मुख्य निवडणूक निरीक्षकपदी प्राजक्ता लवंगारे-वर्मा नियुक्त

    27-Jun-2018
Total Views |

जळगाव मनपा निवडणूक चुरशीची होण्याचा अंदाज

 
 
जळगाव :
जळगाव महापालिकेची निवडणूक अत्यंच चुरशीची होण्याची शक्यता लक्षात घेऊन एक वरिष्ठ अधिकारी ‘मुख्य निवडणूक निरीक्षक’ म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पदावर सिडकोच्या (नवी मुंबई) सहव्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची नेमणूक झाली आहे.
 
 
महापालिकेची निवडणूक प्रक्रिया व निवडणूक निरीक्षकांसह सर्व अधिकार्‍यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी लवंगारे-वर्मा यांच्यावर असणार आहे. आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी, खर्चावर नियंत्रण, आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे, मतदारांवर प्रभाव टाकणार्‍या वस्तूंच्या वाटपावर अंकूश ठेवणे आदी कामेही लवंगारे-वर्मा यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत.
 
 
शुक्रवारी युतीचे ठरणार ! 
जळगाव : महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना यांची युती होणार की, खाविआ आणि भाजप एकमेकांच्या विरोधात स्वबळावर लढणार यासारखे अनेक प्रश्‍न जळगावकरांच्या मनात आहे. त्याचे उत्तर शुक्रवारी (दि.२९) मिळण्याची शक्यता आहे. या दिवशी युतीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी बैठक होईल, अशी माहिती राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.
 
 
महापौर ललित कोल्हे सुरेशदादांसोबत
जळगाव : महापौर ललित कोल्हे यांनी मंगळवारी, महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महत्त्वाचे वक्तव्य केले. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासोबतच आपण राहणार असून, दादा सांगतील त्याप्रमाणे निवडणूक लढवू, अशी माहिती ललित कोल्हे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली. पण मनसेच्या इतर नगरसेवकांचे काय? या प्रश्‍नावर ते म्हणाले की, नेत्यासोबत त्याचे कार्यकर्तेही असतात. यानिमित्ताने मनसेला खिंडार पडले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. परंतु महापौर ललित कोल्हे यांच्यासह मनसेचे बहुतेक सदस्य यापूर्वीपासून मनाने सुरेशदादांसोबत असल्याने मनसेला खिंडार पडल्याची चर्चा किती गांभीर्याने घ्यायची? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.