प्रणवदांच्या भाषणाचा मथितार्थ...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jun-2018   
Total Views |


 

 

पहिले तर लोकांना, त्यांनी संघाच्या कार्यक्रमात आलेलेच नको होते. पण, स्वत:च्या निर्णयावर ठाम राहात त्यांनी या कार्यक्रमातील उपस्थितीसाठी होकार दिला तर यांना लागलीच पोटशूळ उठला. त्यांनी त्यांच्या निर्णयाबाबत फेरविचार करावा म्हणून यांचा थयथयाट सुरू झाला. काहींनी, त्यांना परावृत्त करण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न करून पाहिले, तर काहींनी धर्मनिरपेक्षतेच्या पिपाण्या वाजवून धिंगाणा घालत वातावरण नासवण्याचा उपद्‌व्याप केला. पण, आयुष्यभर कॉंग्रेस पक्षाची विचारधारा जगलेले डॉ. प्रणव मुखर्जी कशालाच बधले नाहीत. ठरल्याप्रमाणे ते संघाच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले. भरपूर वेळ त्यांनी संघ स्वयंसेवकांच्या समवेत घालवला. सायंकाळी मुख्य कार्यक्रमात उपस्थित राहिले. तेथे मुद्देसूद, अभ्यासपूर्ण भाषणही केले. तर पुन्हा एकदा लोकांची पोटं दुखू लागली.

काहींचे गरळ ओकणे नव्याने सुरू झाले. त्यांना अपेक्षित असलेले वाद उभा करण्यासाठीचे आवश्यक मुद्दे डॉ. मुखर्जींच्या भाषणातून न गवसल्याने वाट्याला आलेल्या निराशेचाही तो परिणाम असावा कदाचित! प्रणवदांच्या तोंडून संघाची स्तुती करणारा किंवा निंदा करणारा एखादाही शब्द, चुकूनही बाहेर पडण्याचीच देर... की कहर माजवायचा, अशा इराद्याने स्वत:ची अक्कल पाजळण्यास सिद्ध झालेल्या दीडशहाण्यांच्या पदरी पुन्हा एकदा हिरमुसलेपण आले. आता करावे तरी काय त्यांनी? संधी हुकली की त्यांची! देशभरात नवा वितंडवाद निर्माण करण्याची... संघावर तोंडसुख घेण्याची... हा शब्द असंसदीय ठरेल कदाचित, पण याला हरामखोरीच म्हटली पाहिजे.

किती खालच्या स्तराला जायचं या लोकांनी संघाला विरोध करताना? या कार्यक्रमात प्रार्थना सुरू असताना प्रत्येक स्वयंसेवक प्रणामच्या स्थितीत उभा होता. काही लोक मात्र नुसतेच उभे होते. डॉ. प्रणव मुखर्जीही त्यापैकीच एक. तिथे उपस्थित असलेल्यांपैकी कुणालाच त्यात आक्षेपार्ह वा आश्‍चर्यजनक असे काहीच जाणवले नाही. प्रणवदांनी इतरांसमवेत संघाची प्रार्थना म्हणावी, अशी तर अपेक्षाही कुणी बाळगली नव्हती. अशा कार्यक्रमात अतिथिपद स्वीकारणारे कित्येक लोक संघवर्तुळाबाहेरचे असतात. ते ना प्रणाम करत, ना प्रार्थना म्हणत.
 
कार्यक्रम संघाचा असला, तरी प्रणव मुखर्जीही त्यांना पटेल असेच वागले. मग प्रणव मुखर्जींचा, संघाच्या पद्धतीप्रमाणे प्रणाम करतानाचा फोटो व्हायरल झाला कुठून? कसा? असल्या दर्जाहीन बदमाशा करणार्‍यांना नेमके साधायचे काय आहे? असे करताना प्रणव मुखर्जींच्या डोक्यावर संघाची काळी टोपी घालायलाही या नतद्रष्ट्रांनी कमी केले नाही...! हेतू एकच- कसेही करून, काहीही करून वाद निर्माण करणे. संघविरोधाची मशाल विझायला आली, तरी ती तेवत ठेवण्याची निलाजरी धडपड करणार्‍यांकडून आणखी वेगळे अपेक्षित तरी काय असणार आहे म्हणा! त्याचेच परिणाम या तर्‍हेने दृश्य स्वरूपात दिसू लागले आहेत.

इकडे प्रणवदांचे भाषण संपत नाही, तोच तिकडे कॉंग्रेसच्या मुख्यालयात धुसफूस सुरू झाली. साहेबांनी संघाला कसे धडे दिले इथपासून तर नागपुरात जाऊन, संघाच्या मंचावरून त्यांनी स्वयंसेवकांच्या नाकावर टिच्चून त्यांना कसा आरसा दाखवला, इथपर्यंत अकलेचे तारे तोडले गेले. संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोप समारंभाच्या निमित्ताने जे जे म्हणून लोक परवा रेशीमबागेतील मैदानावर उपस्थित होते, त्यांना ना प्रणवदांच्या डोक्यावर काळी टोपी दिसली, ना त्यांनी भगव्या ध्वजाला प्रणाम केल्याचे कुणी पाहिले. पण, मागील किमान अर्धशतकाच्या काळात, कॉंग्रेसचे राजकारण करताना ज्यांना दुरून केवळ शिवीगाळच केली, त्या संघाचे कार्य जवळून बघितल्यानंतर, प्रत्यक्षात अनुभवल्यानंतर, स्वयंसेवकांच्या आचरणातून जाणवणार्‍या शिस्तबद्ध संघाची अनुभूती घेतल्यानंतरचे समाधान मात्र त्यांच्या चेहर्‍यावरून झळकत होते.

