पर्यावरणाच्या समृद्धीला समन्वयाची साथ...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2018   
Total Views |



मुंबई म्हटली की औद्योगिकनगरीचा तपशील डोळ्यासमोर येतो. ‘मुंबईनगरी बडी बाका’ म्हणत मायानगरी मुंबई डोळ्यासमोर येते. ‘मुंबई माझी लाडकी’ म्हणत कित्येक योजना येतात आणि जातात. पण, या सर्वांच्या पलीकडे जाऊन या मायमाऊली मुंबईला खर्‍या अर्थाने जगवण्यासाठी ‘केशवसृष्टी’च्या अंतर्गत निर्माण झालेली ‘माय ग्रिन सिटी’ ही एक संस्था कार्यरत आहे. ‘स्वच्छ भारत’ योजनेअंतर्गत स्वच्छ आणि निसर्गशिल मुंबईचे स्वप्न पाहत त्यासाठी पर्यावरणाला वाहून घेतलेली ही संस्था..

मी कुणाचेच कोणतेही उपकार कधीच ठेवत नाही; कळलं का? हे वाक्य आपण केव्हातरी कुणाकडूनतरी हमखास ऐकलेले असतेच असते. पण, बारकाईने विचार केला तर हे खरे आहे का? माणूस माणसाचे उपकार फेडू शकतो का? पण, आपण या निसर्गाचे किंवा आपल्या जीवसृष्टीला योगदान देणार्‍या प्रत्येक सुक्ष्मातील सूक्ष्म घटकांचे उपकार फेडू शकतो का? म्हणजे कसे आहे की, समजा एखादे फळ मी विकत घेतले तर त्या फळाची किंमत मी फळविक्रेत्याला देईन, ते फळ पिकवणार्‍या शेतकर्‍याला देईन. पण, ते फळ निर्माण करणार्‍या झाडाला, त्या झाडाला मदत करणार्‍या पर्यावरणातील अन्य घटकाला त्या फळाची किंमत मोजून देऊ शकतो का? तर नाहीच. त्यामुळे या निसर्गाचे अमुल्य उपकार घेऊनच आपण जगत आहेात. ते उपकार फेडण्याचे तर दूरच, पण उलट निसर्गाला हानीकारक असेच वर्तन आपल्याकडून म्हणजे समस्त मानवजातीकडून अक्षम्यपणे होत असते. निसर्गाच्या संवर्धनासाठी काहीतरी ठोस काम करायलाच हवे, असे माझ्या मनात होते आणि मग त्यातूनच एका वर्षापूर्वी ’माय ग्रीन सोसायटी’ची संकल्पना निर्माण झाली. यामध्ये रा. स्व. संघाच्या सर्वसमावेशक विचारधारेनुसार पर्यावरणाचे संवर्धन नेतृत्वाने नाही, तर समन्वयाने करण्याचे यशस्वी प्रयत्न सुरू आहेत.” ‘केशवसृष्टी’च्या अंतर्गत कार्यरत असणार्‍या ‘माय ग्रीन सोसायटी’ संस्थेचे संयोजक सुशिल जाजू सांगत होते. त्यांच्या सोबतच संयोजक म्हणून नंदकिशोर जोशी, विशाल टिबरेवाला, विनोद अग्रवाल हे ही आहेत. ’माय ग्रीन सोसायटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी निलय चौबळ आहेत.

