अ.भा.म.सा.संमेलनातून निवडणूक हद्दपार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2018
Total Views |


नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून अ.भा.म.सा.संमेलनाच्या अध्यक्ष पदासाठी यापुढे कसल्याही प्रकारची निवडणूक घेण्यात येणार नसल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे. महामंडळाच्या सर्व घटक संस्थांची आज नागपूर येथे झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आगामी ९२ व्या मराठी साहित्य संमेलनासाठी विदर्भाची निवड करण्यात आली असून वर्धा किंवा यवतमाळ यापैकी एका ठिकाणी यंदाचे संमेलन भरवण्यात येणार आहे.


आगामी होणाऱ्या ९२ व्या अ.भा.म.सा.संमेलनाच्या तयारीसाठी महामंडळाच्या सर्व घटक संस्थांची नागपूर येथे बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी यंदाचे संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी हे देखील याठिकाणी उपस्थित होते. याबैठकीमध्ये महामंडळाच्या घटनादुरुस्ती करून संमेलनाध्यक्षांची निवडणूक रद्द करण्याविषयी चर्चा करण्यात आली. तसेच साहित्य संमेलनासाठी जागा निश्चित करण्यावर चर्चा झाली. यामध्ये सर्व घटक संस्थांनी निवडणूक रद्द करण्याला एकमताने पाठींबा देत यापुढे संमेलनाध्यक्षांची निवडणूक हद्दपार करण्याला आपला पाठींबा दिला. तसेच संमेलनासाठी विदर्भाची निवड करत, यवतमाळ आणि वर्धा ही दोन नावे सुचवण्यात आली. लवकरच यावर देखील एकमत होऊन जागेचे देखील अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@