हेल्पलाईन फार्मसीचा निर्माता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2018   
Total Views |

 
सुखवस्तू कुटुंबामध्ये वाढलेल्या, घरचा पारंपरिक व्यवसाय पार पाडतानाच, माणुसकीच्या नात्याने सढळ हाताने मदत करणार्‍या दिल्लीतल्या विष्णुकुमार सुरेका यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे.
 
आरोग्याच्या किरकोळ तक्रारी असो, किंवा एखादा गंभीर आजार असो, त्यातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी उपचार करण्याव्यक्तिरिक्त दुसरा कोणताच पर्याय नसतो. आजाराचे निदान झाल्यानंतर आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या लोकांना औषधोपचार करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. मग अशा वेळेस अशा गरजूंना मदत करण्यासाठी समाजातील काही थोर व्यक्ती पुढे सरसावतात. हेल्पलाईन फार्मसीच्या माध्यमातून महागडी औषधे स्वस्त दरामध्ये उपलब्ध करून देण्याचे काम या हेल्पलाईनच्या माध्यमातून केले जात आहे. दिल्लीमध्ये राहणारे विष्णुकुमार सुरेका यांनी ही जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. केवळ पैशाच्या अभावी उपचारांपासून वंचित राहणार्‍यांची संख्या आपल्याकडे जास्त असल्याची जाणीव त्यांना होती. म्हणूनच त्यावर तोडगा काढण्याचा निर्णय विष्णुकुमार यांनी घेतला आणि प्रत्यक्षात तो राबवून दाखवला.
 
विष्णुकुमार हे स्वतः हे उद्योगपती असून, त्यातून मिळणार्‍याचा विनिमय स्वस्त दरात औषधे देण्यासाठी करत आहेत. २००३ पासून सुरू केलेल्या या हेल्पलाईनचे काम आजही जोमाने सुरू आहे. दिल्लीच्या ’ग्रीन पार्क’मधल्या युसुफसराय परिसरात ‘हेल्पलाईन फार्मसी’ आहे. ‘एम्स’ आणि ‘सफदरजंग’ या दोन प्रसिद्ध आणि मोठ्या रूग्णालयांपासून ‘हेल्पलाईन फार्मसी’ अगदी हाकेच्या अंतरावर असल्यामुळे हेल्पलाईन फार्मसीमध्ये रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. कोणतीही गरजू व्यक्ती डॉक्टरांची चिठ्ठी दाखवून, ‘हेल्पलाईन फार्मसी’मधून स्वस्त दरात औषधांची खरेदी करू शकते.
 
विष्णुकुमार सुरेका ‘मौर्य उद्योग लिमिटेड’ कंपनीचे संचालक आहेत. त्यांचा टॉवेल उत्पादनाचा व्यवसाय आहे. तसेच रिअल इस्टेटचा व्यवसायदेखील आहे. दर महिन्याला सुरेका ‘हेल्पलाईन फार्मसी’च्या माध्यमातून सुमारे दोन कोटी रुपयांची औषधं आणि इतर औषधसामुग्री नफा ना तोटा’ तत्त्वावर विकतात. औषध कंपन्यांकडून खरेदी केलेली औषधे गरजू रुग्णांना शक्य तितक्या स्वस्त दरात औषध देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. या हेल्पलाईनसोबतच त्यांनी ’सुरेका पब्लिक ट्रस्ट’ची स्थापना केली आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून गरीब आणि गरजूंना अर्थसहाय्यही केले जाते. तसेच मोफत निवासाची सोयही ट्रस्टकडून केली जात आहे. ‘एम्स’ आणि ‘सफदरजंग’ या दोन रूग्णालयांपासून जवळच दोनशे खोल्या बांधण्यात आल्या आहेत. तसेच संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कँटीनमध्ये स्वस्त दरामध्ये जेवण उपलब्ध करून दिले जाते. या संस्थांना तीनशे स्वयंसेवी संस्था (एनजीओ) आणि सरकारी रुग्णालयांकडून मदत केली जात आहे.
 
विष्णुकुमार सुरेका सांगतात, ”हेल्पलाईन फार्मसी चालवण्याचा सगळा खर्च आम्ही स्वत: करतो. आमच्या इतर व्यवसायांमधून मिळणारा नफा आम्ही यात लावतो. इतर कोणत्याही संस्था, परदेशी नागरिक किंवा सरकारी संस्थांकडून आम्ही आर्थिक मदत घेत नाही. दिल्लीतल्या ’श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स’मधून पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरेका यांनी घरच्या व्यवसायाचीच निवड केली. सुरेका यांच्या घरची पार्श्वभूमी व्यावसायिक स्वरूपाची असल्यामुळे त्यांच्या घरची प्रत्येक व्यक्ती ही व्यवसायाशी निगडित आहे. विष्णुकुमार सुरेका व्यवसायाचा भार सांभाळण्याबरोबरच ‘सुरेका पब्लिक ट्रस्ट’चं कामही पहात आहेत.
 
एकदा सुरेका त्यांच्या वडिलांसोबत औषध घेण्यासाठी मेडिकलमध्ये गेले. त्यांनी बघितलं की प्रत्येक कंपनीच्या औषधाची किंमत वेगवेगळी आहे. अनेक जीवनावश्यक औषधांच्या किंमतींवर दुकानदार खूप जास्त नफा कमावत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्याचवेळी त्यांच्या मनात विचार आला, की जर नफा न कमावता औषधं विकली, तर कित्येक गरजू आणि गरिबांना मदत होईल. आणि याच विचाराचं रूपांतर पुढे ‘हेल्पलाईन फार्मसी’मध्ये झालं. खरंतर ‘सुरेका पब्लिक ट्रस्ट’चं काम १९६५ मध्येच सुरू झालं होतं. तेव्हापासूनच ट्रस्ट गरिबांसाठी काम करत होती, मात्र व्यापक स्वरूपात कामाला सुरुवात झाली ती २००३ मध्ये. आज ‘हेल्पलाईन फार्मसी’ रोज जवळपास १४ लाख रूपयांची औषधं फक्त सात लाख रुपयांना विकत आहे.
 
सुरेका सांगतात की समाजाची मनोभावे सेवा करण्याचं एक मोठं स्वप्न त्यांनी पाहिलं आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते काहीही करू शकतात. देशाच्या कानाकोपर्‍यातून ’एम्स’ रूग्णालयात उपचार घेण्यासाठी अनेक रूग्ण येत असतात. यामध्ये गरीब रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यासाठीच ‘एम्स’च्या आतही ‘हेल्पलाईन फार्मसी’ सुरू करण्याचा विष्णुकुमार सध्या विचार करत आहेत. सुरेका म्हणतात की फक्त दिल्लीच नाही तर देशातल्या प्रत्येक शहरात अशा प्रकारची स्वस्त औषधं देणारी दुकानं असावीत, जेणकरून त्याचा थेट लाभ समाजातल्या गरीब आणि गरजूंना होईल. याची सुरुवात सुरेकांनी आधीच केली आहे. दिल्लीप्रमाणेच त्यांनी मथुरा आणि बनारसमध्येही अशाच प्रकारची स्वस्त दरात औषधे देण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे मथुरा आणि बनारसमधल्या हजारो गरजू रूग्णांना स्वस्त दरात आणि वेळेवर औषधोपचार मिळणं शक्य झालं आहे.
@@AUTHORINFO_V1@@