‘माय ग्रीन सोसायटी’ संबंधी सुशिल जाजू तसेच निलय चौबळ यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यांच्याशी संवाद साधला असता, मुंबईच्या कचर्‍याच्या समस्याविषयी खालील वास्तव समोर आले-

मुंबईमध्ये वस्त्यांचे चार विभागात वर्गीकरण होते. एक मोठ्या सोसायट्या, छोट्या बिल्डिंग, चाळी आणि झोपडपट्टी. या सर्वामध्ये दररोज कचरानिर्मिती होत असते. मुंबईत एकूण ९ .५ हजार टन इतका कचरा गोळा केला जातो. हा कचरा नेमका जातो कुठे? तर डम्पिंग ग्राऊंडवर. सर्वसामान्य नागरिकांना इतकेच माहिती असते की, कचरा कचराकुंडीत फेकला की महानगरपालिकेची गाडी येऊन तो कचरा घेऊन जाते. सरकारने किती मोहिमा राबवल्या की ओला कचरा वेगळा ठेवा, सुका कचरा वेगळा ठेवा, ई-कचरा वेगळा ठेवा. त्याचे वर्गीकरण करा. पण तसे होते का? तर तसे अजूनही होताना दिसत नाही. सर्वसाधारणपणे एकाच डब्यात सर्व कचरा साठवला जातो. सर्वेक्षणातून हे सिद्ध झाले आहे की, 100 टक्के कचर्‍यामध्ये 60 टक्के ओला कचरा, जो स्वयंपाकघरातल्या अन्ननिर्माण प्रक्रियेतला असतो. या ओल्या कचर्‍याचा वापर करून खतनिर्मिती करता येते. हे खत नैसर्गिक तर असतेच, शिवाय त्यामध्ये रासासनिक घटक नसल्याने ते घातक नसते. आज रासायनिक खतांचा वापर करून ज्या अन्नधान्याची निर्मिती होते, त्यामुळे मानवासमोर अनेक आरोग्याचे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. त्यासाठी हे ओल्या कचर्‍यापासून निर्माण झालेले खत उत्तम पर्याय आहे, तर ३० टक्के कचरा हा पुनर्वापर करण्यास योग्य असतो. पण, त्याचा पुनर्वापर न करताच किंवा त्यापासून पुनर्निर्मिती न करता त्याला ‘कचरा’ म्हणून फेकले जाते. मात्र, उरलेला १० टक्के कचरा खरा कचरा असतो. त्याची नष्टीकरणाची प्रक्रिया खूप किचकट आणि वर्षानुवर्षे चालणारी असते. तो कचरा डम्पिंग ग्राऊंडमध्ये न्यायलाच हवा आणि त्याची विल्हेवाट योग्य पर्याय निवडून करायचलाच हवी. आपण कचर्‍याचे असे वगीर्र्करण करतो का? तर नाही. त्यामुळे वर्गीकरण न केलेला सर्व कचरा महानगरपालिका आपल्या वाहनव्यवस्थेने वाहून नेते. इथपर्यंत ठीक आहे. पण, यामागे आपल्या अर्थकारणाचा मोठा तोटा आहे. तो तोटा मुंबईकरांनी जाणून घ्यायला हवा. मुंबई महानगरपालिकेच्या खर्चाच्या एकूण अंदाजपत्रकांपैकी १ /५ रकमेचा खर्च मुंबई शहराचा कचरा उचलणार्‍या वाहतूक व्यवस्थेवर होतो. याचाच अर्थ १ /५ खर्चाची रक्‍कम अक्षरश: कचर्‍यात जाते. जर कचराच कमी झाला तर कचरा वाहतूक व्यवस्थाही कमी होईल. त्यामुळे त्यावर होणारा खर्च पण कमी होईल. वाचलेला पैसा आपण मुंबईच्या विकासासाठी खर्च करू शकतो.

