना सक्षम होण्यासाठी त्यांच्याशी मैत्री करायला हवी असे वाटू लागले. त्यामुळे पुढे शिक्षण पूर्ण केल्यांनतर ‘अविरत सेवा प्रतिष्ठान’ संस्था स्थापन केली,“ असे अविरत सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक सुमित देशपांडे सांगत होते.

 

अविरत म्हणजे सदैव, नेहमी चालणारे, कुणी थांबले म्हणून थांबणार नाही असे कार्य... त्यामुळे संस्थेचे नाव ‘अविरत सेवा प्रतिष्ठान.’ ‘अविरत’मध्ये कार्यरत असलेले सदस्यही असेच संवेदनशील आणि मळलेल्या पायवाटेवरून न जाता स्वत:चे पथ निर्माण करण्याची जिद्द असलेले तरूण. ओंकार जांभेकर हा संगीतकार, तर अनिकेत दामले हाही संगीतकार. सुचित्रा देशपांडे, निळकंठ देशपांडे आणि मनस्वी मुझुमदार यांचे ‘अविरत सेवा प्रतिष्ठान’ला सातत्याने सहकार्य असते, तर ‘अविरत सेवा प्रतिष्ठान’चे ‘अविरत मार्गदर्शक’ आहेत शैलेश साळवी, मानसी आमडेर, मयुरेश शेर्लेकर, सुयोग भुवड आणि अदिती आधारकर. हे सारे नुसतेच मार्गदर्शकच नाहीत, तर ‘अविरत सेवा प्रतिष्ठान’च्या कार्याला पूरक असे कार्यही सर्व मंडळी करत असतात. ‘अविरत सेवा प्रतिष्ठान’चे अप्रुप वाटले. कारण, या प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, मार्गदर्शक समाजातल्या सर्वच स्तरावर अगदी सुस्थिर. आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्तरावरही हे सर्व उच्च पातळीवर असताना या सर्वांना समाजातील दुर्बल आणि विशेष घटकांसाठी काम करण्याची तरीही नि:स्वार्थी इच्छा. केलेल्या कामाची कुठेही जाहिरात नाही, शोबाजी नाही. सुमित देशपांडे, ओंकार जांभेकर आणि अनिकेत दामले या प्रत्येकाकडे स्वत:चे विशेष कलागुण आहेत. त्या कलागुणांना सामाजिक भान आहे. त्यामुळे हे तीन तरूण समाजामध्ये एकजुटीने सेवाकार्य करत आहेत. त्यांच्या कार्याचे स्वरूप काय? उपक्रम कोणते? याबाबत सुमित यांच्याशी चर्चा केली.

 

