सावरकर "दूरदर्शन" या प्रतिशब्दाचे जनक कशावरुन?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
टेलेविजन भारतात खूप नंतर आले, सावरकर "दूरदर्शन" या प्रतिशब्दाचे जनक कशावरुन? 
 
 
मागच्या वर्षी बालभारतीने माझ्या सहाय्याने "सावरकरांची भाषाशुध्दी"वर एक अधिक वाचनासाठी म्हणून पाठ इयत्ता नववी मराठीच्या पुस्तकात घेतला होता. तेव्हा मी तो विषय सर्वांशी शेअर केल्याचे बहुतेकांना आठवतच असेल.
 
आज अचानक मला संबंधितांकडून फोन आला की, कोणातरी वाचकाने या माहितीत "दूरदर्शन" हा शब्द सावरकरांनी मराठी भाषेला दिलेला नाहीच असा आक्षेप घेणारे पत्र पाठवले आहे, तरी आपण या संदर्भात काय माहिती देऊ शकता? आक्षेप घेणाऱ्याचे म्हणणे होते की दूरदर्शन सावरकर गेल्यानंतर म्हणजे १९६६ सालानंतर भारतात रुळल्याने व कोणाचे तरी भाषणात ऐकल्याप्रमाणे दूरदर्शन भारतात सुरु झाल्यानंतर पु.ल.देशपांडे यांनी तो प्रथम वापरला.
 

 
 
अर्थात भारतात दूरदर्शन प्रायोगिक तत्वावर दिनांक १५ सप्टेंबर १९५९ ला व १९६५ साली दिल्लीपुरता का होईना पण दैनंदिन सुरु झाला, तेव्हा सावरकर हयात असल्याने तो त्यांनी कदाचित प्रत्यक्ष पाहीला नसला तरी माहीत असणारच. 
(जानेवारी १९५० ला इंडीयन एक्सप्रेस ने दिलेल्या वृत्तानुसार एका प्रदर्शनात बी. शिवकुमारन नामक एलेक्ट्रॉनिक इंजिनीयरिंग शिकत असलेल्या विद्यार्थ्याने ठेवला होता.) थोडक्यात जगाकडे व विज्ञानाकडे डोळसपणे पहानाऱ्या सावरकरांना दूरदर्शन संपूर्ण अपरिचित असेल असे मानता येत नाही.
 
मी तत्काळ माझ्याकडील १९९२ च्या समग्र सावरकर खंडातील पृष्ठ छायांकीत करुन तो शब्द सावरकरांचाच असल्याचे दाखवून दिले. कितीतरी वस्तू आपल्याकडे नंतर आल्या तरी त्या भारतात माहीत होत्याच. व त्याचे प्रतिशब्द वापरात होते. तसच सावरकरांच्या १९९२ साली प्रकाशित झालेल्या "भाषाशुध्दी" या पुस्तकात हा शब्द सावरकरांनी प्रचलित केला असे सूचीत/यादीत (index) आले आहे व त्यानंतरही सुमारे वीस वर्षे पु.ल. देशपांडे हयात असताना त्यांनी वा अन्य कोणीही कधी तसा आक्षेप घेतला नव्हता.

 
मात्र तरिही माझ समाधान न झाल्याने मी "दूरदर्शन" भारतात येण्याच्या आधी व सावरकर हयात असताना काळ प्रकाशनने (1966 ) जे समग्र सावरकर साहीत्य प्रकाशित केल त्यात टेलेविजन ला "दूरदर्शन" हा प्रतिशब्द वापरलाय का व तसा मुद्रीत केला गेलाय का याचा शोध घ्यायचे ठरवले. माझ्याकडे हे जुने खंड नाहीत, म्हणून काही जणांकडे विचारणा केली. मात्र या सर्वात आपले मित्र श्री. तुकाराम चिंचणीकरांनी बाजी मारली. ते सध्या नागपुरात असताना योगायोगाने तेथे जुन्या व मोठ्या वाचनालयात ते काही पुस्तकांच्या शोधात गेले होतेच. तेथे त्यांनी काळ प्रकाशनच्या आठ खंडात तपासले असता त्यात भाषाशुध्दी हे पुस्तकच समाविष्ट केले गेलेले नाही असे त्यांना आढळले. पण तेवढ्यावर स्वस्थ न बसता त्यांनि अजून शोध घेतला असता सुदैवाने त्यांना अजून एक जुने म्हणजे १९५८ साली प्रसिध्द झालेल्या भाषाशुध्दीची एक प्रत सापडली व त्यात स्वातंत्र्यवीरांनी टेलेविजन ला दूरदर्शन हा प्रतिशब्द दिल्याचे आढळून आले . तुकाराम यांनी लगेचच मला Whats app वर पाठवून दिले.
 
याव्यतिरिक्त तुकारामला सावरकरांचे १९२६ साली प्रसिध्द झालेल्या भाषाशुध्दीची प्रतही मिळाली, त्यात मात्र हा प्रतिशब्द आढळला नाही. तेही अगदी वस्तुस्थितीस धरुनच आहे कारण पहीला एलेक्ट्रॉनिक टीवी १९२७ साली निर्माण केला गेला.
 
 
सावरकर या विषयात काही लोक डोळ्यात तेल घालून काही चूक सापडते का याचा कसा शोध घेत असतात याचा हा एक अनुभव. त्याचबरोबर नवनविन तरुण कळकळीचे असे चांगले सावरकर अभ्यासक तयार होत असल्याने आणि आंतरजालासारखी आधुनिक साधने असल्याने अशा लोकांचे लवकरात लवकर शंकासमाधान करणेही कसे सोपे झाले आहे याचा हा एक उत्तम नमुना आहे.
 
 
वॉट्स ऍप, फोन नसते तर ना माझा नागपुरात असलेल्या तुकारामशी संपर्क होऊ शकला असता व ना मला केवळ ४-५ तासांच्या इतक्या कमी वेळात संबंधित लोकांना पाठवता आले असते.
 
चंद्रशेखर साने 
 
 
@@AUTHORINFO_V1@@