वन महोत्सव २०१८

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2018   
Total Views |




भारतीय उपखंडात या महिन्यात पाऊस चांगलाच स्थिरावलेला असतो. जमिनीत पाणी मुरून माती भुसभुशीत झालेली असते. सरकारकडून वृक्षलागवडीचे कार्यक्रम हाती घेतले जावेत, त्यामध्ये लोकांचा सहभाग वाढावा आणि एकंदरच वृक्षलागवडीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, या हेतूने जुलैच्या पहिल्या आठवड्यात हा वनमहोत्सव साजरा होतो.

 

चालू आठवडा (रविवार दि. १ जुलै ते शनिवार दि. ७ जुलै) हा भारतात वनमहोत्सवाचा आठवडा आहे. 'वनमहोत्सव’ ही कल्पना भारतात सर्वप्रथम १९५० साली तत्कालीन कृषी मंत्री डॉ. के. एम. मुन्शी यांनी आणली. जुलै महिना हा वृक्षलागवडीसाठी सर्वोत्तम महिना आहे. भारताच्या विविध राज्यांमध्ये राज्य सरकारे आणि स्थानिक लोक यांच्या सहभागातून वनमहोत्सव सप्ताहात झाडाच्या रोपांची लागवड केली जाते. भारत सरकारचे वन खाते असे सांगते की, प्रत्येक तोडलेल्या झाडामागे दहा झाडे लावली गेली पाहिजेत. भारत सरकारने ठरवलेल्या नियमावलीप्रमाणे, देशात किमान ३३ टक्के क्षेत्र वनाच्छादित असले पाहिजे. परंतु २०१६ च्या आकडेवारीनुसार भारतातले वनाच्छादित क्षेत्र हे २३ .८१ टक्के आहे. म्हणजेच ते अजून दहा टक्के वाढणे जरूरीचे आहे. हे वनाच्छादित क्षेत्र २०२० पर्यंत ३३ टक्क्यांपर्यंत नेण्याचे ध्येय भारत सरकारने ठेवले आहे. ही वृक्षलागवड स्थानिक आणि पर्यावरणीय गरजा लक्षात घेऊन केली जाणार आहे. पर्यावरणाचे रक्षण, जमीन संधारण, भूजल संधारण, लाकूडफाटा, इंधननिर्मिती अशी बहुउद्देशीय वृक्षलागवड केली जाणार आहे.

 

आसाममध्ये ‘मानस माओ झिंगेद्री इको टुरिझम सोसायटी’ नावाची पर्यावरण संस्था कार्यरत आहे. या संस्थेमार्फत वनमहोत्सवांतर्गत दि. २५ जूनपासून आत्तापर्यंत १ लाख रोपांचे वाटप शाळा-महाविद्यालये आणि लोकांना करण्यात आले आहे. यंदाच्या वनमहोत्सवांतर्गत महाराष्ट्र सरकारने दि. १ जुलै ते ३१ जुलै यादरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात १३ कोटी वृक्षलागवडीचे ध्येय ठेवले आहे. महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याची घोषणा केली. वृक्षलागवडीसाठी महाराष्ट्रातली ४ हजार ८८ ठिकाणे निश्‍चित केली आहेत. वनखाते, शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक लोकांच्या सहभागातून महाराष्ट्रात वृक्षलागवड होणार आहे. महाराष्ट्र सरकारने एकूण ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यापैकी २०१७ सालामध्ये ४ कोटी वृक्षलागवड करण्यात आली, तर या वर्षी १३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. ‘एकच लक्ष्य तेरा कोटी वृक्ष‘ ही घोषणा करत महाराष्ट्र सरकारने या मोहिमेला सुरुवात केली आहे. या वनमहोत्सवात प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून, आपलाही सहभाग नोंदवावा. झाड नुसते लावून सोडून देऊ नये, तर ते मेहनत करून जगवावे. लोकांच्या सकारात्मक प्रतिसादातूनच एकेकाळचा हिरवाईने नटलेला भारत पुन्हा उभा राहील!

@@AUTHORINFO_V1@@