निलय चौबळ म्हणतात की, ”आपल्या देशाचे पंतप्रधान आपल्याला ’स्वच्छ भारता’संबंधी आवाहन करतात. आपला देश स्वच्छ कसा होईल? यासाठी नियोजन करतात. या देशाचा नागरिक म्हणून सगळ्यांचे योगदान ’स्वच्छ भारता’साठी आवश्यक आहे. त्याची सुरुवात आहे ती म्हणजे कचरा समस्येची जाणीव आणि त्यावर उपाय करण्यासाठीची मानसिकता. पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, ‘स्वच्छ भारत’साठी मी एकटा काही करू शकत नाही. त्यासाठी सर्व देशवासीयांचा सहभाग हवा आहे. ’माय ग्रीन सोसायटी’ त्यासाठी घराघरातून ‘स्वच्छ भारता’चे दूत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.” पण, नेमके ‘माय ग्रीन सोसायटी’ यासाठी काय करते? यावर स्पष्टीकरण देताना निलय पुढे म्हणाले की, “सुरुवातीला मुंबई विद्यापीठाशी आम्ही संपर्क साधला. मुंबईतील महाविद्यालयातील एनएसएसमध्ये सहभागी असलेल्या विद्याार्थ्यांना ’स्वच्छ भारत’ संकल्पनेनुसार ’कचरा व्यवस्थापन’ या विषयावर काही तास सेवाकार्य सूचित करण्याची विनंती केली. मुंबई विद्यापीठानेही आमची सूचना मान्य केली. त्यानंतर मुंबईमध्ये 160 महाविद्यालयातील ‘एनएसएस’ विभागाला संपर्क करून त्यामधील १५ हजार विद्यार्थ्यांना कचरा समस्या, जाणीव, उपाय, आधुनिक तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण प्रशिक्षण दिले गेले. तीन मुलांचा गट बनवून प्रत्येकान दोन सोसायटींशी संपर्क साधणे, तिथे कचरा व्यवस्थापन, उपाय, समस्या यावर चर्चा, मार्गदर्शन संवाद साधणे. सोसायटीच्या व्यवस्थापकांना भेटून सोसायटीमध्ये तयार होणारा कचरा आणि त्याची विल्हेवाट याविषयी

त्यांच्याकडून माहिती गोळा करणे. सोसायटी जर सोसायटीमध्ये निर्माण होणार्‍या कचर्‍यापासून खतनिर्मिती करायला तयार होत असेल, तर तीला मदत करणे. ‘माय ग्रीन सोसायटी’ने आपली स्वत:ची वेबसाईट तयार केली आहे. त्यामध्ये ‘कचरा’ विषयावर काम करणार्‍या संबंधित विद्यार्थ्यांची यादी, याविषयासंबंधी मार्गदर्शन, संपर्क केलेल्या सोसायटी यांची माहिती आहे. तसेच कचर्‍यापासून खतनिर्मिती करणार्‍या यंत्रांचा परिचय, यंत्र विकणार्‍या संस्था यांचा परिचय देण्यात आला आहे. निलय सांगत होते. त्यांच्या बोलण्यात ‘केशवसृष्टी’च्या अंतर्गत काम करणार्‍या ’माय ग्रीन सोसायटी’ संस्थेचे उद्दिष्ट स्पष्ट होत होते.

सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे ही समाजजागृतीची केंद्रे. इथे धार्मिक अधिष्ठानासोबतच सामाजिक जागृतीचीही संवेदना जागृत होते. त्यासाठी मुंबईतील सर्वच धर्म आणि पंथाच्या प्रार्थनास्थळांचे सर्वेक्षण करून प्रार्थनास्थळांच्या व्यवस्थापनाला निर्माल्यापासून खत बनवणे, तसेच कचरा वर्गीकरण, कचरा समस्या यावर मार्गदर्शन करणे. मुंबईत ‘माय ग्रीन सोसायटी’ने ८५० प्रार्थनास्थळांचे सर्वेक्षण केले आहे. त्यापैकी १०० प्रार्थनास्थळांची प्रत्यक्ष कार्यासाठी निवड करण्यात आली आहे. काही प्रार्थनास्थळांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माल्य गोळा होते. पण, कम्पोस्टिंग करण्यासाठी तिथे जागा नसते, तर काही प्रार्थनास्थळांमध्ये खूप मोठी जागा असते, पण तिथे मोठ्या प्रमाणात निर्माल्य गोळा होत नाही. दिवसाला किमान १० ते १५ किलो निर्माल्य गोळा होणार्‍या आणि त्या प्रार्थनास्थळांमध्ये कम्पोस्टिंगसाठी जागा असणार्‍या प्रार्थनास्थळांनाच ’माय ग्रीन सोसायटीने’ निवडले आहे. प्रार्थनास्थळांचे सर्वेक्षण केले गेले, तेव्हा त्या प्रार्थनास्थळांच्या व्यवस्थापकांना ‘माय ग्रीन सोसायटी’ आपले उद्दिष्ट स्पष्ट करते. व्यवस्थापकांनी होकार कळवला की त्यानंतर संस्थेचे कार्यकर्ते व्यवस्थापकांना भेटतात. त्यांना एक ऑडिट फॉर्म दिला जातो. त्या फॉर्ममध्ये मंदिराच्या वास्तूच्या जागेसंबंधी प्रश्‍न असतात. मंदिरामध्ये कोणती दैवते आहेत? कोणत्या दिवशी भाविकांची गर्दी जास्त होते? कोणत्या दिवशी जास्त निर्माल्य गोळा होते? त्या निर्माल्याचे काय केले जाते? प्रार्थनास्थळांमध्ये निर्माण होणार्‍या निर्माल्यापासून खतनिर्मिती करायची आहे का? या प्रकारचे प्रश्‍न असतात. त्यानुसार निकष ठरून प्रार्थनास्थळांची निवड केली जाते. व्यवस्थापक आपल्या इथे निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्यास अनुकूल असतील, तर त्यांना संस्थेद्वारे कम्पोस्टिंगची यंत्रणाही पुरवली जाते. काहींची ही यंत्रणा खरेदी करण्याची ऐपतच नसते. अशावेळी संस्था निशुल्क ही यंत्रणा प्रार्थनास्थळांना देते. हेतू हाच की, प्रार्थनास्थळ मग ते मंदिर असो, मशिद असो, चर्च असो की गुरूद्वारा असो की अन्य प्रार्थनास्थळ असो, तिथे येणारे भाविक निर्माल्यापासून होणारी खतनिर्मिती पाहतील. देवाच्या दारी चालणार्‍या उपक्रमांचा त्यांच्यावर सकारात्मकच परिणाम होईल. आपोआपच कचरा व्यवस्थापनची समस्या यावर त्या भाविकाची जागृती होईल.

संस्थेचा दुसरा उपक्रम आहे, ‘सिटी फॉरेस्ट.’ या उपक्रमाअंतर्गत ‘अकिरा मियावाकी’ पद्धतीने मुंबई शहर व उपनगरात भारतीय औषधी झाडे, वेली व विविध वनस्पतींच्या साहाय्याने घनदाट जंगले तयार करणे. काळजीपूर्वक वनस्पती निवडून तयार करण्यात आलेल्या या जंगलांमुळे शहरामधील ढासळत्या पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे. दरवर्षी या जंगलातील ६ झाडे ११० टन ऑक्सिजनची निर्मिती करून कार्बनडाय ऑक्साईड वायूचे प्रमाण कमी करण्यास सहकार्य करतील. शहरामध्ये कमीत कमी जागेत ही अशी छोटी घनदाट जंगले उभारणे शक्य आहे. त्याशिवाय शहरातील नद्यांचे पुनरुज्जीवन हाही एक महत्त्वपूर्ण उपक्रम ‘माय ग्रीन सोसायटी’च्या माध्यमातून राबवला जात आहे.

‘माय ग्रिन सिटी’ म्हणजे हिरवे वनदायी पर्यावरण संपन्नतेचा माझा समाज. मुंबईला निसर्गसंपन्न आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून समृद्ध बनवू पाहणार्‍या ’माय ग्रीन सोसायटी’च्या प्रयत्नांना प्रत्येक जागृत नागरिकाने सहकार्य करायलाच हवे. कारण, ‘स्वच्छ भारता’च्या संकल्पनेची ही सुरुवात आहे.

9594969638

@@AUTHORINFO_V1@@