28-29 सप्टेंबर 2016 च्या रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या लष्करी छावण्यांवर हल्ला करून त्या नष्ट केल्या. लष्कराच्या व्याख्येप्रमाणे याला ‘सर्जिकल स्टाईक’ म्हणतात. असा हल्ला करणे गरजेचे झाले होते. कारण, 18 सप्टेंबर 2016 ला पाकिस्तानी लष्कराच्या इशार्यावरून दहशतवाद्यांनी काश्मिरातील उरी ब्रिगेड हेडक्वार्टर्सवर हल्ला करून 19 सैनिकांचे प्राण घेतले होते. अशा घटना लष्कराच्या मनोधैर्याला खच्ची करणार्या असतात. त्यामुळे लष्कराचे मनोधैर्य वाढावे तसेच देशात पसरविण्यात आलेले हताशेचे वातावरण दूर व्हावे म्हणून या सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेण्यात आला. हा हल्ला नियोजनबरहुकूम पार पडला. या हल्ल्याने पाकिस्तान चांगलेच हादरले. सरकारने या हल्ल्याची बातमी जनतेला देऊन, लष्कराने उरी येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला, असे जाहीर केले.
हा सर्व घटनाक्रम भारत सोडून इतर कुठल्याही देशात झाला असता, तर सर्वांनीच सरकारचे अभिनंदन केले असते. परंतु, आपल्या भारतात तसे घडणे शक्य नव्हते. कॉंग्रेससहित विरोधी पक्षांनी, हा हल्ला झालाच नाही, अशी आवई उठवून सरकारला याचे पुरावे मागितले. गुप्तपणे जी लष्करी कारवाई केली जाते, त्याचे पुरावे मागितले जात नाहीत आणि दिलेही जात नाहीत. हे माहीत असल्यामुळेच विरोधकांनी मोदी सरकारला पुरावे मागण्याचे रडगाणे सुरूच ठेवले. जेव्हा केव्हा सर्जिकल स्ट्राईकचा मुद्दा यायचा, तेव्हा तेव्हा ‘कुठे आहेत पुरावे?’ असे विचारले जायचे. काहींनी तर हा सर्जिकल स्ट्राईक नव्हताच, असे म्हटले. कॉंग्रेसवाल्यांनी, संपुआ सरकारच्या काळातही असे सर्जिकल स्ट्राईक झाले होते; परंतु, आम्ही त्यावरून स्वत:ची छाती पिटली नाही, असे टोमणे मारले. लष्कराच्या निवृत्त अधिकार्यांनी मात्र कॉंग्रेसच्या काळात कधीही सर्जिकल स्ट्राईक झाले नव्हते, असा खुलासा केला होता. असे इतके सर्व काही झाल्यानंतर, सर्जिकल स्ट्राईकचा विषय संपल्यातच जमा होता.
परंतु, गेल्या आठवड्यात पत्रकारितेचे कथित शिरोमणी, वाजपेयींच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले अरुण शौरी यांनी एका मुलाखतीत, 2016च्या सर्जिकल स्ट्राईकची ‘फार्सिकल’ (नाटक) म्हणून संभावना केली. त्यानंतर मात्र केंद्र सरकारने या सर्जिकल स्ट्राईकचा एक व्हिडीओ प्रसारित केला. एवढा धडधडीत व अधिकृत पुरावा सादर केल्यानंतर तरी विरोधकांनी तो मान्य करायला हवा होता ना! पण नाही. भारताचे दुर्दैव आहे ते हे आहे! ज्या ज्या लोकांनी मोदी सरकारला सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले होते ते आता म्हणू लागले की, लष्कराच्या अशा गुप्त कारवाईला उघड करणे, त्या मोहिमेत सहभागी झालेल्या सैनिकांच्या तसेच सीमावर्ती भागात वसलेल्या नागरिकांच्या सुरक्षेला धोक्यात टाकणारे आहे. कुणी म्हटले की, निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणून मोदींनी स्वत:कडे सहानुभूती वळविण्यासाठी, दोन वर्षांपूर्वीचा हा व्हिडीओ मुद्दाम प्रसारित केला. अरुण शौरींनी ‘अर्धवृत्’ करून, मोदींच्या धाडसाला तुच्छ लेखले. सर्जिकल स्ट्राईकचे श्रेय लष्कराचे आहे. आपल्या लष्करात तेवढी क्षमता नेहमीच होती. त्यामुळे मोदींचे कौतुक करण्याचे कारण नाही, अशी विचित्र प्रतिक्रिया दिली. मोदींच्या विरोधाने आंधळे झालेले अरुण शौरी हे मात्र विसरले की, लष्कर कितीही निपुण, प्रवीण असले तरी, कारवाई करण्याचा निर्णय सरकार घेत असते. सरकारने निर्णय घेतलाच नाही तर, लष्कराचे सर्व सामर्थ्य, नैपुण्य जागच्या जागीच राहते. परंतु, कुठल्याही परिस्थितीत मोदींना श्रेय जाता कामा नये, असा विडाच या अरुण शौरीसम प्रभृतींनी उचलला आहे ना!
