शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : व्हॉट्सअॅप डीपी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2018   
Total Views |

 
 
आजच्या काळात विदेशात जाऊन नोकरी करणारे लोक किती असतील? आपल्या सारखे किती युवा मुलं, मुली विदेशात असतील? मात्र त्यातील किती तिथल्या झगमगाटापायी आपल्या देशाला, आई वडीलांना विसरले असतील? हा लघुपट त्या मुलं मुलांसाठीच आहे. "आयओपनर" म्हणतात ना तसंच काहीसं. खाडकन डोळे उघडणारा हा लघुपट आहे.
 
या लघुपटात आई, वडील आहेत आणि सोशल मीडियावर अत्यंत अॅक्टिव असणारा त्यांचा मुलगा बिट्टू आहे. जागतिक मातृदिनानिमित्त तो व्हॉट्सअॅप वर आपली डीपी बदलतो, आईला शुभेच्छा देतो, आई आनंदी असते. मात्र वडील, त्यांना अजूनही त्याचं भारतात परत न येणं, भारताला नावं ठेवणं खटकत असतं. आई वडील त्याला व्हिडियो कॉल करतात, केव्हा येणार विचारतात मात्र त्याचं उत्तर पुन्हा तेच, "भारतात घाण आहे, प्रदूषण आहे, बायको मुलांना त्रास होतो, तुम्हीच या इकडे, किती दिवसांसाठी येणार?" असे काहीसे प्रश्न विचारतो. त्यानंतर वडील फोन ठेवतात. त्यांना खूप वाईट वाटलं असतं.
 
यापुढे आई वडीलांमध्ये झालेला संवाद ऐकणं महत्वाचं आहे. हाच संवाद या संपूर्ण लघुपटाचा गाभा आहे. हा संवाद ऐकण्यासाठी एकदा तरी नक्कीच बघावा असा हा लघुपट आहे. या संवादातून आताच्या परिस्थितीची प्रकर्शाने जाणीव होते. अनेक परिवारांमधून मुलं शिकण्यासाठी, नोकरीसाठी विदेशात जातात, मात्र त्यानंतर काहींचा आपल्या देशाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. तसं होऊ नये यासाठी काय करायला पाहिजे? किंवा तसं झाल्यास आई वडीलांनी पुढे काय करायला हवं? अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणारा हा लघुपट आहे.
 
 
 
 
इंडी रूट्स फिल्मने प्रदर्शित केलेल्या या लघुपटात मुख्य भूमिकेत आहेत आभा आणि रवींद्र जोशी तर याचे दिग्दर्शन केले आहे हर्षिता जोशी यांनी. रेड चित्रपटातील आज्जीच्या भूमिकेत असलेल्या पुष्पा जोशी यांचा हा परिवार. एक नेहमीचाच मात्र महत्वाचा संदेश देणारा हा लघुपट आहे.
- निहारिका पोळ
@@AUTHORINFO_V1@@