राजर्षि शाहूंची मूल्यदृष्टी जोपासण्याचा प्रयत्न करावा : प्रा. भावे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2018
Total Views |

 
 
 
कोल्हापूर : राजर्षि छत्रपती शाहूंची मूल्यदृष्टी विशाल आणि मूलगामी होती, त्यांची मूल्यदृष्टी जोपासण्याचा समाजातील प्रत्येक घटकाने प्रयत्न करावा, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांनी आज येथे बोलताना केले. राजर्षी शाहू छत्रपती शाहू महाराज यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा 'राजर्षी शाहू पुरस्कार' यंदा ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांना येथील शाहू स्मारक भवनमध्ये आज श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे हे होते. समारंभास राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, ट्रस्टचे विश्वस्त डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अशोक चौसाळकर, सौ. रोहिणी सुभेदार, ट्रस्टचे सचिव व जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.
 
 
समाजातील वंचित, पिडीत अशा सर्वसामान्य माणसासाठी मूलभूत मूल्यदृष्टीने काम करुन राजर्षि शाहुंच्या तत्वज्ञानाचा विचार जागृत ठेवावा, असे सांगून प्रा. पुष्पा भावे म्हणाल्या, माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देणे काळाची गरज आहे. समाजातील प्रत्येक घटकांच्या प्रश्नांची उकल करुन मूल्यदृष्टी जोपासण्यावर अधिक भर देणे गरजेचे आहे. राजर्षि शाहूंनी त्या काळी वंचित घटकांसाठी मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिली. शाहूंचे कार्य आणि विचार समाजाला प्रेरक आणि पोषक असल्याचेही त्या म्हणाल्या. समता प्रेमी, सामान्यांचा कैवारी, रयतेचा राजा अशा द्रष्ट्या लोकराजा शाहू महाराजांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. 
 
 
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज याप्रसंगी बोलताना म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहु महाराजांनी आपल्या जीवनात सामान्य माणसासाठी अभुतपूर्व काम केले असून शाहूंचे हे कार्य आणि विचार समाजातील प्रत्येक घटकाला प्रेरणादायी आहे. राजर्षि शाहूंच्या विचारांची प्रत्यक्ष कृतीतून जोपासना करणाऱ्या प्रा. पुष्पा भावे यांना यंदाचा शाहू पुरस्कार दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. राजर्षि शाहूंनी केलेला आरक्षणाचा कायदा महत्वाचा असून देशातील महिलांना राजकीय क्षेत्रामध्ये ५० टक्के आरक्षण मिळावे असेही ते म्हणाले. 
 
 
समारंभाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे याप्रसंगी बोलताना म्हणाले, राजर्षि शाहू महाराज हे रयतेचे राजे होते, त्यांची दूरदृष्टी सदैव प्रेरणादायी आहे. शाहूंच्या कार्याची आणि विचारांची प्रेरणा घेवून जीवनभर कष्टकऱ्यांसाठी, वंचित घटकासाठी काम करणाऱ्या प्रा. पुष्पा भावे यांना यंदाचा शाहू पुरस्कार देवून त्यांच्या कार्याचा गौरव केला ही अभिमानाची बाब आहे. राजर्षि शाहूंचा सक्तीच्या शिक्षणाचा कायदा तसेच स्त्रीयांवरील अन्याविरुध्द असलेला कायदा या बाबी सर्वार्थाने महत्त्वाच्या असून शाहूंचे समाजोपयोगी काम नव्या पिढीला प्रेरणादायी असल्याचेही ते म्हणाले. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@