हा व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर संजय निरुपम, रणदीप सुर्जेवाला, दिग्विजयिंसहसारख्या ज्या लोकांनी दोन वर्षांपूर्वी मोदींना सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले होते, ते आता असे पुरावे जाहीर केले म्हणून मोदींवर टीका करत आहेत. कम्युनिस्टांनी तर हा सर्जिकल स्ट्राईक अतिशय क्षुल्लक स्वरूपाचा होता, असा सूर काढला आहे. मोदीद्वेषापायी आपण आपला देश, आपले लष्कर, विविध संविधानात्मक संस्था यांची प्रतिष्ठा धुळीस मिळवीत आहोत, त्यांची बदनामी करून पाकिस्तानसारख्या शत्रूच्या हातात आयते कोलित देत आहोत, याचा साधा विचारही यांच्या मनात आला नसेल का? असे वाटते की, यांच्या शरीरातून रक्त नाही तर चाटुगिरीच प्रवाहित होत असावी. किती हे बुद्धीचे अध:पतन! आधी नरेंद्र मोदींना आव्हान द्यायचे आणि ते आव्हान मोदींनी लीलया पेलले की, त्यालाही नाके मुरडायचे, ही कुठली राजनीती? मोदी भ्रष्टाचार नष्ट करीत नाहीत, काळा पैसा हुडकून काढू शकले नाहीत, म्हणून उठता बसता मोदींवर तोंडसुख घ्यायचे आणि मोदींनी ‘सौ सुनारकी एक लुहारकी’ या न्यायाने नोटबंदीसारखा धाडसी निर्णय घेऊन भ्रष्टाचार व काळ्या पैशाविरुद्ध शंखनाद केला की, नोटबंदीमुळे देश खड्ड्यात गेला म्हणून छाती पिटायची! आता कुणी चुकूनही, मोदींनी भ्रष्टाचार किंवा काळ्या पैशाविरुद्ध काही केले नाही, असे म्हणत नाहीयेत. मोदींना देशाचे राजकारणच काय परराष्ट्र धोरण म्हणजे काय हेही माहीत नाही, अशा शब्दांत विरोधक मोदींची पंतप्रधान झाल्यावर टवाळी करीत असत.
मोदींनी सातत्याने परदेश-दौरे करून, जगातील निवडक प्रभावी नेत्यांच्या रांगेत स्वत:चे स्थान निर्माण केले. पाकिस्तानला जगात एकटे पाडले. पाकिस्तानचे अन्नदाते सौदी अरब, इराण, संयुक्त अमिरात वगैरे देशांना पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून भारताच्या बाजूने वळविले. चीनच्या मदतीने ग्वादर बंदर विकसित करून भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने चालविला असताना, भारताने या ग्वादर बंदराजवळच इराणचे चाबहार बंदर विकसित करण्याचा करार पदरात पाडून घेतला. आज पाकिस्तानची जगात कवडीची किंमत राहिली नाही, याचे कारण नरेंद्र मोदी आहेत, अशा चर्चा तिकडे पाकिस्तानात सुरू असतात. असे असताना आमचे विरोधक मात्र मोदींच्या परदेश दौर्यावरून त्यांच्यावर उथळ टीका करत असतात. जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करा म्हणून घोशा लावायचा आणि ती उत्कृष्ट रीतीने पूर्ण केलीत तर ते नाकारायचे, असा नतद्रष्टपणा सध्या विरोधकांनी स्वीकारला आहे. सर्जिकल स्ट्राईकबाबत विरोधकांनी उधळलेली मुक्ताफळे याच मानसिकतेची आहेत. हे सर्व असे रान उठविणे सुरू असताना, नरेंद्र मोदी मात्र धीरगंभीर शक्तिशाली अंगदाप्रमाणे प्रगतीची आणि विकासाची एकेक पावले ठामपणे उचलत जात आहेत. भारतातील जनता हे सर्व मूकपणे बघत आहे. मान्यही करीत आहे. त्याचाच तर विरोधकांना पोटशूळ उठला आहे. दुसरे काहीही नाही.