
नवी दिल्ली : जम्मू व काश्मीरमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश मानवी हक्कांचे उल्लंघन करत असल्याचा जावईशोध लावणार्या संयुक्त राष्ट्रांना उशिरा का होईना उपरती झाली आहे. काश्मीर खोर्यात भारतीय लष्करावर दगडफेक करून जनजीवन अस्थिर करणार्या संघटना या पाकिस्तानशी संबंधित असल्याचे आता संयुक्त राष्ट्रांनी स्पष्ट केले आहे.
जैश-ए-मोहम्मद व हिजबुल मुजाहिद्दीन या दोन कुख्यात पाकिस्तानी दहशतवादी संघटनांवर संयुक्त राष्ट्रांनी ठपका ठेवला आहे. अल्पवयीन मुले व हिंसाचार याच्याशी संबंधित आपल्या वार्षिक अहवालामध्ये संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानचे संरक्षण असलेल्या या दहशतवादी संघटनांना दोषी मानले असून जगभरात इतरत्र अशा दुष्कृत्यांसाठी तब्बल १० हजार मुलांचा वापर झाल्याचे या अहवालात उघड करण्यात आले आहे. एकूण वीस देशांचा यात समावेश असून यामध्ये भारतासह सीरिया, अफगाणिस्तान, येमेन, फिलिपिन्स व नायजेरियाचा समावेश आहे. काश्मीरमधील परिस्थितीबाबत या अहवालात नमूद केल्यानुसार येथे भारतीय लष्करावर हल्ला करण्यासाठी जैश-ए-मोहम्मद व हिजबुल मुजाहिद्दीन या दोन दहशतवादी संघटनांनी अल्पवयीन मुलांची भरती केली होती. या दोन्ही संघटना पाककडून पुरस्कृत आहेत.
या अहवालात पुढे भारत सरकारने यावर योग्य ती कारवाई करावी, गुन्हेगारांना शासन करावे व लहान मुलांवरील अन्याय दूर करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांशी सहकार्य करावे, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. काश्मीरमधील या परिस्थितीसह पाकिस्तानमधील मदरसे तसेच इतर शाळांमधील शिक्षणाची परिस्थिती, मुलींच्या शिक्षणाची वानवा आणि लहान मुलांना दहशतवादी प्रशिक्षणांमध्ये ओढले जाणे, यावरही सदर अहवालात कडक शब्दांत ताशेरे ओढण्यात आले आहेत.