हे खरे आहे की, त्यांच्या भाषणातून मसालेदार, चटपटीत, खमंग बातम्या तयार करण्याच्या इराद्याने तेथे पोहोचलेल्यांच्या हाती काहीच लागले नाही. कित्येकांची घोर निराशा त्यामुळे झाली. पण, ज्यांनी मंचावर उपस्थित दोन्ही डॉक्टरांचीभाषणं मन लावून ऐकली, त्यांना मोहनजी आणि प्रणवदांच्या विचारांच्या दिशेत कुठेही भेद जाणवला नाही. एका समृद्ध, वैभवसंपन्न राष्ट्राची कल्पना सरसंघचालकांनी मांडली, त्यासाठी आवश्यक असलेल्या समर्पित संघटनेची निकड त्यांनी प्रतिपादित केली, मार्ग भिन्न असले तरी चालेल, विचारधारा विभिन्न असल्या तरी चालतील, पण ध्येय मात्र भारताला सर्वोच्च स्थानी विराजमान करण्याचेच असावे, विविध आर्थिक स्तरातील, भाषा, प्रांत, जाती, पंथ, धर्माशी निगडित स्वयंसेवकांच्या सहभागातून साकारलेल्या संघाच्या शिबिरातून भारतगवसतो, हे सांगताना, त्यांना उसने अवसान आणावे लागले नाही, कारण तेच वास्तव आहे...

भूतपूर्व राष्ट्रपतींनी तर त्यांच्या भाषणाची सुरुवातच राष्ट्र, राष्ट्रीयता आणि देशभक्तीचे महत्त्व प्रतिपादित करत केली. हा देश, त्याची प्राचीन परंपरा, त्यावर वारंवार झालेली आक्रमणं, त्यातून सावरलेला इथला समाज, देश एकसंध राखण्यासाठी आवश्यक असलेला, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीयत्वाच्या भावनेने ओतप्रोत भरलेला, भारावलेला समूह... हेच त्यांच्या भाषणाचे पैलू होते. वसुधैव कुटुंबकम्च्या संकल्पनेची महती प्रणवदांनी त्यांच्या भाषणातून मांडली, तर ही वसुंधरा हाच आमचा परिवार असल्याची संकल्पना त्यांच्या भाषणापूर्वी गायिल्या गेलेल्या गीतातून मांडली गेली होती. मग, प्रणवदांनी संघाच्या मंचावरून अपेक्षिलेल्या बाबी आणि डॉ. मोहनजी भागवत यांनी संघ प्रत्यक्षात जगत असलेल्या वास्तवाची केलेली मांडणी, यात भेद आहे कुठे?

खरंतर अतिशय संयत, सर्वसमावेशक, केवळ संघ स्वयंसेवकांनाच नव्हे, तर संपूर्ण देशाला उद्देशून केलेले, राष्ट्रपती पदावर कधीकाळी विराजमान राहिलेल्या व्यक्तीला शोभेल असे प्रगल्भतापूर्ण भाषण डॉ. प्रणव मुखर्जी यांनी परवा नागपुरात केले. केवळ वादळ निर्माण करण्याच्या उद्देशाने ते ऐकण्यासाठी म्हणून ज्यांनी रेशीमबागेची वाट धरली, त्यांचा पुरता भ्रमनिरास झाला हे खरेच; पण ज्यांनी एक अतिथी म्हणून डॉ. मुखर्जींचे भाषण ऐकले, त्यांना तर त्यातून खूप काही मिळाले. भाषणच कशाला, गीत, अमृतवचन यातही बरेच काही होते घेण्यासारखे. प्रचलित प्रथा मोडून यंदा प्रमुख अतिथींच्या आधी सरसंघचालकांचे भाषण झाले, अन्यथा एका समृद्ध राष्ट्राच्या निर्मितीसाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता डॉ. मुखर्जी यांनी प्रतिपादित केली त्या सार्‍याच बाबी संघ प्रत्यक्षात जगत असल्याचे सांगण्याचा प्रयत्न म्हणजे सरसंघचालकांच्या भाषणातील मुद्यांची मांडणी होती.

एकूण, आमच्यासाठी कोणीच परके नाही, आम्हाला संपूर्ण समाजाला सोबत घेऊन पुढे जायचे आहे. या संघाच्या भूमिकेला पुष्टी देण्याचा प्रयत्न म्हणजे संघाने डॉ. प्रणव मुखर्जी यांना दिलेले या कार्यक्रमाचे निमंत्रण होते. कुठलेच बंधन नसताना, त्यासाठीचा कुठलाही दबाव नसताना, ते निमंत्रण स्वीकारण्यात जसे संघाचे यश तसेच प्रणवदांच्याही मनाचा मोठेपणा आहे. त्यांच्या या निर्णयावरून देशभरातील कथित सहिष्णूसमूहाने जो उच्छाद मांडला, त्यांचे मात्र पितळ उघडे पडले. त्यांची लायकी, त्यांच्या राजकारणाची हीन पातळी, याचेही या निमित्ताने दर्शन घडले. शत्रू तर सोडाच, पण आमच्यासाठी कोणी परकाही नाही, हे तर संघाने आचरणातून स्पष्ट व सिद्ध केले आहे. संघाच्या नावाने बोटे मोडणार्‍या, नाकं मुरडणार्‍यांना करून दाखवता येईल असा चमत्कार कधी...?

@@AUTHORINFO_V1@@