सोलापूरात लिंगायत समाज रस्त्यावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jun-2018
Total Views |

स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी महामोर्चा





सोलापूर : लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यात यावा तसेच देशात अल्पसंख्याक म्हणून त्यांची नोंद व्हावी, या मागण्यांसाठी सोलापूरमध्ये लिंगायत समाजाकडून आज महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हातात भगवे ध्वज घेऊन आणि ढोल-ताशाच्या गजरात हा मोर्चा शहराच्या मध्यभागातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता. सरतेशेवटी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्याचे निवेदन देण्यात आले, यावेळी वरील प्रमुख दोन मागण्यासह राज्य शासनाने कर्नाटकच्या सरकारच्या धर्तीवर लिंगायत धर्माविषयी त्वरित केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱयांकडे यावेळी करण्यात आली. 
सोलापूरमधील कौतम चौक येथील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आज सकाळी ११ वाजता या मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये सोलापूरमधील काही धर्मगुरूंसह जिल्ह्यातील आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमेपलीकडील देखील नागरिक मोठ्या संख्याने सहभागी झाले होते. आतमध्ये भगवे ध्वज, डोक्यावर भगवी टोपी आणि गळ्यात भगवा पंचा अशा पोशाख करून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला होता. याचबरोबर मोर्चात ढोल-ताशाचे वादन देखील करण्यात आले. कौतम चौकामधून माणिक चौक, विजापूर वेस, पंच कट्टामार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ येऊन धडकला यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोर्चाचा समारोप करण्यात आला.

समाजाच्या दोन गटांमध्येच मतभेद

दरम्यान गेल्या दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात सर्वत्र या मोर्चाची तयारी सूरू होती. भारतीय लिंगायत समन्वय समितीचे डॉ. बसवलिंग पट्टदेवरू महास्वामी यांनी या पार्श्वभूमीवर एक पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. परंतु याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेनी याला विरोध करत, वीरशैव लिंगायत समाजाने या मोर्चात सहभागी न होण्याचे आवाहन केले होते. संघटनेचे संस्थापक प्रा. मनोहर धेंडे यांनी या मोर्चावर जोरदार टीका करत, कर्नाटकातील काही धर्मगुरू हे राजकारण्यांच्या हातचे बाहुले झाले असून आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी म्हणून धर्मात फुट पडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु वीरशैव लिंगायत समाजाने त्यांचा डाव ओळखून या मोर्चापासून दूर राहावे, असे आवाहन धेंडे यांनी केले होते. .


कर्नाटक निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्याविषयी केलेल्या घोषणेनंतर सोलापुरात या मागणीने उचल घेतली आहे. दरम्यान कर्नाटकातीलच काही संघटना आणि धर्मगुरुंनी हा मोर्चा काढण्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे या मोर्चामागे राजकीय स्वार्थ असल्याचे मत धेंडेसह वीरशैव समाजातील काही नेत्यांकडून व्यक्त केले जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@