वाडा : त्यामुळे नाटक जत्रेच्या माध्यमातून लहान मुलांना नाटक या माध्यमाचा वापर करत, वेगळा अनुभव मिळाला.
'रेन्बो स्टोरी टेलर्स' या संस्थेच्या माध्यमातून येथील आदिवासी सेवा मंडळ संचालित आदिवासी मुलांचे वसतिगृहातील खुल्या रंगमंचावर रविवारी (दि. 3) सायंकाळी पाच ते आठ वाजेदरम्यान नाटक जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. या नाटक जत्रेत लहान मुलांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाटक जत्रेला बालकलाकार तन्मय मोरे, परीक्षित विशे यांच्या बालसंगीताने सुरुवात झाली. संपूर्ण परिसरात साकारलेल्या चित्रकृतींनी मुलांना आकर्षित केले होते. या चित्रांसोबत असंख्य मुले आपली छबी टिपून घेत होते. तर पुस्तकांच्या स्टॉलवर मुलं रेंगाळताना पहायला मिळाली, तर अनेक मुलं पुस्तके खरेदी करत होती. इशान खन्ना, दीप नाईक या कलाकारांनी विदूषक इम्प्रूव्ह कॉमेडी सादर करून, धम्माल उडवून दिली. विदूषकांच्या अदाकारीने लहान मुलांसह उपस्थित रसिकांना पोट धरून हसायला लावले. वाड्यासारख्या शहरात प्रथमच विदूषकांच्या अदाकारीचा असा प्रयोग झाल्याने लहान मुले खळखळून हसताना पाहायला मिळाली.
तर अभिनेते चिन्मय केळकर यांनी ’जादूची भांडी’ या तामिळ लोककथेचे एकपात्री सादरीकरण करत जंगल, भूतांसह अन्य पात्रे हुबेहूब उभी करत उपस्थितांना खिळवून ठेवले. ’रेन्बो स्टोरी टेलर्स’ टीमच्या सागर भोईर, राम चौधरी, प्रथमेश भोईर, चेतन पाटील, भावना शेलार यांनी ’बाबाच्या मिशा’ व ’दोन कुत्र्यांची गोष्ट’ या छोट्या नाटिका सादर करून, लहान बालकांचे भावविश्व उभे केले.