‘अविरत सेवा प्रतिष्ठान’चे कार्य दुर्बलांच्या जगण्यासाठी आणि सक्षमतेसाठी आहे. इथे पुन्हा ‘दुर्बल’ म्हणजे भौतिकदृष्ट्या दुर्बल नव्हे, तर जे शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या दुर्बल आहेत, दिव्यांग आहेत ते. या दुर्बलांच्या व्याप्तीत केवळ मानवच अभिप्रेत नाही, तर पशू पक्षी, वृक्षवल्लीही आहेत. लव्हबर्ड्स, रस्त्याच्या कडेला दीनवाणे पडलेले मांजराचे पिल्लू, आजारी किंवा अपघाताने बापूडवाणे झालेले कुत्रे, गैरसमजुतीने अंधश्रद्धेने मारले जाणारे साप, वटवाघुळे यांच्यासाठी तर ‘अविरत सेवा प्रतिष्ठान’ म्हणजे घरचे आप्तेष्टच! कारण, या मुक्या प्राण्यांच्या वेदना समजून घेऊन त्यांचा जीव वाचवण्यासाठी ‘अविरत’च्या सदस्यांनी जणू विडाच उचलला आहे. पशू-पक्षी वाचविण्याची तळमळ कशी निर्माण झाली, याबद्दल बोलताना सुमित म्हणाले की, ”पुन्हा लहाणपणीची आठवण. आई चहा बनवत होती. स्वयंपाक खोलीच्या खिडकीसमोर कावळ्यांची असह्य कावऽकावऽ सुरू झाली. तसे आई स्वयंपाक करत असताना कावळे दररोजच खिडकीत यायचे. पण, आजचे त्यांचे येणे आणि कावकाव करणे खूप वेगळे होते. कुणाला तरी टोचून मारायचे या आवेशातले. आईने मला हाक मारली. कावळ्यांना आज झाले तरी काय? पाहा म्हणाली. बाहेर गेलो तर पाहिले की, खिडकीला लागून असलेल्या ड्रेनेज पाईपच्या वळचणीला एक छोटे लव्हबर्ड्सचे पिल्लू भयभीत होऊन पडले होते आणि त्याच्याभोवती कर्कश आवाज करत जमलेले कावळे. त्यांना कसेबसे हुसकले. त्या पिल्लाला उचलले. घरी आणले. चार-पाच दिवसात पिल्लू चांगलेही झाले. पशूपक्ष्यांबद्दल माझे प्रेम हे कदाचित अनुवांशिकच म्हणायला हवे. माझे आजोबा आणि वडील दोघांचेही प्राणिमात्रांवर अतिप्रेम. आमच्या घरी पंचवीस मांजरे, सात कुत्रे, अनेक पक्षी आणि कासव होती.

 

अर्थात, भूतदया ही देणगी सगळ्यांनाच देवाने दिली आहे असे नाही. आजही समाजात विशेष मुलांना हीणवणे, दिव्यांगांना सहकार्य न करणे या गोष्टी डोळ्यात भरतात. अनेकवेळा तर मुले दिव्यांग किंवा विशेष असतील, तर त्यांचे पालकच त्यांना वाऱ्यावर सोडतात. अर्थात, सन्माननीय अपवाद आहेतच. विशेष मुलांची लाज वाटते, म्हणून त्यांना घरात कोंडून ठेवणे किंवा हे आपले हे मुल नाहीच असे भासवणे. याही गोष्टी आपल्याच समाजात घडताना दिसून येतात. पशू-पक्ष्यांविषयी मुकी बिचारी कुणीही हाका असे वर्तन माणूस करताना दिसतो. पण, हेच वर्तन विशेष मुलांबाबतही होताना दिसते. त्यावेळी प्रश्न पडतो की, यांच्या विशेषत्वामध्ये यांची काय चूक? त्यांनाही भावना, संवेदना असतातच, उलट त्या खूप निखळ असतात. नि:स्वार्थी असतात. विशेष बालकांसाठी शाळा असतात. या शाळांमध्ये ठरवून दिलेला अभ्यासक्रम असतो. अर्थात, तो त्यांच्या सोईचाच असतो. पण, ‘अविरत सेवा प्रतिष्ठान’ने विशेष मुलांच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीसाठी आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी विशेष पाऊल उचलले. आपण नेहमी पाहतो की, विशेष मुलांची बोलण्याची शैली थोडी वेगळी असते. काही काही मुलं तर बोलतच नाहीत. याचा अर्थ ते बोलू शकत नाहीत किंवा त्यांना आवाज नाही असे नाही. त्यांना शब्द, नाद, स्वर यांची ओळख होणे गरजेचे असते. यासाठी ‘अविरत’ने या मुलांसाठी विनामूल्य स्पिच थेरेपीचे प्रशिक्षण सुरू केले. परिसरातील विशेष मुलांच्या शाळांमध्ये जाऊन तिथल्या मुलांना शब्द-नाद-सुरांची ओळख करून देणे, त्यांचा दबलेला आवाज खुला करणे, त्यांना शब्द सुस्पष्ट उच्चारण्याची सवय लावणे, यासाठी ‘अविरत’ संस्था कार्य करते. मुलांना बोलण्याच्या सरावासोबतच संगिताच्या माध्यमातूनही विकसित होता यावे, यासाठी ‘अविरत’चे सुमित, ओंकार आणि अनिकेत हे त्रिकुट विशेष मुलांसाठी एक संगीत अभ्यासक्रमही तयार करत आहे. काय असेल हा अभ्यासक्रम?

