२ बालनाट्य, परिचर्चा, विनोदी नाटकाने यशस्वी सांगता
भुसावळ, ३ जून :
सकाळी दगडा शिकव धडा व पुस्तक एके पुस्तक या दोन बालनाट्याच्या सादरीकरणानंतर रविवारी, ३ जून रोजी सायंकाळी पंचक्रोशीतील खान्देशात नाटक रुजविण्यात नवनाटककारांची जबाबदारी या विषयावर नाट्य परिचर्चा रंगली. रात्री चार दिवस प्रेमाचे या विनोदी नाटकाने खान्देश नाट्य महोत्सवाचा समारोप झाला.
भुसावळ येथील श्रीकृष्णचंद्र सभागृहात सुरू असलेल्या स्वर्गीय नानासाहेब देविदास गोविंद फालक स्मृती प्रायोगिक खान्देश नाट्य महोत्सवाच्या तिसर्या तथा अंतिम दिवशी ३ रोजी सकाळी श्रीमती प.क. कोटेचा महाविद्यालय भुसावळ निर्मित व अनिल गोष्टी दिग्दर्शित दगडा शिकव धडा हे बालनाट्य सादर करण्यात आले. त्यानंतर साने गुरुजी विद्यालय अमळनेर निर्मित अमोल, संगीता व अरुण लिखीत आणि संदीप घोरपडे दिग्दर्शित पुस्तक एके पुस्तक हे बालनाट्य सादर करण्यात आले.
सायंकाळी पंचक्रोशीतील खान्देशात नाटक रुजवण्यात नवनाटककारांची जबाबदारी या विषयावर नाट्य परिचर्चा रंगली. सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी केले. त्यात विरेंद्र पाटील, होनाजी चव्हाण, अमरसिंह राजपूत, गोपीचंद धनगर, हर्षल पाटील, नितीन वाघ, अमोल ठाकूर, हनुमान सुरवसे हे खान्देशातील नव नाटककार सहभागी झाले.
रात्री रत्नाकर मतकरी लिखीत व महेश डोकफोडे दिग्दर्शित चार दिवस प्रेमाचे हे विनोदी नाटक सादर झाले. अतिशय हत्या फुलक्या विनोदातून रसिक श्रोत्यांना निखळ हास्याचा आनंद मिळाला.
संगीत तेजस बिल्दीकर, नेपथ्य सुनील परमार, रंगभूषा माणिक कानडे, प्रकाश विनोद राठोड, सूत्रधार व व्यवस्था सुनील परमार यांची होती. या नाटकात पुनम पाटील, प्रफुल्ल लेले, सुरभी पाटील, अक्षय मुडावदकर, महेश डोकफोडे यांनी कलाकाराची भूमिका निभावली. यशस्वीतेसाठी गठित विविध समित्यांनी परिश्रम घेतले.