शिर्डी संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांना राज्यमंत्री दर्जा

    27-Jun-2018
Total Views | 18




मुंबई : शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांना महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. राज्य सरकारच्या विधि व न्याय विभागाने याविषयीचा शासन निर्णय नुकताच जारी केला. यापूर्वी श्री सिद्धिविनायक संस्थान आणि महालक्ष्मी संस्थानच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला होता. डॉ. सुरेश हावरे यांनी संस्थानचे अध्यक्ष म्हणून काम करताना सामाजिक कार्यावर भर दिला आहे. लोकसहभागातून शिर्डीच्या स्वच्छतेसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. शिर्डीला आलेल्या भक्तांनी रक्तदान करावे यासाठी त्यांनी मोहीम सुरू केली व त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

 

शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे अध्यक्ष म्हणून काम करण्यापूर्वी त्यांनी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त म्हणूनही काम केले आहे. हावरे हे प्रथितयश उद्योजक व 'बिझनेस लीडर' आहेत. त्यांना भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटरमधून न्यूक्लिअर इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच त्यांनी डिपार्टमेंट ऑफ ॲटोमिक एनर्जीमध्ये २७ वर्षे वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ म्हणून काम केले आहे. ते नागपूर विद्यापीठातील इंजिनिअरिंगमधील सुवर्णपदक विजेते आहेत. 'परवडणारी घरे', 'नॅनो हाऊसिंग' याविषयी संशोधन करून त्यांनी मुंबई विद्यापीठाची डॉक्टरेट देखील मिळवली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121