 

याची माहिती देताना सुमित म्हणाले, ‘आपण संगीतसाधनेची सुरवात सा रे ग म प ध नी सा याने करतो. प्रत्येकाचा स्वर वेगळा. त्यातला आनंद वेगळा. पण, आम्ही तयार करत असलेल्या अभ्यासक्रमात या पारंपरिक संगीत साधना आणि ज्ञानाचा उपयोग विशेष मुलांच्या ग्रहणशक्तीनुसार करणार आहोत. सा रे ग म प ध नी सा याचा ‘स्वरसाज’ हा ‘सा’ या एकाच शब्दावर उच्चारला तर कसे वाटेल? ते वाटणेही या मुलांनी अनुभवावे. संगीत साधनेतून स्वर यंत्रणा, श्वासनि:श्वास प्रक्रिया त्यातून मनाची आणि शरीराची चैतन्य निर्मिती याविषयी कृतिशील असा हा अभ्यासक्रम आहे.“ सुमित बोलत होते. त्यांच्या डोळ्यात अनेक स्वप्ने उभी राहिली होती. सुमित सोबत अशीच स्वप्ने पाहणारे आणि ती पूर्ण करणारे मित्र, सोबती असल्यामुळे ‘अविरत सेवा प्रतिष्ठान’ची स्वप्ने पूर्ण होणार यात शंकाच नाही.

 

याच बरोबर ‘अविरत सेवा प्रतिष्ठान’दिव्यांग, विशेष मुलेसुद्धा इतर मुलांसोबत आत्मविश्वासाने कसे वावरतील? यावरही कार्यशाळा घेते. हेतू हा की, दिव्यांग किंवा विशेष मुलांना समाजामध्ये मिसळताना मुख्य प्रवाहात सामील होताना सुलभ होईल. असो, सध्या पावसा-पाण्याच्या दिवसात साप दिसणे, साप घरात घुसणे या गोष्टी घडताना दिसतात. साप दिसला की, त्याला मारायलाच हवे, नाहीतर तो डूक धरतो. या अंधश्रद्धेने सापाला हमखास मारलेही जाते. ‘अविरत’ सध्या या अंधश्रद्धेवर काम करत आहे. जगातला कोणताही प्राणी स्वत:हून कुणावर सहसा आक्रमण करत नाही. जेव्हा त्याला त्याच्या जीवाची भीती असते किंवा जगण्यासाठीची गरज असते, तेव्हाच तो दुसऱ्या प्राण्यावर आक्रमण करतो. सापही त्याला अपवाद नाही. पावसाच्या दिवसात सापांचे हकनाक होणारे खून थांबवावेत, म्हणून ‘अविरत’ संस्था ठाण्याचे सर्पमित्र अनिल कुबल यांच्यासोबत वस्तीपातळीवर ‘सर्प समज-गैरसमज’ याविषयावर कार्यशाळा घेते.

 

‘अविरत’ ही तरूणाईची आणि त्यातही संवेदनशील तरूणाईची संस्था आहे, जीची रूजवात आता कुठे झाली आहे, येणाऱ्या कालावधीत अविरतला विशेष आणि दिव्यांगांच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम राबवायचे आहेत. समाजामध्ये हक्काची भाषा करत अनागोंदी माजवणारे तरूण आपण पाहतो, पण आपले स्वत:चे ‘ऑल इज वेल’असताना दुर्बलांच्या संवेदना समजून त्यावर चिंतन करून मार्ग शोधू पाहणारे ‘अविरत सेवा प्रतिष्ठान’चे तरूण पाहून वाटते, ‘भारत खरेच तरूणांचा देश आहे, तेही समाजशील तरूणांचा.’

@@AUTHORINFO_V1@@