वैचारिक अस्पृश्यतेची भिंत तोडली!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jun-2018   
Total Views |

 
 
 
 
भारताचे माजी राष्ट्रपती व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांनी आज, ७ जून रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर स्थित मुख्यालयातील कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी नागपुरात दाखल होत राजकीय आणि वैचारिक अस्पृश्यतेची भिंत तोडली आहे.
 
जे लोक जातिआधारित भेदभाव आणि अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठवितात त्यातीलच काही तथाकथित सेक्युलर आणि विचारवंत माजी कॉंग्रेस नेते माजी राष्ट्रपतींच्या विवेकावर शंका उपस्थित करीत आहेत, ही अतिशय आश्‍चर्याची गोष्ट आहे. माजी राष्ट्रपतींनी रा. स्व. संघाचे निमंत्रण स्वीकारले, केवळ या एकमेव कारणासाठी हा विरोध होत आहे. हा देश विविधतेने नटलेला इंद्रधनुष्यी रंगांच्या वैचारिक भिन्नतेचा देश आहे. जर वैचारिक भिन्नता सामाजिक अस्पृश्यता आणि शत्रुत्वात रूपांतरित होत असेल, तर या देशातच आणखी किती ‘देश’ बनतील याची कल्पना करा. देशसेवा आणि जनतेचा विकास हाच जर सर्वांचा उद्देश असेल, तर मतभेद असूनही राष्ट्रीय व्यासपीठावर विचारांची देवाणघेवाण करण्यात काय हरकत आहे?
 
