इसिसविरोधी कोबानचे युद्ध- भाग 3

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2018   
Total Views |



इसिसचा उधळलेला वारू कोबानमध्ये नुसता रोखला गेला असे नाही, तर या पराभवामुळे इसिसला जोरदार झटका बसला. इसिसचा पराभव करता येऊ शकतो हा आत्मविश्वास इसिसविरोधकांना मिळाला.

मागील लेखात पाहिल्याप्रमाणे अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त आघाडीने व तुर्की कुर्दांनी कोबान युद्धात रोजावातील सीरियन कुर्दांना सहाय्य केले, पण तरीही अजून कुर्दांना इसिसवर निर्णायक विजय मिळाला नव्हता. अशा वेळी सीरियामधीलच एफएसए (FSA - Free Syrian Army) व इराकमधील कुर्दिश पेशमर्गा सैनिक कुर्दांच्या सहाय्यास आले. त्यांनी सैनिक म्हणजे मनुष्यबळासोबत शस्त्रास्त्र व दारूगोळ्याचाही पुरवठा केला.

२९ जुलै २०११ ला सीरियातील नागरी युद्धादरम्यान सीरियातील सशस्त्र सेनेने बशर अल-असाद सरकार उलथवून टाकण्यासाठी एफएसएची स्थापना केली होती. इराकमधील उत्तर भाग म्हणजे इराकी कुर्दिस्तानच्या सशस्त्र सेनेला पेशमर्गा म्हणतात. इराकी सेनेला इराकी कुर्दिस्तान प्रदेशात प्रवेश निषिद्ध आहे. त्यामुळे या भागाच्या संरक्षणाचे दायित्व पेशमर्गा सेनेकडे आहे. इराकी पेशमर्गा सेनेने तोफा, जड मशीनगन्स, रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र यासारखी अवजड शस्त्रास्त्रे आणली. दीडशे पेशमर्गा लढाऊ सैनिकांनी कुर्दांना सहाय्य करण्यासाठी कोबानमध्ये प्रवेश केला.

२९ ऑक्टोबरला एफएसएच्या दोनशे लढाऊ सैनिकांनी कोबानमध्ये प्रवेश केला. अजून बरेच सैनिक कुर्दांना सहाय्य करण्यास व इसिसविरुद्ध लढायला जाण्यास सिद्ध होते, पण आता केवळ दोनशे लढाऊ सैनिकांचा गट पुढे पाठवला होता. सर्वांनाच एकदम एकाच वेळी पाठवणे शक्य नव्हते व योग्यही नव्हते. फ्री सीरियन आर्मी इसिसविरोधी होते, पण फ्री सीरियन आर्मीमध्ये कुर्दांना कोबान युद्धात सहाय्य करण्यावरून दोन तट पडले होते. काहींना कुर्द हे असाद समर्थक वाटत होते, कारण असाद विरोधात असंतोष उफाळून आलेला असताना कुर्द त्यात उत्साहाने सामील झाले नव्हते असा काहींचा आक्षेप होता. त्यामुळे दोनशे लढाऊ सैनिकांनी कोबानमध्ये प्रवेश केला असे म्हटले जात असले, तरी प्रत्यक्षात पन्नासच लढाऊ सैनिक कोबानमध्ये पोहोचले होते. शस्त्रास्त्र व लढाऊ सैनिकांना घेऊन जाणारा ८० मोठ्या मालवाहू गाड्यांचा ताफा हबुरमधून (हबुर हे इराक व तुर्कस्तानमधील सीमा ओलांडण्याचे स्थान आहे, याला इब्राहिम खलिल किंवा फ्रंटिअर गेट असेही म्हणतात) सुरुकच्या दिशेने निघाला. सुरुकला सैनिकी तळ होता व हे ठिकाण कोबानपासून १६ किमी अंतरावर आहे.

अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त आघाडीचे हवाई हल्ले, तुर्की कुर्द, पेशमर्गा व एफएसए अशी कुमक कोबानला येऊन मिळाली. जगाचे लक्ष आता कोबानकडे होते, कोबान पडते की केवळ काही ठिकाणी विजय मिळतील की इसिसला माघार घ्यावी लागेल? वायपीजी, एफएसए व पेशमर्गाने संयुक्त मोहिमेद्वारे पश्चिम कोबानमधील अरबस, मनाझा, अल्बालूर, सिकूर या चार गावांतून इसिसला माघार घ्यायला लावली. पेशमर्गा सेनेच्या आगमनाने कुर्दांना बळ मिळाले व इसिसच्या आगेकूचीला खीळ बसली. हवाई हल्ल्यामुळेही इसिसचे प्रचंड नुकसान होत होते. वाहन जळून खाक होत होती, इमारती व मोक्याची ठिकाण हवाई हल्ल्यात बेचिराख होत होती. हवाई हल्ल्याने इसिसव्याप्त प्रदेश अक्षरशः भाजून निघत होता. १९ जानेवारी २०१५ ला वायपीजीने मिस्तानोर टेकडी आपल्या ताब्यात घेतली आणि इसिसचे मुख्यालय असलेले ठिकाण म्हणजे रक्का व अलेप्पोला जाणारा पुरवठा मार्ग बंद करून इसिसला पेचात पकडल. Syrian Observatory for Human Rights अनुसार बहुतांश भाग आता कुर्दांच्या ताब्यात आला होता, पण तरीही पूर्व व दक्षिणेकडील भाग अजून इसिसच्या ताब्यात होता. दुसर्‍या दिवशी वायपीजीने राष्ट्रीय रुग्णालय ताब्यात घेऊन, कोबानच्या नैऋत्य भागात प्रवेश करण्यास ते सिद्ध झाले. आता वायपीजीने इसिसचा कोबानचा पुरवठा मार्ग बंद करून टाकला. अशा प्रकारे इसिसची कोंडी करून, हल्ले करून, २६ जानेवारीला इसिसला माघार घ्यायला लावून, वायपीजीने कोबान शहर हस्तगत केले, पण तरीही कोबानच्या आजूबाजूचे प्रदेश व काही गावं इसिसकडे होती. तरीही जवळ जवळ ७० टक्के प्रदेश आता कुर्दांच्या अधिपत्याखाली आला होता.

३० जानेवारीला इसिसवादी अमाक वृत्तसंस्थेने व्हिडिओ प्रसारित करून, अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त आघाडीने केलेल्या हवाई हल्ल्यामुळे कोबान शहरातून माघार घेत असल्याचे घोषित केले, पण पुन्हा हल्ला करून, वायपीजीचा पराभव करण्याची धमकी दिली. नंतर पेशमर्गा, एफएसए व हवाई हल्ल्याच्या सहाय्याने वायपीजी एकेक करत, सर्व प्रदेश हस्तगत करत कारा कोझाकमध्ये येऊन पोहोचली. १३ ते १५ मार्च २०१५ दरम्यान येथे जोरदार धुमश्चक्री उडाली, ज्यात चार वायपीजी सैनिक व ४५ इसिसचे जिहादी मारले गेले. अखेर इसिसच्या ताब्यात असलेल्या या कारा कोझाक गावातूनही इसिसला माघार घ्यावी लागली. अशा रीतीने सर्व कोबान परगणा कुर्दांनी जिंकून घेतला व इसिसचा पराभव केला.

या युद्धात वायपीजे व वायपीजीचे चारशे आठ सैनिक व त्यांच्या सहाय्यकांचे २० सैनिक कामी आले. इसिसचे ३७१० जिहादी मारले गेले. कोबानमधील या सेनेत ४०% महिला होत्या.

इसिसचा उधळलेला वारू कोबानमध्ये नुसता रोखला गेला असे नाही, तर या पराभवामुळे इसिसला जोरदार झटका बसला. इसिसचा पराभव करता येऊ शकतो हा आत्मविश्वास इसिसविरोधकांना मिळाला. इतकेच नव्हे तर या पराभवामुळे रोजावाच्या सीमा वाढत गेल्या व इसिसच्या सीमा आक्रसत गेल्या. IHS Conflict Monitor या सैनिकी नीतिज्ञाच्या अनुसार, '२०१५ पासून त्यांच्या (रोजावाच्या) अधिपत्याखालील प्रदेश १८६ टक्क्यांपासून १५,८०० किमी पर्यंत विस्तारला गेला. त्यांनी जवळजवळ सर्व पारंपरिक सीरियन कुर्दिश प्रदेशावर नियंत्रण प्रस्थापित केले आहे. कोबान परगणा हा जगातील दहशतवादाविरुद्धच्या प्रतिकाराचे निदर्शक आहे,’ असे वरिष्ठ सीरियन कुर्द अधिकारी अन्वद मुस्लीम म्हणाले.

या मोठ्या विजयानंतर वायपीजीने निवेदन दिले की,'कोबानची लढाई ही केवळ वायपीजी व इसिसमधील लढाई नव्हती, तर मानवता व क्रौर्यामधील लढाई होती, स्वातंत्र्य व अत्याचारामधील लढाई होती, ही सर्व मानवी मूल्ये व मानवतेचे शत्रू यांमधील लढाई होती.' अशाप्रकारे कोबान युद्ध जिंकून, सीरियन कुर्दांनी रोजावा क्रांतीची जगाला ओळख करून दिली.

@@AUTHORINFO_V1@@