प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांकडून अचानकपणे संपाची हाक
कर्मचाऱ्यांच्या वेतनासंबंधीच्या प्रलंबित मागण्यांच्या तत्काळ पूर्ततेसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप पुकारला आहे. संपाविषयी कसल्याही प्रकारची अधिकृत माहिती न देता कर्मचाऱ्यांनी परस्पर हा संप पुकारला असून साध्य राज्यभर याचा पडसाद उमटू लागले आहेत. पुणे-मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील बससेवा यामुळे बंद पडली असून यामुळे नागरिकांना मात्र विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना ताबडतोड पुन्हा एकदा कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. कर्मचाऱ्यांना कसल्याही प्रकारची अडचण असल्यास त्यांनी सरकारची थेट चर्चा करावी, परंतु सामान्य नागरिकांना वेठीस धरू नये, असे सरकारने म्हटले आहे. तसेच कर्मचारी कामावर तत्काळ रुजू न झाल्यास संपामध्ये सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील सरकारने दिला आहे.
कसल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारल्यामुळे प्रवाशांचा मात्र चांगलाच खोळंबा झाला आहे. शिवशाही आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांची सेवा सुरु ठेवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी सर्वच गाड्या बंद ठेवण्यात आल्या आहे. गाड्यांविषयी घोषण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी देखील अचानक आपले काम बंद केल्यामुळे या सर्वांपासून सामान्य नागरिक या संपापासून पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे सर्व ठिकाणी दिसत आहे. संपाची माहिती नसल्यामुळे अनेक ठिकाणी प्रवाशी पहाटेपासून स्थानकावर बसून आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या या संपावर सामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या वर्षी दिवाळीमध्ये देखील एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता. ऐन दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले होते. यावेळी राज्य सरकारने चर्चा करून कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या होत्या. परंतु यावर अद्याप कसल्याही प्रकारची ठोस कारवाई न झाल्यामुळेचे हा संप पुकारल्याचे काही कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे. तसेच सरकारने कारवाई जरी केली तरी मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत कामावर न जाण्याचा निर्धार देखील अनेकांनी केला आहे.