 
संरक्षण, अर्थ, परराष्ट्र अशी महत्त्वपूर्ण खाती सांभाळल्यानंतर ज्या व्यक्तीने राष्ट्रपतिपदाचा कार्यकाळ अतिशय यशस्वीपणे पूर्ण केला, अशा जबाबदार व परिपक्व व्यक्तीने जर एखाद्या संघटनेचे निमंत्रण स्वीकारले असेल तर कुठलाही विचार न करताच स्वीकारले असेल, असे शक्य तरी आहे काय? आणि राष्ट्रपतिपदाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर आता ते सर्व समाजाचे नाहीत काय? उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी मागे पीएफआय या दहशतवादी संघटनेच्या केरळमधील सभेला उपस्थिती दर्शविली होती, तेव्हा याच तथाकथित पुरोगाम्यांनी त्यांची उपस्थिती न्याय्य व ‘सेक्युलर’ ठरविली होती. आणि जे विचारस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने नेहमीच गळे काढतात तेच लोक आज प्रणवदांच्या, संघाच्या कार्यक्रमाला जाण्याच्या निर्णयावर आक्षेप घेत आहेत, हा सगळ्यात मोठा विरोधाभास आहे.
भारताच्या सार्वजनिक जीवनात हा वैचारिक शत्रुत्वाचा भाव डावे कम्युनिस्ट आणि विदेशी मानसिकतेच्या कॉंग्रेसी नेतृत्वाची देणगी आहे. ही भारतीय परंपरा नाही. ‘पाञ्चजन्य’चा संपादक या नात्याने मी नेहमीच भाकपचे सरचिटणीस सी. राजेश्‍वर राव, ए. बी. बर्धन, डी. राजा तसेच सैयद शहाबुद्दीन, मणिशंकर अय्यर आणि हेमवतीनंदन बहुगुणा यांचे लेख अंकात प्रसिद्ध केले. जे आमच्या विचारधारेविरुद्ध बोलतात, लिहितात त्यांना ‘पाञ्चजन्य’त स्थान का मिळावे, असा प्रश्‍न त्या वेळी कुणी उपस्थित केला नाही. वाचकांना कदाचित आठवत असेल की, जेव्हा डॉ. मनमोहनसिंग यांनी पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला तेव्हा सर्वात आधी मी ‘पाञ्चजन्य’चा संपादक या नात्याने त्यांना भेटलो आणि त्यांच्याशी संवाद साधला. जेव्हा त्यांची मुलाखत ‘पाञ्चजन्य’मध्ये छापून आली तेव्हा सर्वत्र गदारोळ झाला. कॉंग्रेस सरकारच्या पंतप्रधानांनी रा. स्व. संघाच्या साप्ताहिकाला मुलाखत का दिली आणि तीही पदभार स्वीकारल्यानंतर सर्वांच्या आधी, याचेच सर्वांना आश्‍चर्य वाटत होते व पुढचे सात-आठ दिवस केवळ या एकाच विषयावर चर्चा झडत होती. मात्र, डॉ. मनमोहनसिंग यांनी यावर कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
वैचारिक अस्पृश्यतेवर रा. स्व. संघाचा विश्‍वास नाही. १९५० च्या सुमारास पंडित नेहरू हे आपल्या पहिल्या विदेश दौर्‍याअंतर्गत लंडनला गेले तेव्हा तेथील भारतीय वंशाच्या नागरिकांनी त्यांचे पाकिस्तानबाबत धोरण आणि हिंदूंबाबत होणार्‍या भेदभावाविरुद्ध नेहरूंविरुद्ध निदर्शने करण्याचे ठरविले होते. मात्र, त्या वेळी रा. स्व. संघाचे सरसंघचालक श्रीगुरुजींनी त्यांची समजूत काढली आणि म्हणाले की, ‘‘भारताबाहेर देशाच्या पंतप्रधानांचा गौरव हा राष्ट्राचा गौरव आहे. तेव्हा त्यांच्याविरुद्ध एकही शब्द बोलता कामा नये. तुम्हाला जे म्हणायचे आहे ते भारतात येऊन म्हणा.’’
२०१४ मध्ये मी जपान सरकारच्या निमंत्रणावरून टोकियोला गेलो होतो. तेथे बौद्धिक ऍकॅडमिक वर्गात ‘भारताचे आर्थिक धोरण आणि जपानशी संबंध’ या विषयावर माझे व्याख्यान झाले. त्यानंतर प्रश्‍नोत्तराचा कार्यक्रम झाला. यावेळी डॉ. मनमोहनसिंग यांच्या आर्थिक धोरणाविषयी मला काही टोकदार प्रश्‍न विचारण्यात आले. मी टोकियोत भारताच्या राष्ट्रीय आर्थिक धोरणांचे समर्थन केले, मनरेगाची प्रशंसा केली. विदेशी भूमीत स्वदेशावर टीका करणे या असल्या गोष्टी संघ शिकवत नाही. सलमान खुर्शीद परराष्ट्र मंत्री असताना माझे टोकियोतील ते भाषण विदेश मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध होते.
देशाच्या शत्रूंशी शत्रुत्व असलेच पाहिजे. रा. स्व. संघाचे विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणतात, मतभेदांचे रूपांतर मनभेदात होता कामा नये. पंडित नेहरूंच्या कार्यकाळात १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले. रा. स्व. संघाने सैनिक आणि नागरिकांच्या मदतीसाठी जे अभूतपूर्व कार्य केले त्याची प्रशंसा अगदी पंडित नेहरूंनीदेखील केली. एवढेच नव्हे, तर नेहरू सरकारने संघ स्वयंसेवकांना संपूर्ण गणवेषात २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. याउलट अगदी त्याच वेळी चीनला पाठिंबा देण्याचा राष्ट्रविरोधी गुन्हा केल्याबद्दल २५० हून अधिक कम्युनिस्ट नेत्यांना अटक करण्यात आली होती, हे लक्षात घेतले पाहिजे. १९६५ साली लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना दिल्लीची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी त्यांनी संघ स्वयंसेवकांना मदतीसाठी पाचारण केले होते. आज रा. स्व. संघातर्फे संपूर्ण देशात १.७५ लाख सेवाप्रकल्प चालविण्यात येत आहेत. ज्यात रक्तपेढी, नेत्रपेढी, सुपर स्पेशालिटी इस्पितळे, कॅन्सर संशोधन आणि चिकित्सा केंद्रांचा समावेश आहे.
 
 
नागपूरमध्ये देशातील सर्वात मोठ्या हॉस्पिटलपैकी एक नॅशनल कॅन्सर रीसर्च इन्स्टिट्यूट संघ स्वयंसेवकांमुळे उभारले गेले. ७५० हून अधिक खाटा असलेल्या या हॉस्पिटलमध्ये कॅन्सर रुग्णांवर कमीत कमी खर्चात सर्वोत्कृष्ट उपचार उपलब्ध करून दिले जातात. त्याचप्रमाणे औरंगाबाद येथे डॉ. हेडगेवार रुग्णालय अतिशय लोकप्रिय आणि प्रतिष्ठित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलची उभारणीही डॉक्टर स्वयंसेवकांनी केली आहे व याचे संचालनही तेच पाहतात.
रा. स्व. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या वंशजांचे गाव कंदकुर्त्ती (तेलंगणा) येथे आहे. डॉक्टरांचे तेथे वडिलोपार्जित घरही आहे. घर ते नागपूरपर्यंत डॉ. हेडगेवार यांचा प्रवास या विषयावर एक वृत्तपट बनविण्याची संधी मला मिळाली. कंदकुर्त्ती येथील डॉ. हेडगेवार यांच्या या वडिलोपार्जित घराला एका स्मारकाचे स्वरूप देण्यात आले असून आता तेथे केशव शिशुमंदिर चालविण्यात येत आहे. कंदकुर्त्ती येथे ६५ टक्के लोकसंख्या मुस्लिम आणि ३५ टक्के हिंदू आहे. या केशव शिशुमंदिरात हिंदू-मुस्लिम मुले बरोबरच शिकतात. तेलंगणा येथील ख्यातनाम ‘मुंसिफ’ या उर्दू दैनिकाचे पत्रकार जलील बेग यांची सर्व मुले येथेच शिक्षण घेतात. ते सांगतात की, केशव शिशु मंदिरात उत्कृष्ट शिक्षण दिले जाते, येथे संगणकही शिकवितात आणि शाळेची फीदेखील कमी आहे. या आधी श्रीमंतांची मुले पब्लिक स्कूलमध्ये आणि आमची मुले साधारण शाळेत जात होती. संघप्रेरित विज्ञान भारतीचे अध्यक्ष जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर आहेत. इस्रोचे माजी संचालक माधवन नायर, ख्यातनाम वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांच्यासारख्या नामवंत व्यक्ती याच्याशी जुळल्या आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सर्वोच्च शिखरापासून ते सामान्य स्तरापर्यंत संघ स्वयंसेवक नाव कमवीत आहेत. संघाचे केवळ एकच लक्ष्य आहे आणि ते म्हणजे देश सुखी-समर्थ व परमवैभवयुक्त बनावा. मग संघाविषयी हा पराकोटीचा द्वेष, तिडीक आणि शत्रुत्व कशासाठी ?
सामाजिक समरसता, राष्ट्रीय सुरक्षा, धर्मजागरण, जनजातींचा विकास आणि शैक्षणिक क्षेत्रात सर्वाधिक व तेही दर्जेदार प्रकल्प आज संघ स्वयंसेवकांतर्फे चालविण्यात येत आहेत. मात्र, केवळ राजकीय स्वार्थासाठी हिंदूंचे विभाजन करणे, (जसे कर्नाटकात झाले) हिंदुत्वावर श्रद्धा ठेवली म्हणून ठार मारणे, सर्व संस्थांना संघापासून दूर ठेवण्याची सेक्युलर मानसिकता, भारतीय सैनिकांविरुद्ध वक्तव्ये आणि कट्‌टर जिहादींचे समर्थन करणे या गोष्टी संघाला कशा काय मान्य होऊ शकतील?
मी प्रणवदांना गेल्या ३० वर्षांपासून ओळखतो. जेव्हा ते इंदिराजींच्या काळात कॉंग्रेसबाहेर पडले तेव्हा ‘पाञ्चजन्य’साठी त्यांची मुलाखत मी घेतली होती. नंतर ते जेव्हा संरक्षण मंत्री झाले तेव्हा त्यांची व्याख्याने अतिशय अभ्यासपूर्ण आणि समतोल होती. ते शालीन, सर्वस्पर्शी आणि राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्त्व आहेत. रा. स्व. संघाने दिलेले निमंत्रण स्वीकारून त्यांनी एक अनुकरणीय उदाहरण घालून दिले आहे.
...
@@AUTHORINFO_V1@@